मालेगाव : कर्नाटकच्या हिजाब वादाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. मालेगावात या प्रकरणी हिजाब परिधान करण्याच्या समर्थनात मुस्लीम महिलांचा मेळावा घेण्यात आला. गुरुवार दि.१० फेब्रुवारी रोजी मालेगावातील जमियत उलेमा या संघटनेने आयोजित केला होता. या प्रकरणी कोविड नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल अडचणीत येण्याची शक्यता आहे.
परवानगी नाकारलेली असतानाही जमाव केल्याप्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. कर्नाटक सरकारने जरी विद्यार्थिनींवर हिजाबबंदी लादली असली, तरी हा निर्णय असंवैधानिक आहे. मुस्लीम महिलांना धर्मानुसार आचरण करण्याचा अधिकार आहे, त्यासाठी आम्ही हा मेळावा घेतला, असे आयोजकांचे म्हणणे आहे. उलेमा या संघटनेने गुरुवार दि. १० फेब्रुवारी रोजी अजिज कल्लू मैदानावर दुपारी चार ते पाच या वेळेत महिला मेळाव्याचे आयोजन केले होते.
यावेळी आठ ते दहा हजार महिलांनी बुरखा परिधान करून सहभाग नोंदविला. या ठिकाणी आमदार मुफ्ती यांचे भाषणही झाले. दरम्यान, कोरोना प्रतिबंधक नियमांनुसार कोणत्याही स्वरूपातील गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. याबाबत मेळाव्याच्या पूर्वसंध्येलाच जिल्हा पोलिसप्रमुख सचिन पाटील यांनी कुणीही गर्दी जमवू नये, आंदोलने मेळावे यांना परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले होते.
याकडे दुर्लक्ष करून जमियत उलेमा संघटनेने आवाहनाप्रमाणे महिला मेळावा घेतला. त्यामुळे पवारवाडी पोलिस ठाण्यात विनापरवानगी मेळावा घेतल्या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा नोंदविला जात आहे. यास पोलिस अधीक्षकांनीही पत्रकारांशी बोलताना दुजोरा दिला. जमियत उलेमा संघटनेचे शहराध्यक्ष हे आमदार मुफ्ती असल्याने त्यांच्यासह सहकाऱ्यांवर हा गुन्हा दाखल होतो की, अज्ञात आयोजकांवर याविषयी स्पष्ट होऊ शकलेले नाही.