कोंबडं झाकलं तरी...

    07-Dec-2022   
Total Views |
corona


कोरोनाचे उगमस्थान कुठले? कोरोनाचा प्रसार कुठून झाला? कोरोना आकडेवारी कुणी लपवून ठेवली? कोरोना महामारीबद्दल जगाची दिशाभूल कुणी केली? जगभरातील सर्वच देशांनी कोरोना हद्दपार केल्यानंतरही कुठला देश या महामारीशी अद्याप झगडत आहे? पर्यायाने वरील सर्व प्रश्नांचे एकच उत्तर असेल ते म्हणजे चीन!


शी जिनपिंग स्वतःला चीनचे हुकूमशाह म्हणवून घेतात आणि मरण येईपर्यंत ते कायम याच पदावर राहणार असल्याचा दावा त्यांचा चिनी कम्युनिस्ट पक्ष करत असतो. या सगळ्याचा उहापोह आजघडीला करण्याचे कारण ते म्हणजे, कोरोना महामारीच्या दरीत जगाला ढकलण्याच्या पापाने बरबटलेले चीनचे हात आता धुपता धूपत नाहीत. चीनची पापं तरंगू लागण्याची आणखी एक वेळ आता आली आहे. नोव्हेंबरमध्ये एकाच दिवसांत 31 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळण्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. आता ही आकडेवारी चिनी असल्याने किती खरी किती खोटी, हा वादाचा विषय ठरू शकतो. मात्र, चीनमधील ‘आयफोन’ निर्मितीचे शहर असलेल्या झेंग्झौमध्ये ‘लॉकडाऊन’विरोधात जनता रस्त्यावर उतरली. या कारणास्तव चिनी सरकारने पुन्हा पाच दिवसांचा ‘लॉकडाऊन’ लावला होता.


‘फॉक्सकॉन’ कारखान्यात हिंसक निर्दशने झाली. कामगारांना डांबून ठेवल्याचा आरोप होत होता. यात सगळ्यात आता चीनच्या पापाला दुजोरा देणारी बातमी प्रसिद्ध झाली. कोरोनाची उत्पत्ती ही वुहानच्याच प्रयोगशाळेतून झाली. ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी’त कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञ संशोधकांनी प्रकर्षाने सुरक्षेची खबरदारी घेतली नाही, असा आरोप याच प्रयोगशाळेशी संलग्न असलेल्या संशोधक व लेखकाने केला आहे. कोरोनाचे उगमस्थान हे चीनच आहे, असा दावा वारंवार यापूर्वीही करण्यात आला. दै. ‘मुंबई तरुण भारत’, ‘कोरोना विषाणू हा मानवनिर्मितच?’ ही लेखमालिकाही प्रसिद्ध झाली होती. या संदर्भातील आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांचे विश्लेषणही ‘कोविड’काळात प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावेळी विविध संशोधन आणि बातम्यांद्वारे कोरोना महामारी ही मानवनिर्मितच असून, त्याचा विस्फोट हा वुहानच्या चिनी प्रयोगशाळेतूनच झाला असल्याचा तर्क मांडण्यात आला होता.


आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्था असलेल्या ‘द सन’ने केलेल्या वृत्तांकनानुसार, चिनी अर्थपुरवठ्यावर सुरू असलेल्या ‘द वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरलॉजी’तूनच कोरोनाची निर्मिती झाली, कोरोनाचा प्रसार जगभर झाला तसेच इथल्या शास्त्रज्ञांनी सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या हलगर्जीपणामुळेच कोरोनाच्या विळख्यात अवघे जग अडकले, असा दावा शास्त्रज्ञ एण्ड्रयू हफ यांनी केला आहे. ‘द ट्रुथ अबाउट वुहान’ या पुस्तकात वुहानमध्ये सुरू कारस्थानांची पोलखोल करण्यात आली आहे. एण्ड्रयू हफ हे न्यूयॉर्कच्या ‘इकोहेल्थ अलायन्स’चे माजी उपाध्यक्ष आहेत. कोरोनासारख्या विषाणूंवर ही संस्था संशोधन करते. कोरोनावर अध्ययन करत असताना वुहानच्या प्रयोगशाळेत सुरक्षिततेबद्दल कुठलेही तारतम्य ठेवण्यात आले नाही. अशाप्रकारच्या संशोधनासाठी किमान जैविक सुरक्षिततेची पातळी ही चार इतकी असायला हवी होती.


 मात्र, ती एक इतकीच ठेवण्यात आली होती. या सगळ्या पापात अमेरिकन सरकारही तितकेच जबाबदार आहे. कोरोना विषाणूवर संशोधन करण्यासाठी निधी हा अमेरिकेतूनच पुरविण्यात आला. 9/11च्या हल्ल्यानंतर अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचे हे सर्वात मोठं अपयश असल्याचा दावाही याच पुस्तकात करण्यात आला आहे. अशा प्रकारचे जीवघेण्या संशोधनाला आपल्याच देशातून रसद पुरविली जात आहे. त्याचा प्रयोगही आपल्या देशासह जगभरातील इतर देशांविरोधात केला जाणार असल्याची साधी कल्पनाही अमेरिकेला लागली नाही.चीनविरोधात जो कुणी आवाज उचलेल तो शास्त्रज्ञ, पत्रकार गायब होत चालला होता. अनेक चिनी संशोधकांचा मृत्यू हा गूढरित्या झाला होता. तरीही अद्याप चिनी तुकड्यांवर जगणारे कथित लिबरल कोरोना हा चीनमधील उगम असल्याचे मान्य करायला तयारच होत नाहीत. उघड उघड सत्य समोर असताना चीनने दिलेली झापडं लावूनच आहेत. भविष्यात चीनचे असेच आणखी काळे कारनामे उघड झाल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे कितीही कोंबडं झाका, तांबडं उगवल्याशिवाय राहात नाही!





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.