तब्बल अर्धा डझनांहून अधिक छंद जोपासून त्यांचे तितकेच चिकाटीने जतन आणि संवर्धन करणार्या आणि ‘लिम्का बुक’नेही नोंद घेतलेल्या छंदिष्ट श्रुती गावडेची ही छंदकथा...
श्रुती गावडे मूळची पुण्याची. श्रुतीच्या वडिलांनी छोटा व्यवसाय करुन घराचा गाडा हाकला. हुशार असलेल्या श्रुतीला शालेय वयातच वेगवेगळे छंद आणि कलांमध्ये आवड निर्माण झाली. शाळेत विविध स्पर्धा, उपक्रमात श्रुती उत्स्फूर्तपणे भाग घेऊ लागली. पण, आपण आणखीन काहीतरी वेगळे करायला हवे, असे तिला वाटू लागले. मग त्यासाठी विविध छंदांची साथसोबत तिला लाभली. त्यासाठी शाळेतील शिक्षक आणि कुुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळत असल्याने ती भारावून गेली. अखेर एक नव्हे, तर तब्बल सहा छंद श्रुती आजही जोपासते आणि त्यांचे संवर्धनही करते. पुढे वडिलांच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण घराची जबाबदारी श्रुतीवर आली. पण, आता हेच छंद तिचे जगण्याचे साधन बनत आहेत.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच श्रुती इतरही छंद आपसूक जोपासू लागली. त्यात ट्रेकिंग, चित्रकला, रांगोळी काढणे, मायक्रोग्राफी, फ्रेम तयार करणे, भिंतीवर जनजागृतीपर चित्र काढणे असे अनेक छंद जोपासले. दरवर्षी गणेशोत्सवात 1 हजार, 221 ‘सीडबॉल’ मोदक ती तयार करते. रक्षाबंधनाला ‘सीडबॉल’ राख्या तयार करुन त्या सैनिकांना पाठवते. केवळ छंद म्हणनू नाही, तर आपण यात काय वेगळे करु शकतो, अशा विचारात ती नेहमी असते.
श्रीराम नवनमीच्या निमित्ताने तिने छंदाचा पहिल्यादा वापर केला. श्रुतीने रामनामाचा वापर करुन आणि अतिशय सूक्ष्म अक्षरांनी श्रीरामांचे एक अतिशय सुंदर असे पोस्टर तयार केले. त्यात तब्ब्ल 1 हजार, 221 रामनामांचा उल्लेख होेता. हा तिचा पहिला प्रयत्न असल्याचे ती सांगते. पुढे अशाच प्रकारे तीन देवतांच्या नावांच्या प्रतिमा तयार तिने तयार केल्या. मध्यंतरी एका मित्राच्या वाढदिवसाला श्रुतीने तब्बल तीन दिवस कष्ट करुन एक सुरेख चित्र तयार केले. त्यामुळे तिच्या या चित्राची मागणी वाढत गेली. तिला आजही अनेकदा फोनवर अशा प्रकारे नावांची चित्र तयार करण्यासाठी विचारणा करण्यात येते. अशाच प्रकारे राजकीय नेते, आमदार आणि नगरसेवकांच्या नावांचीही तिने चित्रे तयार केली. सिनेसृष्टीतील अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त 77 चित्र आणि 77 चित्रांचा वापर करुन ‘कॅलिग्राफी’ केल्याची आठवण ती सांगते. ‘धर्मवीर’ चित्रपटानंतर 1 हजार, 305 वेळा ‘धर्मवीर’ लिहून आनंद दिघे यांची सुरेख प्रतिमाही श्रुतीने रेखाटली होती.
घरात आणि अंगणात सुरेख रांगोळी काढताना तिला रांगोळीचीही चांगली ओळख झाली. परिसरात कोणताही कार्यक्रम असो श्रुतीला रांगोळी काढण्यासाठीचे आमंत्रण ठरलेले. चिंचवड गावात एका कार्यक्रमात तिला रांगोळी काढण्याचे असेच आमंत्रण मिळाल्यानंतर तिने तब्बल 400 चौरस मीटरची भव्य रांगोळी काढली, जिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तसेच विद्यार्थ्यांना अक्षरांची, अंकांची ओळख व्हावी, यासाठी श्रुतीने विविध शाळांच्या भिंतीवरही जनजागृतीपर चित्रे रंगवली. विविध शाळांमध्ये ती विद्यार्थ्यांना समजेल, अशा भाषांतून, चित्रांतून ओळख व्हावी, अशी अक्षरे रेखाटते.
पुढे 2014 मध्ये काहीतरी वेगळे शिकावे आणि इतिहासाची आवड असल्याने श्रुतीने मोडी लिपी शिकवण्याचा निर्धार केला. पुण्यात मोडी लिपीचे रीतसर शिक्षण पूर्ण केले. मात्र, केवळ शिक्षण घेऊन श्रुती थांबली नाही, तर ते जतन करण्यासाठी तिने प्रयत्न सुरु केले.
अशा या छंदिष्ट श्रुतीने पुण्यात ‘हेल्मेट’सक्ती लागू झाल्यानंतर स्वर, व्यंजन वापरून ‘हेल्मेट’ तयार केले होते. तसेच जनजागृतीसाठी मोडी लिपीतील अक्षरे दुचाकीवरही चक्क कोरली. इतकेच नाही तर अगदी चहाचे कप, दिनदर्शिका, घराचे पडदे यांचासुद्धा श्रुतीने मोडी लिपीच्या प्रसारासाठी अतिशय कल्पकपणे वापर केला. त्यामुळे श्रुती गावडे ही आज ‘मोडी गर्ल’ म्हणून परिसरात ओळखली जाते. मोडी लिपीचा केवळ प्रचार-प्रसारच नाही, तर आज 100 विद्यार्थी श्रुतीकडून मोडी लिपीचे धडे गिरवित आहेत.
मोडी लिपी भारताबाहेर पोहोचविण्यासाठी श्रुती आग्रही असून परराज्यातही मोडी लिपीसाठी काम करण्याची इच्छा ती व्यक्त करते. जागतिक महिला दिनानिमित्त परिसरातील हौशी महिलांसाठी श्रुती विशेष मोडी लिपीचे वर्गही आयोजित करते. त्यात ती महिलांना लिपीचा इतिहास आणि इतर माहिती याची ओळख करुन देते. अगदी लहान मुलांना सुद्धा या मोडी लिपीची माहिती व्हावी, यासाठी दिवाळीत श्रुतीने चक्क या लिपीतील विविध अक्षरांच्या आकारांच्या चकल्या तयार करुन मुलांना त्यांचे वाटप केले होते. याच दरम्यान, पुण्यात शिवजयंतीनिमित्त शिवजयंतीनिमित्त श्रुतीने तब्बल 23 तास मेहनत घेत 1200 चौरस फुटांची भव्य रांगोळी साकारली होती. एवढंच नव्हे, त्या रांगोळीत पुन्हा मोडी लिपीमध्ये 1 लाख, 11 हजार, 111 वेळा ‘जाणता राजा’ अशी अक्षरे लिहिली होती. पुणेकरांनी प्रशंसा केलीच, तर तिची या कार्याची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली. यासह विविध संस्था, संघटना आणि महाविद्यालयांतर्फे श्रुतीला विविध पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. एवढ्यावरच न थांबता पुस्तक लेखनाची इच्छाही श्रुती बोलून दाखवते. तेव्हा, अवघ्या 26 वर्षांच्या अशा या विविधछंदी श्रुतीला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!
- पंकज खोले