चिंता काळजी मिटवणारे रामनाम

    07-Dec-2022   
Total Views |
ram


रामनामाने म्हणजे नामस्मरणाने या संसारशत्रूचे खरे रूप उघड होते. या संसारव्यापात आपण मोह, क्रोध, द्वेष, मत्सर या शत्रूंबरोबर राजरोसपणे वावरत असतो. शत्रूला शत्रू न समजता त्याच्याबरोबर मित्र म्हणून वावरू लागलो, तर आपणच आपला घात करीत असतो, हे माणसाला समजत नाही. नामस्मरणाने म्हणजे रामाच्या चिंतनाने या संसार शत्रूचे खरे रूप समजू लागते.

मनाच्या श्लोकातील श्लोक क्र. 71 मध्ये स्वामी म्हणाले की, रामनामाने महादोषांचेही निवारण होते. तसेच नामस्मरणाने साधकाला उद्घाराचा मार्ग सापडून उत्तम गती प्राप्त होते. या संबंधीचे विवरण आपण मागील लेखात पाहिले. तथापि रामनामाचे महत्त्व सांगत असताना स्वामींना माहीत होते की, हे जग स्वार्थी व व्यवहारी माणसांनी भरलेले आहे. तेव्हा व्यवहारी माणसाच्या मनात स्वामींच्या सांगण्यावर काही शंका असतील, याचा विचार करून स्वामींनी पुढील श्लोक सांगितला आहे-

न वेंचे कदा ग्रंथिचे अर्थ कांहीं।
मुखे नाम उच्चारिता कष्ट नाहीं।
महा घोर संसार शत्रू जिणावा।
प्रभाते मनीं राम चिंतीत जाता॥72॥


समर्थांना कल्पना आहे की, आपण नामस्मरणाचे हे विचार ज्या लोकांना एकवत आहोत, ती माणसे स्वार्थी व व्यवहारी जगात वावरणारी आहेत. या जगात प्रत्येक गोष्ट पैशांत मोजायची लोकांना सवय आहे. समर्थांनंतरच्या 350 वर्षांच्या काळात या वर्तवणुकीत फरक पडलेला नाही. संदर्भ बदलले, पण मानवाची विचार करण्याची पद्धत आहे तशीच राहिली. माणूस आवडत्या गोष्टींसाठी हवा तसा पैसा खर्च करतो. पण, इतर चांगल्या गोष्टींसाठी नाही. रामनाम अथवा नामस्मरण या काही आवडीच्या गोष्टी नाही तेव्हा त्यासाठी पैसा खर्च करणे, माणसालाआवडणार नाही.



कुणी नामस्मरण करायला सांगितले तर अशा माणसांच्या मनात विचार येतो की, त्यापासून माझा काही आर्थिक फायदा होणार आहे का किंवा मला काही पैसे खर्च करावे लागणारा का? सांगणार्‍याचा त्यात काही फायदा आहे काय, याचे कारण आपल्या मनाला तसेच विचार करायची सवय लागलेली आहे. म्हणून समर्थांनी स्पष्टपणे सांगून टाकले की, बाबांनो, मी जे नामस्मरण करायला सांगितले आहे, त्यासाठी तुम्हाला साठवलेल्या पैशांतून काहीही खर्च करावे लागणार नाही. श्लोकात वापरलेल्या ‘ग्रंथिचा अर्थ’ या शब्दाचा अर्थ साठवलेला पैसा तुमच्या गाठीशी असलेला पैसा असा आहे. आजकालच्या भाषेत बोलायचे, तर तुमचा ‘बँक बॅलन्स.’ समर्थांसारख्या निःस्पृह संताला रामनाम घेण्यासाठी काही पैसे खर्च करावे लागणार नाहीत, हे आम्हाला सांगण्याची वेळ यावी, ही आमच्यासाठी लाजीरवाणी गोष्ट म्हणावी लागेल.


नामस्मरणासाठी काहीही शारीरिक कष्ट करावे लागत नाही, असेही समर्थ सांगतात.व्यवहारात काही नवीन स्वीकारताना सामान्य माणूस नेहमी या दोन गोष्टी विचारतो - एक यासाठी पैसे खर्च करावे लागतील का? आणि शारीरिक कष्ट होतील का? स्वामी सांगतात, यापैकी काहीही रामनामासाठी किंवा नामस्मरणासाठी लागत नाही. माणसे दिवसभर निरर्थक बडबड करण्यात तासन्तास घालवतात. त्यात काय आनंद मिळतो, ते त्यांचे त्यांना ठाऊक, पण त्यात काही सुख नाही, असे स्वामींनी मागे 23व्या श्लोकात सांगितले आहे. त्यात स्वामी म्हणतात, ‘जनीं वाडगे बोलता सुख नाही.’ तरीही लोक ‘वाडगे’ बोलण्यात वेळ घालवतात. पण, हितकारी नामस्मरणाकडे वळत नाहीत. रामनाम घ्यायचे ठरवले, तर त्याने निरर्थक बडबडीला आळ बसून फायदा होईल. नुकसान वाचवता येईल. बिनापैशाचे, बिनाश्रमाचे हे रामनाम अर्थात नामस्मरण किती गुणकारी आहे, ते समर्थांनी या श्लोकात तिसर्‍या ओळीत सांगितले आहे, ते असे आहे.


‘महां घोर संसार शत्रु जिणावा।’
माणसाच्या जन्मापासून हा प्रपंच म्हणजे संसार त्याच्या मागे लागलेला असतो. हवे, नको, स्वार्थ, अहंकार, द्वेष, हाव इत्यादी गोष्टी माणसाचा पिच्छा सोडत नाहीत. वय वाढते तशा अनेक गोष्टी यात मिसळत जातात आणि जीवन नकोसे करून टाकतात. दासबोधातील ‘स्वगुणपरीक्षा’ या प्रकरणात स्वामींनी या संसारतापाचे यथार्थ वर्णन केले आहे. माणूस या संसारात इतका गुरफटून गेलेला असतो की, हा संसार हा प्रपंच महाघोर निर्माण करणारा शत्रू आहे, हे त्याच्या लक्षात येत नाही. संसारव्याप सांभाळताना स्वार्थ, अहंकार केव्हा येऊन मिळतात, ते समजत नाही. अहंकार सांभाळताना द्वेष, मत्सर हेवेदावे हेही येऊन चिकटतात. या सार्‍यांशी व्यवहार सांभाळताना त्यातून अस्वस्थता, चिंता, काळजी, दु:खे निर्माण होऊन या सार्‍यांचा अनुभव घेत महाघोर उत्पन्न करणार्‍या संसाराशी मैत्री करावी लागते.



 आपले अहित करणार्‍या घोर लावणार्‍या या संसाररूपी शत्रूला शत्रू न समजता आपला मित्र मानू लागतो, तर त्यामुळे तो आपले किती नुकसान करीत आहे, याची कल्पना येत नाही. रामनामाने म्हणजे नामस्मरणाने या संसारशत्रूचे खरे रूप उघड होते. या संसारव्यापात आपण मोह, क्रोध, द्वेष, मत्सर या शत्रूंबरोबर राजरोसपणे वावरत असतो. शत्रूला शत्रू न समजता त्याच्याबरोबर मित्र म्हणून वावरू लागलो, तर आपणच आपला घात करीत असतो, हे माणसाला समजत नाही. नामस्मरणाने म्हणजे रामाच्या चिंतनाने या संसार शत्रूचे खरे रूप समजू लागते. मोह, द्वेष, मत्सर, क्रोध या छुप्या शत्रूंची जाणीव होऊ लागते. शत्रूची ही ठिकाणे समजली की, त्याला जिंकणे सोपे होते.




हा संसार शत्रू महाघोर निर्माण करणारा आहे. तुमच्या आत्मोद्धाराच्या मार्गात हा शत्रू अडथळे निर्माण करतो. नामस्मरणाने, चिंतनाने या शत्रूची जाणीव होतेे, शत्रूची मर्मस्थाने समजतात. त्यामुळे त्याला जिंकणे, नामोहरम करणे शक्य होते. नामस्मरणापूर्वी हा शत्रू मित्र वाटत असल्याने आमचे त्याच्याकडे दुर्लक्ष झालेले असते. रामनामाने हा शत्रू आहे, हे समजते. त्याची वर्मे ओळखल्याने त्याला जिंकता येते. म्हणून समर्थांनी उद्गार काढले आहेत की, ‘महाघोर संसार शत्रु जिणावा।’ यासाठी प्रभातकाळी रामाचे चिंतन करावे.


नामस्मरण हा इतका सोपा मार्ग असूनही लोक देवासाठी, उद्धार होण्यासाठी अनेक कष्टदायक मार्गांचा अवलंब करतात. देहाला कष्ट दिले, तरच देव प्रसन्न होईल, असा त्यांच समज असतो किंवा कोणी करून दिलेला असतो. ही माणसे व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा पायी करून व जपअनुष्ठान करून देह कष्टवीत असतात. उपासतापाससारखी व्रते आचरून देहाला कष्ट देतात. अनवाणी अथवा दंडवत घालीत देवळाचा मार्ग आक्रमतात. देवळाला प्रदक्षिणा घालतात. हे देहाला दंड देण्याचे दु:ख मोठे असते. परंतु, नाम घेण्यात असे देहदंडाचे दु:ख नसते. स्वामी हे पुढील श्लोकात सांगत आहेत-

देहेदंडणेचे महां दु:ख आहे।
महां दु:ख ते नाम घेतां न राहे।
सदाशील चिंतीतसे देवदेवा।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥73॥
देहाला कष्ट देऊन व्रतवैकल्ये अनुष्ठाने करून देवाला प्रसन्न करून घेण्याचा प्रकार अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे. मग तो चुकीचा कसा असेल, अशी शंका काहीजण उपस्थित करतील. त्याला येथे समर्थांनी उत्तर दिले आहे. भगवान शंकरांना सर्वत्र मान्यता आहे. त्यांना देवाधिदेव अथवा महादेव म्हटले जाते. या भगवान शंकरांचा आदर्श आपण समोर ठेवला पाहिजे. समुद्रमंथनाच्या वेळी निघालेले विष स्वत: प्राशन करून जगाला विनाशापासून ज्यांना वाचवले, ते महादेवसुद्धा रामनामाचा जप करतात. रामनामाने त्यांना स्वास्थ्य लाभले, असे त्यांनी पार्वतीला सांगितले आहे. जर भगवान शंकर रामनाम घेतात, तर आपण त्यांच्या पुढे क्षुल्लक, असल्याने आपणही रामनाम का घेऊ नये. हा सदाशिवाचा आदर्श आपण समोर ठेवावा. रोज प्रभाती रामाचे चिंतन करावे.






आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..