नवी दिल्ली: कर्नाटकात सुरु झालेले हिजाब वादाचे लोण आता देशभर पसरायला लागले आहे. उत्तरप्रदेश मधील अलिगढ विद्यापीठात तर कोलकात्यातील आलिया विद्यापीठात बुधवारी हिजाबच्या समर्थनार्थ निदर्शने झाली. या मुद्द्यांवर देशातील धार्मिक वातावरण गढूळ होत असून आता हे वादळ शिक्षणसंस्थांमध्येही पसरायला लागले आहे.
उत्तरप्रदेश मधील अलिगढ विद्यापीठात बुधवारी विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. विद्यापीठाच्या डक गेट पासून ते बाबा सय्यद पॉंईंट कडे जात असताना त्यांना विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी अडवले. "जर आमच्या गोष्ट आमच्या इस्लामच्या बाबतीत असेल तर आम्ही त्याविरुद्ध आवाज उठवणारच, जरूर पडली तर यासाठी संघर्ष सुद्धा करू"असे अलीगढ विद्यापीठाचा विद्यार्थी नेता आरिफ त्यागीने सांगितले. "हिजाबला विरोध करून यांनी आमचा अपमान केला आहे अशीच विद्यार्थ्यांची भावना आहे" असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
कोलकात्यातील आलिया विद्यापीठात सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी हिजाब घालून हिजाबच्या समर्थनार्थ निदर्शने केली. "हिजाब घालणे हा आमचा धर्मच आहे आणि भारतीय संविधान आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य देते. हे उजव्या विचारसरणीचे लोक आम्हाला हुजेब शिवाय मध्ययुगाकडे घेऊन चालले आहेत." असे येथील विद्यार्थिनींचे म्हणणे आहे.
दरम्यान या वादामुळे कर्नाटक सरकारने राज्यात तीन दिवस शाळा बंद ठेवल्या आहेत आणि कलम १४४ लागू केले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायाधीशांच्या पीठाकडे वर्ग केली आहे.