एफएलडीएस चर्च : कुठे गेली दया?

    09-Dec-2022
Total Views |
सॅम्युअल


नुकतीच घडलेली घटना. एक बंद ट्रेलर रस्त्यावरून जात होता. गस्त घालणार्‍या पोलिसांना त्या ट्रेलरमधून हाताचे एक बोट बाहेर आलेले दिसले. काही तरी संशयास्पद आहे, असे पोलिसांना वाटले. त्यानंतर खुलासा झाला की, त्या ट्रेलरमधून अल्पवयीन मुलींना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेले जात होते. या बालिका अत्यंत घाबरलेल्या होत्या. या सगळ्या मुली ११ ते १४ या वयोगटातल्या. त्यांच्याकडून खुलासा झाला की, ‘सॅम्युअल रैपिल्ली बेटमैन फंडामेंटलिस्ट चर्च ऑफ जीजस क्राईस्ट ऑफ लैटर डे सेंट’(एफएलडीएस चर्च) या चर्चचा एक प्रेषित होता. अमेरिकेतील अ‍ॅरिजोना प्रांतातील या चर्चचा तो प्रमुख. त्याचे ५० अनुयायी होते. लहान बालिकांचे लैंगिक शोषण, मानसिक शारीरिक छळ, अपहरण यासाठी सॅम्युअलला यापूर्वीही अटक झाली होती.


मात्र, तो जामिनावर सुटला होता. त्याने २० महिलांशी विवाह केला. त्यापैकी बहुतेक जणी १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या. त्याने चक्क स्वतःच्या मुलीशीही विवाह केला होता. इतकेच काय त्याने श्रद्धेच्या नावाने त्याच्या तीन अनुयायांना त्यांच्या १२ वर्षांखालील मुलींशी लैंगिक संबंध ठेवायला लावले. ते तीन अनुयायी त्यांच्या मुलींशी संबंध करत असताना तो ते पाहत असे. तो म्हणत असे ”तुम्ही ईश्वरासाठी पुण्याचा त्याग केला आहे. तुम्ही पूर्ववत आरोग्यदायी होणार.”आता त्याला सजा झाली आहे. मात्र, त्याला अजिबात वाटत नाही की त्याने गुन्हा केला. त्याचे म्हणणे हेच की, त्याने त्याच्या चर्चचा ज्या विचारांवर विश्वास आहे, तो विश्वास वाढवण्यासाठी हे सगळे कृत्य केले. आजही अमेरिकेत असे हजारो लोक आहेत जे ‘फंडामेंटलिस्ट चर्च ऑफ जीजस क्राईस्ट ऑफ लैटर डे सेंट’चे अनुयायी आहेत.

ज्यांची सॅम्युअलच्या विचारांवर श्रद्धा आहे. सॅम्युअलने २० मुलींशी कसेही करून विवाह केला, हे धर्मानुसारच आहे असे त्यांना वाटते. त्याला कारण आहे त्यांच्या चर्चसंस्थेचा प्रमुख वॉरेन जेफ. वॉरेन म्हणतो, ”व्यक्तीला देवत्व मिळवायचे असेल, तर त्याने अनेक विवाह केले पाहिजे. वयाची ७० वर्षे गाठलेला वॉरेन सध्या तुरुंगात आहे.कारण, त्याने काही वर्षांपूर्वी ६७ बालिकांचा विवाह त्याच्या चर्च संस्थेच्या अनुयायींशी करण्याचा प्रयत्न केला होता. (हो, या चर्चचे अनुयायी महिन्याला ५०० ते १००० रुपये डॉलर्स चर्चला दान करतात.) कायदा काहीही सांगो, ते बहुपत्नीत्वाचे पालन करतात. वॉरेन याला तब्बल ७८ पत्नी आहेत. त्याची सर्वांत आवडती पत्नी नाओमी. आता नाओमी कोण हे समजल्यावर कळेल की, ‘फंडामेंटलिस्ट चर्च ऑफ जीजस क्राईस्ट ऑफ लैटर डे सेंट’ ही चर्च संस्था काय आहे ते... नाओमी ही वॉरेन याचे पिता रूलन यांची पत्नी. रूलन यांना २० पत्नी होत्या, त्यापैकी नाओमी एक.

नाओमीच्या वडिलांनाही सहा बायका. नाओमी ज्यावेळी १७ वर्षांची झाली, त्यावेळी तिचा विवाह ८३ वर्षांच्या रूलन यांच्याशी करण्यात आला. मुलींनी केवळ गोड दिसायचे आणि गोड हसायचे, सगळ्याला होकार द्यायचा हा चर्चसंस्थेने महिलांसाठी ठरवेलला नियम. त्यामुळे ८३ वर्षांच्या रूलन सोबत विवाह करायचा की नाही, हे ठरवण्याचा अधिकार नाओमीला नव्हता. त्यानंतर काही काळातच रूलन याचा मृत्यू झाला. त्यावेळी वॉरन याने रूलनच्या १२ पत्नींशी विवाह केला. त्यापैकी एक नाओमी. बहुपत्नीत्व का? तर जास्तीत जास्त अपत्यांना जन्म देऊन आपण ज्या श्रद्धा पाळतो मानतो त्यांना मानणारा अनुयायी वर्ग वाढवणे. या चर्चसंस्थेच्या मते नसबंदी करणे किंवा गर्भनिरोधक साधने वापरणे, हे पाप आहे. या चर्चचे श्रद्धाळू आपआपासात मुलींची देवाणघेवाण करत. जितक्या लहान वयात मुलींची लग्न, तितक्या त्या जास्त मुलांना जन्म देऊ शकतील, असे त्यांचे मत.

या ‘फंडामेंटलिस्ट चर्च ऑफ जीजस क्राईस्ट ऑफ लैटर डे सेंट’च्या अनुयायांच्या घरी जन्मलेल्या मुलींच्या जगण्याचे दुःखशब्दातीतच. लहान वयात लैंगिक अत्याचार, लादलेले मातृत्व बंधन आणि नियम... या मुलींना बाहेरच्या जगाशी कोणताच संपर्क होणार नाही, याची काळजीही घेतली जाते. केवढे हे क्रौर्य! २१व्या शतकात अमेरिकेमध्ये हे होत आहे. लज्जास्पद आणि दुःखद. असो, चर्च या इतर संस्था या ‘एफएलडीएस’ चर्चच्या अनुयायांना ख्रिस्ती मानत नाहीत. मात्र, ‘एफएलडीएस’ चर्चचे अनुयायी स्वतःला ख्रिस्तीच मानतात. नाताळजवळ आहे. येशूची ‘मर्सी’ सांगण्यासाठी अनेक जण भारतातही गल्लोगल्ली फिरताना दिसतील. त्यापैकी कुणी अमेरिकेतल्या या ख्रिस्ती मुलींसाठीही दया करूणा ‘मर्सी’ मागेल का?



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.