‘गरिबांचा सीए’ किशोर बिंद

    01-Feb-2022   
Total Views |

Kishor Bind
 
 
 
मुंबईतील गोरगरिबांच्या संस्था, मंडळं, पतपेढ्या, सोसायट्या आणि बचतगट यांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत ‘गरिबांचे सीए’ किशोर बिंद यांच्या जीवनकार्याचा घेतलेला हा मागोवा...
 
 
“साहेब, माझ्या भाज्यांचा बाकडा परत द्या. आज भाज्या विकल्या, तरच घरी रात्रीच जेवण बनेल. मी रात्री महाविद्यालयात जातो साहेब!!” भाजीचा बाकडा महानगरपालिकेने उचलल्यावर तो १८-१९ वर्षांचा युवक अजिजीने, अत्यंत विमनस्कपणे, हताशपणे महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना विनवणी करत होता. बाकडा परत घेण्यासाठी तो युवक महानगरपालिकेच्या कार्यालयात पोहोचला होता. त्या युवकाचे बोलणे ऐकून ते अधिकारी म्हणाले, “ठीक आहे. तू इतरांसारखा नाहीस. जा दंड पण नको भरूस आणि बाकडा घेऊन जा!” शिक्षण आणि पदाच्या साहाय्याने हा अधिकारी त्या खुर्चीवर बसला होता. गरीब गरजूंना मदत करू शकत होता. मग त्या युवकानेही ठरवले आपणही असेच बनायचे! तो युवक म्हणजे ‘के. आर. बिंद अ‍ॅण्ड कंपनी’चा सर्वेसर्वा सीए किशोर बिंद. त्यांच्या या सीए पर्ममध्ये त्यांच्या हाताखाली आज १६ कर्मचारी कार्यरत आहेत. दहा पॅनल ऑडिटर आणि पाच सीए समन्वयक साथीदार आहेत.आज मुंबई सहकारी क्षेत्रातले ‘गरिबांचे सीए’ म्हणून त्यांचा लौकिक आहे. मुंबईतील दोन हजार सोसायट्या, हजारो बचतगट, हजारो महिला मंडळं आणि मुंबई बँक संलग्न शेकडो संस्थांचे ऑडिट करून देणे, प्रशासकीय मान्यता मिळवून देणारी कागदपत्र तयार करून देणे ही सगळी कामे किशोर करतात. मुंबईतील बचतगटांना सरकारची कंत्राटं मिळवताना असंख्य परवाने लागतात. ते काम किचकटच असते. मात्र, किशोर अगदी माफक दरात आणि वेळप्रसंगी स्वतःच्या पदराला खार लावून या सगळ्या संस्थांच्या कल्याणासाठी काम करतात. ते अंधेरी सीए असोसिएशनचे सदस्य आहेत. तसेच ‘बिंद कल्याण संघ’ आणि ‘बिंद विकास संघ’ या दोन संस्थांचे संचालकही आहेत. या दोन्ही संस्था मुंबईतील केवट समाजासाठी काम करतात. पण, या संस्थांच्या व्यतिरिक्त किशोर हे सर्व समाजाला सोबत घेऊन काम करतात. ‘सब समाज को साथ लिये’ असे किशोर यांचे मत.
 
 
 
त्याला कारणही तसेच आहे. किशोर यांचे आदर्श आहेत मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र. प्रभू श्रीरामचंद्रासोबत रावही होते, रंकही होते, शबरीही होती आणि सुग्रीवही होते. हनुमानजींची पूर्ण वानरसेनाही होती आणि खारूताई, जटायूचीही साथ होती. एकवचनी मर्यादा पुरूषोत्तमाचा आदर्श स्वत:च्या आयुष्यात राबविण्याचा यशस्वी प्रयत्न किशोर यांनी त्यांच्या आयुष्यात केला. किशोर काम करतात ते मुख्यत: महिला बचतगट, वस्तीपातळीच्या सहकारी संस्था आणि सोसायटी यांच्यासाठी. मुंबईमध्ये ‘गरिबांचा चार्टड अकांऊंटंट’ कोण, तर सीए किशोर बिंद, ही ओळख त्यांनी उगीच मिळवली नाही. त्यांच्या संवेदनशीलतेच्या प्रेरणेचा मागोवा घेतला की, जाणवते ती त्यांच्यातली माणुसकी आणि ही त्यांनी केलेल्या संघर्षाची परिणीती आहे. किशोर यांचे वडील रामदुलारी बिंद आणि आणि आई केवलपत्ती बिंद. केवट समाजातले अत्यंत पापभिरू आणि धार्मिक कुटुंब. या दाम्पत्याला सहा मुलं. त्यापैकी एक किशोर. रामदुलारी हे मिलमध्ये कामाला होते. मिलचा संप झाला आणि घरात अन्नाची दशा झाली. अशा काळात आठवीत असलेले किशोर त्यावेळी पहाटे ५ वाजता उठायचे, दुधाच्या पिशव्या घरोघरी पोहोचवायचे. त्यानंतर वर्तमानपत्र घरोघरी पोहोचवायचे आणि नंतर शाळेत जायचे. दुपारी घरी आले की, जेवून गारमेंटमध्ये कामाला जायचे, ते रात्री १० वाजता घरी परतायचे. त्यानंतर मग किशोर पंतनगरच्या उद्यानात रात्री अभ्यासाला जायचे.
 
 
 
पुढे रात्र महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. त्याचकाळात गारमेंट बंद पडले. मग किशोर यांनी भाजीचा धंदा सुरू केला. त्यांचे वडील दादरहून भाजी घेऊन यायचे आणि किशोर मार्केटमध्ये भाजी विकायचे. याच काळात गरीब भाजी विक्रेते, फेरीवाले यांचे शोषण, अधिकारी वर्गाची मानसिकता, प्रशासन त्यांचे नियम, गुंड आणि कायदा याची ओळख जवळून झाली. तसे ते अभ्यासात हुशारच होते. त्यांनी चार्टड अकाऊंटंट व्हावे,असे त्यांनी ठरवले. हा काळ प्रदीर्घ कसोटीचा होता. लोक म्हणायचे, “काय करणार आहेस तो कोर्स करून वगैरे.” त्यावेळी किशोर यांचे वय अवघे २० वर्षे. पण, समाजाचा आणि नातेवाईकांच्या रेट्यामुळे रामदुलारी यांनी किशोर यांचा विवाह विजया यांच्याशी करून दिला. विजया यांनी किशोर यांना समर्थ साथ दिलीच. पण, त्याकाळात कुटुंंबाची जबाबदारी अंगावर पडल्यावर किशोर यांनी नोकरीसाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, नोकरी मिळविण्यात अडचणी आल्या. किशोर घाटकोपरच्या गौरीशंकर वाडीत राहायचे. गौरीशंकर वाडीतले सगळेच लोक गुन्हेगार किंवा वाईट प्रवृत्तीचे नव्हते. पण, वस्ती बँकेच्याही आणि कायद्याच्याही काळ्या यादीत! त्यामुळे या वस्तीत राहातो म्हणूनही कित्येक ठिकाणी किशोर यांना नोकरी नाकारण्यात आली.
 
 
 
सर्वसामान्य गरिबांची ससेहोलपट, असाह्यता हे सगळे किशोर यांनी अनुभवले. या काळात त्यांचे मित्र प्रकाश थोरात यांनी त्यांना खूप सहकार्य केले. पुढे किशोर सीए झाले तर प्रकाश मुंबई बँकेत नोकरीला लागले. प्रकाश यांच्या ओळखीने मुंबई बँकेशी संलग्न काही संस्थांच्या ऑडिटचे काम किशोर यांना मिळाले. तसेच मुंबई बँकेच्या जयश्री पांचाळ यांनीसुद्धा मुंबई बँकेशी संबंधित ५०० महिला संस्थांचे ऑडिट करण्यासंदर्भात विचारणा केली. त्यानंतर किशोर यांचा मुंबई सहकारी आणि पतपेढी क्षेत्रातील ऑडिट कार्याचा प्रवास सुरू झाला. ज्या संस्था आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, त्यांना नाममात्र शुल्कात ऑडिट आणि कंत्राट मिळवण्यासंदर्भातली कागदपत्रे तयार करुन देण्याचे काम त्यांनी सुरू केले. गेल्या दोन दशकांचा हा प्रवास आजही सुरू आहे. किशोर म्हणतात की, “जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे. मी ती माझ्या यथाशक्तीप्रमाणे करतो इतकेच! ‘गरिबांचे सीए’ किशोर बिंद यांचे हे अत्यंत वेगळ्या आयामातले सामाजिक कार्य खरोखर स्पृहणीय आहे.
 
 
९५९४९६९६३८
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.