पणजी: गोव्यात काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी शिवसेना व राष्ट्रवादीच्या मुद्द्यावर मंगळवारी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. "गोव्यातील मुख्यमंत्रीपदाच्या नावाच्या घोषणेचा निर्णय हा काँग्रेस उमेदवारांशी चर्चा करूनच जाहीर केला जाईल" असे ते म्हणाले.
" आमच्या बाजूने आम्ही तिघांनी एकत्र यावे यासाठी पूर्ण प्रयत्न केले, आम्हीही या निवडणुकीसाठी काही प्रस्ताव समोर ठेवले होते पण दुर्दैवाने आम्ही एकत्र येऊ शकलो नाही. गोव्यात जरी आम्ही एकत्र नसलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमचे मित्रपक्ष आहेत आम्ही महाराष्ट्रात एकत्र सत्तेत आहोत, आमची मैत्री कायम आहे आणि यापुढेही ती कायमच राहील. निवडणुकीनंतर संधी मिळाल्यास राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत काम करू" असेही चिदंबरम यांनी स्पष्ट केले. गोव्यात काँग्रेस गोवा फॉरवर्ड ब्लॉक पक्षासोबत निवडणूक लढवत आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेसच्या अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, तशी परिस्थिती यावेळेस होऊ देणार नाही. पक्षनिष्ठा हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल असे त्यांनी स्पष्ट केले. गोव्यात विधानसभेच्या ३० जागांसाठी काँग्रेसने उमेदवार उभे केले आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे उमेदवार निवडताना गोवा फॉरवर्ड ब्लॉक चे मत विचारात घेतले आहे.