कायम विस्तारत जाणार्या मानवी वस्तीमुळे वन्यजीवांच्या अधिवासावर गदा येताना दिसून येते. याचा परिणाम म्हणून मानवी वस्तीत वन्यजीवांचा वावर वाढतो. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस सकाळी 8च्या सुमारास, कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी जवळील अनुराग सोसायटीत एक प्रौढ नर बिबट्या शिरला आणि नऊ तासांचे धाडसी बचाव नाट्य घडले. ही घटना का घडली असावी, याची ऊहापोह करणारा हा लेख...
ठाणे जिल्ह्याचे वन्यजीव वॉर्डन अविनाश हरड यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीत राहणार्या एका स्थानिकाने वन विभागाला बिबट्याची माहिती दिली. खबरदारीचा उपाय म्हणून विभागाने रहिवाशांना त्यांचे दरवाजे आणि खिडक्या बंद करण्यास सांगितले आणि बिबट्याला चिथावणी देऊ नका. कारण, तो स्वसंरक्षणार्थ लोकांवर हल्ला करू शकतो, असेदेखील बजावले.
या घटनेबद्दल सांगताना ठाणे वन विभागाचे (प्रादेशिक) उप वनसंरक्षक (डीसीएफ), संतोष सस्ते म्हणाले की, ”जवळपास आठ-नऊ तास चाललेल्या या कारवाईत विभागाच्या टीमने यशस्वीरित्या या बिबट्याला पकडले.” त्यांनी हेदेखील नमूद केले की, टीमने भाग घेतलेल्या सर्वात आव्हानात्मक ऑपरेशनपैकी हे एक होते. मात्र, प्राणी पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीमुळे त्यांचे काम गुंतागुंतीचे झाले होते. प्रक्रियेदरम्यान, घाबरलेल्या या बिबट्याने स्वसंरक्षणार्थ तिघांना जखमी केले. वाचकांनी ही लक्षात घेणं गरजेचं आहे की, हल्ला हा संरक्षणार्थ होता. कुठलाही वन्यजीव सहजासहजी मानव प्रजातीच्या वाटेल जात नाही.
कल्याणजवळील या शहरी परिसरात बिबट्या दिसल्याने काहींना आश्चर्य वाटल असेलदेखील. पण यात खरंतर काहीच आश्चर्य वाटण्याजोग नाही. का? याचे उत्तर आहे, ‘वन्यजीव कॉरिडॉर.’ अर्थात, ‘वाईल्डलाईफ कॉरिडॉर.’ चला, आज आपण या गोष्टीसंबंधी काही जाणून घेऊ.
एकेकाळी भारत लांब आणि अखंड पसरलेल्या जंगलांनी व्यापलेला होता. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये अनेक कारणांमुळे, विशेषत: मानवाच्या विकासात्मक उपक्रमांमुळे, जंगली क्षेत्र खूपच कमी झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, मोठ्या जंगलांचे छोटे-छोटे तुकडे झाले आहेत. अशा स्थितीला ’विखंडन’ असे म्हणतात. विखंडनाचे दीर्घकालीन दुष्परिणाम अनेक आहेत. जसजशी जंगले लहान तुकड्यांमध्ये विभागली जाऊ लागली तसतसे प्राण्यांची लोकसंख्यादेखील विखुरली जाऊ लागली. एखाद्या प्राण्याची लोकसंख्या, लहान लहान उप-लोकसंख्यांमध्ये वाटली जाणे, त्या प्राण्याच्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी चांगली घटना नाही.
Behavior of wildlife in human settlementsपण, चांगली बातमी अशी आहे की, जंगलाच्या या तुकड्यांना काही नैसर्गिक रचना जोडून ठेवतात. या रचनांमध्ये काही झाडे आणि झुडुपे असू शकतात. वनस्पतींचे हे तुरळक पट्टे, आपल्याला फारसे महत्त्वाचे वाटत नसले, तरी प्राण्यांसाठी तो पट्टा एखाद्या आकर्षक महामार्गासारखा किंवा त्यांच्या घरांना जोडणार्या पुलासारखा भासतो. ह्याच नैसर्गिक जंगली परिसरांना जोडणार्या पूलाला वन्यजीव कॉरिडॉर म्हणतात.
प्राण्यांना, विशेषत: मोठ्या प्राण्यांना, हत्तींसारखे किंवा वाघांसारख्या मोठ्या प्राण्यांना जंगलात जगण्यासाठी आणि त्यांची निरोगी जनसंख्या राहण्यासाठी, मोठ्या क्षेत्राची आवश्यकता असते. जेव्हा मोठ्या जंगलांचे छोटे तुकडे केले जातात तेव्हा या प्राण्यांना मोठ्या प्रमाणात प्रादेशिक दबाव, अधिवास नष्ट होणे इत्यादींचा सामना करावा लागतो. मग जर हे विखुरलेले जंगल, चांगल्या संसाधनाने समृद्ध असले आणि इतर कोणत्याही जंगलाशी पूर्णपणे जोडलेले नसले तर काय होते? या क्षेत्रातील प्राण्यांची संख्या कालांतराने वाढू लागते. कारण, प्राण्यांची लोकसंख्या जंगलातील अन्नासारख्या इतर संसाधनांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. परंतु, जंगल वेगळे असल्यामुळे अतिरिक्त लोकसंख्येला कुठेही जाणे शक्य होत नाही व म्हणून पर्यायी आवासाअभावी, या प्राण्यांना जंगलाच्या लागून असलेल्या भागात जावेच लागते. दुर्दैवाने या क्षेत्रात बर्याचदा लोक राहतात. यामुळे मनुष्य-प्राणी संघर्षाच्या या अशा भागांमधूनच जास्तीत जास्त वेळ नोंदी होतात.
आता विचार करा, जर जंगलाचा हा तुकडा एका कॉरिडोरने शेजारच्या जंगलाशी जोडला गेला असेल, तर ते प्राण्यांसाठी चांगले नाही का? प्राणी अशाच कॉरिडोरने एका जंगलातून दुसर्या जंगलात जातात आणि नवीन लोकसंख्या स्थापन होते. लहान लोकसंख्येसह, अत्यंत विस्कळीत असलेले क्षेत्र, प्राण्यांच्या लोकसंख्येला स्थिरता देऊ शकत नाही. परंतु, चांगली लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांशी जोडले गेल्यास, कमी लोकसंख्यांक क्षेत्रातदेखील प्राण्यांची संख्या वाढू लागते. चला, या कॉरिडोरचे महत्व पटवून देणारे एक उदाहरण बघू.
कल्याणमध्येदेखील असेच काहीतरी घडले आहे. आणि म्हणून त्या भागात बिबट्या दिसणे, यात काहीही नवल नाही. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याला तानसा वन्यजीव अभयारण्य आणि हाजीमलंग जंगलाशी जोडणारा एका वन्यजीव कॉरिडॉरबद्दल तज्ज्ञांना आधीपासूनच माहिती होती. कल्याण, उल्हासनगर आणि बदलापूरमधील जंगले ही या कॉरिडोरमध्ये येतात. या शहरांमध्ये नागरीकरण जसजसे वाढत गेले, शहराला जोडून असलेली नैसर्गिक जंगलं मानवाने काबीज केले आहेत. आपण अतिक्रमणाने ताब्यात घेतल्याने जंगलांचे आता काँक्रीटच्या जंगलात रूपांतर झाले आहे. हाजीमलंग जंगलातून बिबट्या दिसल्याच्या बातम्या वारंवार येतात आणि इमारतीत घुसलेला बिबट्या तिथूनच आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे बिबटे, वन्यजीव कॉरिडोरचा वापर करून फक्त एका जंगलातून दुसर्या जंगलात जात आहे आणि आता काही वर्षांत अचानक वाटेत शहर येऊ लागले आहे, यात त्यांचा काय दोष?
या कॉरिडोरच्या मधोमध असलेल्या जंगलांना संरक्षिततेचा दर्जा देण्याची वेळ आली आहे, असे मला वाटते. जेणेकरून अशा घटना टाळल्या जातील. बिबट्यांव्यतिरिक्त, वन्यजीव कॉरिडोर क्षेत्रात इतर अनेक वन्यजीव आढळतात. काही दुर्मीळ पक्षीदेखील या कॉरिडोरचा वापर करत आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.
बचावकर्त्यांच्या धाडसी प्रयत्नांनी बिबट्याची सुटका करून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्या बचाव केंद्रात हलविण्यात आले. पण विचार करण्याजोगी गोष्ट हीच आहे की, जर या कॉरिडोरचा अभ्यास करून यात घरं बांधलीच गेली नसती, तर अशा घटना घडल्याच नसत्या ना?
'कॉरिडॉर' म्हणजे काय ?
दक्षिण कर्नाटकात, एमएम हिल्स वन्यजीव अभयारण्य 2013मध्ये तयार करण्यात आले. इथे वाघांची संख्या खूपच कमी होती, म्हणजे या 900 चौरस किलोमीटर परिसरात फक्त 10-12 वाघ होते. तेच लगतच्या ’बीआरटी’ डोंगरांच्या सुमारे 470 चौरस किलोमीटर क्षेत्रात तब्बल 50पेक्षा जास्त वाघ आढळतात. शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे की, ‘बीआरटी’मध्ये जन्मलेले वाघाचे पिल्लू एमएम हिल्स वन्यजीव अभयारण्यात दोन वर्षांच्या कालावधीत स्थलांतरित झाले होते आणि त्यांनी या बछड्याने यशस्वीपणे इथे त्याचा प्रदेशदेखील स्थापन केला. या दोन्ही अभयारण्यांना जोडणारा प्रदेश हाच वन्यजीव कॉरिडॉर होय! या कॉरिडॉर्समुळेच जनुकीय विविधतादेखील टिकवून ठेवण्यास निसर्गाला मदत होते. म्हणून, पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला काही झाडे जंगलांच्या पट्ट्यांशी जोडलेली दिसतील, तेव्हा लक्षात ठेवा की, हा एक पूल आहे जो एखाद्याच्या कल्पनेपेक्षा अधिक मौल्यवान आहे.
- डॉ. मयुरेश जोशी