जय श्रीराम !

    04-Dec-2022   
Total Views |
 

rahul gandhi
 
 
 
 
"रा. स्व.संघ, भाजप ‘जय श्रीराम’ म्हणतो. त्यात फक्त रामाचे नाव आहे, सीतेचे नाही. ते ‘जय सीयाराम’ म्हणूनच शकत नाही. कारण, त्यांच्या संघटनेतही एकही स्त्री नाही,” असे राहुल गांधी म्हणाले. आणि असे म्हणे त्यांना रस्त्यावर भेटलेल्या एका पंडिताने सांगितले. असो. रा. स्व. संघ, भाजपमध्ये महिला नाहीत? राहुल विसरले की काय, भाजपच्या स्मृती इराणी अमेठीमधून निवडणूक लढवणार म्हटल्यावर त्यांनी अमेठीला राम राम ठोकला, नव्हे त्यांच्या भाषेत अमेठीला ‘टाटा टाटा बाय बाय’ केले आणि ते वायनाडला गेले. स्मृती इराणी तर महिला आहेत. मग भाजप रा. स्व. संघामध्ये महिला नाहीत, असे ते कसे म्हणू शकले? रा. स्व. संघाशी संबंधित अनेक आयामांमध्ये लाखो महिला समाजकार्य करतात, हे राहुल यांना माहिती नसेलच. त्यांच्या ‘बाल’बुद्धी (बाल की बावळट?) प्रमाणे त्यांनी ‘जय श्रीराम’ या स्फूर्तिमंत्राला नाकारण्याचा प्रयत्न केला.
जगभरातल्या हिंदूंच्या मनात धर्मनीतीची ज्योत तेवणार्‍या ‘जय श्रीराम’ या शब्दाबद्दल राहुल यांना काहीतरी माहिती असेल का?‘जय श्रीराम’ हे ते शब्द उच्चारणार्‍यांसाठी धर्मअस्मिता आणि नीतितत्त्वाची ओळख असलेला परवलीचा शब्द आहे. एखाद्याच्या मनात अधर्माविरोधात स्फुल्लिंग चेतवायचे असेल, तर ‘जय श्रीराम’सारखा दुसरा मंत्र नाही. हे राहुल यांना माहिती असण्याचे काही कारण नाही. कारण, ‘मियाची दौड मशिदी’पर्यंत तशी राहुल यांची दौड आईच्या इटलीपर्यंत आहे. त्यांच्या मातोश्री इटलीच्या आहेत. त्यामुळे हिंदू धर्मसंस्कार राहुल यांना मातेकडून मिळणे शक्यच नाही. राहुल यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्याच काळात तर संविधानामध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द अक्षरश: घुसवला गेला. त्यांचे पणजोबा नेहरू तर म्हणालेच होते की, ते अपघाताने हिंदू होते. राहुल यांचे पिताश्री फिरोज यांच्याकडून राहुल यांना ‘जय श्रीराम’ वगैरेंबद्दल ज्ञान मिळाले असावे, तर तसेही नाही. त्यामुळे राहुल यांना ‘जय श्रीराम’ मंत्राचे महत्त्व नाही. थांबा, हे मी म्हणत नाही तर रस्त्यात एक मौलवी टाईप भेटलेले काका म्हणत होते. कसे म्हणजे? ‘जय श्रीराम’बद्दल प्रश्न विचारणारे एक पंडित राहुल यांना रस्त्यात भेटले होते. अगदी तसेच राहुल यांना ‘जय श्रीराम’ शब्दाबद्दल माहिती का नसेल, असा तर्क करणारे
मौलवी काका मला रस्त्यात भेटले होते. खरंच! राहुल यांना भेटलेले पंडित जितके खरे तितकेच खरे मला भेटलेले मौलवी होते. (मला तरी मौलवी वाटत होते) जय श्रीराम!
 
 
‘तुकडे-तुकडे’ गँग ‘जेएनयु’ छोडो!
 
 
 
'ब्राह्मण कॅम्पस छोडो’, ‘ब्राह्मण भारत छोडो’ और ‘ब्राह्मण-बनिया, हम बदला लेंगे, वहां खून होगा, हम तुम्हारे लिए आ रहे हैं’,
दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयच्या कॅम्पसमधील कितीतरी भिंतींवर ही समाजविघातक आणि द्वेषमूलक वाक्य गुरुवारी लिहिलेली आढळली. या विश्वविद्यालयाच्या प्रशासनाने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. प्रशासनाने म्हटले आहे की, ‘स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज अ‍ॅण्ड ग्रीव्हेन्स कमिटी’ या घटनेबाबत तपासणी करून अहवाल तयार करेल आणि तो अहवाल शक्य तितक्या लवकर कुलगुरू शांतिश्री पंडित यांना सादर करेल.
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय म्हणजे ‘जेएनयु’मध्ये असे घडणे नवे नाहीच. दहशतवाद्यांसंदर्भात सहानुभूती दाखवून ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार’ असे म्हणणारी गद्दार पिल्लावळ ’जेएनयु’मधीलच होती. देशात बहुसंख्य हिंदू आहेत. त्यांच्या भावना दुखावण्यासाठी ‘बिफ फिस्ट पार्टी’ ठेवणारे विद्यार्थीही इथलेच! ’जेएनयु’च का? देशभरातल्या अनेक विश्वविद्यालयांमध्ये अशी घातक मानसिकता असलेले विद्यार्थी आहेत. त्यांची तशी मानसिकता कशी काय घडते? ‘काश्मीर फाईल्स’मधली ‘प्रोफेसर’ जरूर आठवा. एका निष्पाप विद्यार्थ्याला मानवतेचा आव आणून ती चिथावणी देते ते आठवा. ‘जेएनयु’मध्ये आणि देशभरातील विश्वविद्यालयांमध्ये शिकवणार्‍या प्राध्यापक, मार्गदर्शक यांची वैचारिकता तपासली तर? सगळेच तसे नाहीत. पण, एक नासके फळ सगळ्या फळांना नासवते. तसेच घातक वृत्तीच्या अध्यापक आणि विद्यार्थ्यांमुळे विश्वविद्यालयाचे नाव बदनाम होत आहे. पुरोगामी म्हणजे देशाच्या विरोधात बोलणे आणि चिथावणी देणे, देशाच्या संस्कृती रितीरिवाजांविरोधात वागणे, ही शिकवण कुठून बर या विद्यार्थ्यांना मिळत असेल? देशात घुसखोरी केलेले रोहिंग्या मुसलमान, बांगलादेशी मुसलमान, समाजकंटक शोधणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच महत्त्वाचे आहे, ते देश-समाजात फूट पाडावी, अशी इच्छा ठेवणार्‍या अध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना शोधून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची. ब्राह्मण, बनियाच नव्हे तर कोणत्याही समाजातला नागरिक भारत सोडणार नाही, उलट देशविघातक वृत्तीच्या लोकांना ‘जेएनयु’ आणि देशही सोडण्याची वेळ यायला हवी सगळ्या भारतीयांची ही मागणी आहे. ‘तुकडे तुकडे’ गँग ‘जेएनयु’ छोडो!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.