संजय राऊतांच्या भाषेत ज्यांना समजण्यासाठी १०० जन्म लागतील त्या शरद पवारांना अंगावर घेणार्यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी शरद पवारांच्या कुशीत शिरलेल्यांनी धमकी देऊ नये. त्या धमकीचा कसलाही परिणाम होणार नाही, उलट संजय राऊतांची संभावना स्वतःवर डाव आला की, रडकुंडीला आलेल्या रडव्यासारखी मात्र नक्कीच होईल. कारण, त्यांच्या धमकीतून शिवसैनिकाचा आत्मविश्वास नव्हे, तर घायकुतीला आल्याची भावनाच ओसंडून वाहत होती.
“आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही,” अशी धमकी हर्बल वनस्पतीच्या अतिसेवनाने डोक्यावर परिणाम झालेल्या संजय राऊतांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना दिली. त्याला कारण ठरले ते संजय राऊतांच्या निकटवर्तीयांवरील ‘ईडी’च्या धाडी. पण, ‘ईडी’च्या धाडीने संजय राऊतांना धाड भरण्यासारखे काय?
‘कर नाही त्याला डर कशाला’ अशी मराठीत म्हणच आहे. त्यामुळे संजय राऊतांनी घाबरण्याचे काही कारण नाही. पण तसे नाही, संजय राऊत वा त्यांच्या निकटवर्तीयांनी नक्कीच ‘अर्था’चा अनर्थ केलेला आहे आणि म्हणूनच संजय राऊतांचा तोल ढासळला. पण, त्यांच्या धमकावण्याला आजकाल कुणीही विचारत नाही. कारण, संजय राऊत वा शिवसेना शिवसेनेसारखी राहिलेली नाही.
२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने सत्तेसाठी भाजपची साथ सोडली अन् ती राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या नादाला लागली. संजय राऊत तर त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर सदा न कदा पडीक असायचे. नंतर महाराष्ट्रात तिन्ही पक्षांचे महाभकास आघाडी सरकारही स्थापन झाले अन् उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी आले.
मात्र, तेव्हापासून शिवसेनेचा बाणेदारपणा वांद्य्राच्या खाडीत बुडाला तो कायमचाच! तथापि, देवेंद्र फडणवीस आणि भाजपने गेल्या दोन वर्षांतल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून पोटनिवडणुकांतही सर्वाधिक जागा जिंकल्या. विशेष म्हणजे, भाजपने या काळात शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसलाही मागे टाकले. तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ६०च्या आत रोखत आसमान दाखवले होतेच.
अर्थात, संजय राऊतांच्या भाषेत ज्यांना समजण्यासाठी १०० जन्म लागतील त्या शरद पवारांना अंगावर घेणार्यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी शरद पवारांच्या कुशीत शिरलेल्यांनी धमकी देऊ नये. त्या धमकीचा कसलाही परिणाम होणार नाही, उलट संजय राऊतांची संभावना स्वतःवर डाव आला की, रडकुंडीला आलेल्या रडव्यासारखी मात्र नक्कीच होईल. कारण, त्यांच्या धमकीतून शिवसैनिकाचा आत्मविश्वास नव्हे, तर घायकुतीला आल्याची भावनाच ओसंडून वाहत होती.
दरम्यान, संजय राऊतांच्या धमकीला देवेंद्र फडणवीसांनी दिलेले उत्तर मार्मिक आहे. “सिंह कधी गिधाडांच्या धमक्यांना घाबरत नाही,” असे ते म्हणाले. फडणवीसांच्या या उत्तराने संस्कृतमधील ‘नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने। विक्रमार्जितसत्वस्य स्वयमेव मृगेन्द्रता’ या सुभाषिताची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. सिंहाला राजा होण्यासाठी राज्याभिषेकाची गरज नसते, तो आपले कार्य आणि साहसाने राजा होतो, असा त्याचा अर्थ.
देवेंद्र फडणवीस राजकारणात यशस्वी झाले, मुख्यमंत्री झाले ते स्वकर्तृत्वावरच, संजय राऊतांनी आपल्या नेत्याला व पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या कुबड्या दिल्या, तसे नव्हे. आजही महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत आणि गेल्या निवडणुकीत भाजपच्या पारड्यात सर्वाधिक १०५ जागा देण्यातून त्याची प्रचिती आलीच होती. असा सिंह संजय राऊतांसारख्या कधीही निवडणूक न लढलेल्यांच्या पोकळ धमक्यांना घाबरत नसतो. उलट संजय राऊतांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी व त्यांच्या निकटवर्तीयांनी ‘ईडी’चा सामना करावा. तिथे त्यांनी आपले कोणताही गैरव्यवहार न केल्याचे बळ दाखवावे.
दरम्यान, रोज सकाळी उठून वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींसमोर येऊन बडबडण्याने संजय राऊतांचे काहीही भले होणार नाही. एक खरे की, यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेचे मनोरंजन मात्र नक्कीच होईल. कारण, आजकालचे दूरचित्रवाणी वा समाजमाध्यमांवरील वा सभागृहातील मनोरंजनाचे कार्यक्रम आवर्जून पाहावे लागतात, त्यासाठी वेळ काढावा लागतो, कधी शुल्कही भरावे लागते. पण, संजय राऊतांसारखा विदुषक मराठीजनांना आयताच लाभला आहे, त्यांच्यासाठी वेळ काढावा लागत नाही ना शुल्क भरावे लागते.
वृतवाहिन्यांच्या प्रतिनिधींना संजय राऊत दिसले की ते त्यांच्याकडे धावत जातात आणि संजय राऊतही ‘स्टॅण्डअप कॉमेडी’चा कार्यक्रम सुरु करतात. नंतर आपसूकच त्याचा सर्वत्र प्रसार होतो. पण, या सगळ्यात मनोरंजनापेक्षाही जनतेचे नुकसान मात्र प्रचंड होत आहे. कारण, संजय राऊत असो वा महाविकास आघाडी सरकार आणि त्यातील मंत्री वगैरे, या लोकांकडे जनहिताची कामे करण्याची इच्छाशक्तीच नाही. उठसूट फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वा ‘ईडी-सीबीआय’च्या नावाने गळे काढण्यालाच ते सरकार चालवणे समजतात. प्रसारमाध्यमांतही दिवसभर तेच सुरु असते, त्या गदारोळात जनतेला सरकाररुपी वाली उरतच नाही.
पण, या सगळ्याचा वचपा मात्र जनता मतदानातून, निवडणुकांतून काढेलच आणि त्यावेळी संजय राऊत व कंपनीला कायमचीच ‘स्टॅण्डअप कॉमेडियन’ची भूमिका मिळेल, हे निश्चित. दरम्यान, इथे एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल ती म्हणजे शिवसेना महाराष्ट्राच्या सत्तेवर आल्यानंतरची संजय राऊतांसह गुंडगिरी करणार्या कार्यकर्त्यांची मस्ती! व्यंगचित्र पुढे पाठवले म्हणून शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या एका माजी नौदल अधिकार्याला जबर मारहाण केली होती, तर एका भाजप कार्यकर्त्याचे बळजोरीने मुंडण केले होते.
मुंबई महापालिकेने अनधिकृत इमारतीचे कारण सांगत अभिनेत्री कंगना राणावतच्या घराचे बांधकाम पाडले होते, तर ‘सामना’सह संजय राऊतांनी त्याचे ‘उखाड दिया’ म्हणत समर्थन केले होते. एका महिलेला तथाकथित बोगस पदवीच्या कारणावरुन ४७ दिवस तुरुंगात पाठवले होते तर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना सुडभावनेने अटक केली होती. त्या त्या वेळी संजय राऊतांनी ‘कायद्याला सामोरे जा,’ असा सल्ला यातल्या सार्यांना दिला होता. पण, आज त्याच कायद्याने संजय राऊत वा निकटवर्तीयांवर कारवाई होत असेल तर ते का आदळआपट करताहेत? तुम्हीही जा की कायद्याला, ‘ईडी’ला सामोरे, ही लोकशाही आहे, इथे सगळ्या गोष्टी कायद्यानेच होतील, रडून नव्हे!