पर्यटकांना होणार सिंहाचे दर्शन; येणार अजून दोन नवे सिंह

वनमंत्र्यांच्या उपस्थित राष्ट्रीय उद्यानातील विविध विकास कामांचे उद्घाटन

    06-Dec-2022
Total Views |
Gujrat Lion
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गुजरातहून बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आलेल्या सिंहाच्या जोडीला मंगळवारी सिंह सफारीतील मुख्य पिंजऱ्यात सोडण्यात आले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. त्यामुळे या आठवड्यापासून मुंबईकरांना सिंहाचे दर्शन घेता येणार आहे.

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारीला खीळ बसली होती. सफारीमधील पिंजराबंद अधिवासातील सिंहांच्या मृत्यूमुळे गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांना या प्राण्याचे दर्शन झाले नव्हते. यामुळे सफारीव्दारे मिळणारा महसूल देखील बंद झाला होता. त्यामुळे सफारीला चालना देण्यासाठी दोन आठवड्यांपूर्वी वन विभागाने गुजरातहून सिंहाची एक जोडी राष्ट्रीय उद्यानात दाखल केली. जुनागढ येथील सक्करबाग प्राणिसंग्रहालय वाघाची एक जोडी देऊन राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने त्यांच्याकडून तीन वर्षीय सिंहाची जोडी मिळवली. मुंबईत दाखल झाल्यापासून या सिंहाना उद्यानामधील पिंजराबंद अधिवासातील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी अलग ठेवण्यात आले होते. मंगळवारी वनमंत्री मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत या सिंहांना सिंह सफारीमधील मुख्य पिंजऱ्यामध्ये सोडण्यात आले. यावेळी त्यांनी गुजरातहून सिंहाची अजून एक जोडी आणण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. 

येत्या काही दिवसांमध्ये या सिंहांचे दर्शन मुंबईकरांना घेता येणार आहे. भारतीय स्टेट बँकेने या सिंहांना दत्तक घेतले असून दोघांच्या पालनपोषणाचा खर्च दत्तक शूल्याव्दारे केला जाणार आहे. यावेळी वाघाटी मांजराच्या (रस्टी स्पॉटेड कॅट) संवर्धन केंद्राचे उद्घाटन वनमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. वाघाटी ही जंगलात अधिवास करणारी आकाराने सर्वात लहान मांजर आहे. या मांजरीचे प्रजनन केंद्र राष्ट्रीय उद्यानात बांधण्यात आले असून ते भारतातील पहिले वाघाटी प्रजनन केंद्र आहे. तसेच या प्रसंगी आमदार प्रवीण दरेकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणाऱ्या वन ग्रंथालयाचे देखील भूमीपूजन यावेळी पार पडले. या कार्यक्रमाला खासदार गोपाल शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, सतीश वाघ, आमदार प्रकाश वाघ, प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक मल्लिकर्जुन आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव, पश्चिम) डाॅ. व्ही. क्लेमेंट बेन उपस्थित होते.