भीमा-कोरेगावच्या नावानं...

    31-Dec-2022   
Total Views |
Bhima-Koregaon


आज, दि. १ जानेवारी... ‘चलो भीमा- कोरेगाव’ म्हणत हजारो लोक कोरेगाव- भीमाच्या त्या जयस्तंभाला भेट द्यायला जातील. ते त्यांचे स्वातंत्र्यच आहे. मात्र, २०१८ साली भीमा-कोरेगावच्या नावाने भडकलेली हिंसा जवळून पाहिली होती. त्या अनुषंगाने या जयस्तंभाबद्दल मला कुतूहल होते. त्याबद्दल माहिती घेतल्यानंतर जे कळले ते इथे मांडण्याचा प्रयत्न केला. जे कळले त्याचा निष्कर्ष एकच की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन, त्यांचे विचारकार्य यांच्याशिवाय कुणीही समाजाचे विजयस्तंभ किंवा आदर्श होऊच शकत नाही!


”१ जानेवारी भीमा-कोरेगावला जायलाच पाहिजे. आपल्या लोकांच्या शौर्याचा दिवस आहे. आपले ५०० महार पेशव्यांच्या २८ हजार सैन्याला भारी पडले. पेशवे हरले. शूर महार जिंकले!!” भीमा-कोरेगावचे महत्त्व सांगताना हे असेच समाजात सरसकटपणे सांगितले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीअंत सांगितला आहे. १९५६ नंतर बहुसंख्य समाजाने बौद्ध धम्म स्वीकारून महार जातीचा त्याग केला. मग त्याग केलेल्या जातीचा अभिमान वाटतो, हे कसे काय? एरवी कुणी ‘महार’ हा शब्द जरी उच्चारला तरीसुद्धा जातीवाचक शब्द वापरून मानहानी केली, असे सर्रास म्हटले जाते. मग या स्तंभाच्या नावाने जातीचा उद्गार का? खरे तर कोरेगाव-भीमामध्ये असा काही स्तंभ आहे, हे २०१८ पूर्वी फार कमी लोकांना माहिती होते. मात्र, २०१८च्या हिंसेने स्तंभाला प्रसिद्धी मिळाली. या स्तंभाच्या इतिहासाबाबत खरे काय, याबाबत जाणून घेण्याचा किंवा जाणून देण्याचा प्रयत्न फारसा कुणी केलेला नाही. मी काही इतिहासकार नाही. मात्र, कोरेगाव-भीमासंदर्भात काही ऐतिहासिक तथ्य वाचल्यावर, पाहिल्यावर काही गोष्टी स्पष्ट आणि ठळकपणे जाणवल्या, त्या या लेखात मांडल्या आहेत.

ही लढाई काही त्याकाळच्या मागासवर्गीय समाज विरूद्ध ब्राह्मण किंवा इतर सवर्ण समाजाविरोधात मुळीच नव्हती. दुसरे असे की, या लढाईत कुणीही निर्णायक विजय मिळवला नाही; ना इंग्रजांनी ना विरोधातील पेशव्यांनी. तसेच इंग्रजांतर्फे या लढाईत जो प्रमुख होता तो साधा अधिकारी होता. मात्र, त्याने निर्भयपणे (अर्थातच फोडा, तोडा आणि लुबाडा) हे युद्ध लढवले म्हणून इंग्रजांनी या अधिकार्‍याला बढती दिली. हा लढाईचा जो काळ होता, त्या काळी ब्रिटिशांच्या सत्तेने भक्कमपणे पाय रोवले नव्हते. देशातील जातीपातींना आपसात लढवले, तर देशात पाय रोवता येईल, ही अटकळ ब्रिटिशांना आलीच होती. त्यामुळे त्यांनी या युद्धात मृत पावलेल्या व्यक्तींच्या नावे एक स्तंभ उभारला. या युद्धात २० महार समाजातील व्यक्ती मृत पावल्या होत्या आणि पाच जण जखमी होते. तसेच त्यावेळचे सत्ताधारी पेशवा खूपच अत्याचार करतात म्हणून समाज इंग्रजांच्या सोबत लढायला गेला नव्हता. तसे असते तर मग ही संख्या जास्त हवी होती. कारण, अत्याचाराविरोधातल्या लढाईची क्रांती ज्वाला चटकन पसरते, हा इतिहास आहे. ५०० व्यक्तींनाच पेशव्यांच्या अत्याचाराविरोधात लढावेसे का बरं वाटले?

 
 थोडक्यात, जे या इंग्रजांसोबत लढायला गेले होते, ते इंग्रजांच्या सैन्यात भरती झाले होते म्हणून. इंग्रज त्यांचे मालक होते. ते जिथे सांगतील, तिथे त्यांना लढणे भागच होते. याचीच दुसरी बाजू अशी की, त्याचवेळी पेशव्यांच्या सैन्यात कोण लढत होते? ते हजारो सैन्य ब्राह्मण होते का? तर नाहीच! अरब, गोसावी आणि मराठा हे सैनिक पेशव्यांसोबत लढत होते. या सगळ्या सैनिकांना काय इंग्रजांचा किंवा त्यांच्या सैन्यात लढणार्‍या महार समाजाचा राग होता का? शक्यच नाही. तर अरब, गोसावी आणि मराठा समाज कोरेगाव-भीमा लढाई लढला. कारण, ते पेशव्यांच्या सैन्यात होते. उद्या समजा पेशव्यांनी त्यांना इतर कुणासोबत लढवले असते तरी ते लढलेच असते.आता काही ठरावीक लोक मला जातीवाचक ठरवतील, तर पहिलेच सांगितलेले बरे की, मी भले जन्माने इतर मागासवर्गीय समाजातली असले तरी ‘भिमराज की बेटी’ आहे. डॉ. बाबासाहेबांनी सत्य तपासण्याची शक्ती आपल्याला दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही या जयस्तंभाला भेट दिली होती. याचवेळी द्रष्टा बाबासाहेब जे म्हणाले ते अत्यंत महत्त्वाचे आहे.

कोरेगाव-भीमाच्या युद्धात समाजातील व्यक्ती इंग्रजांच्या बाजूने लढली. याबाबत ते म्हणाले की, “ब्रिटिशांच्या बाजूने महार सैनिकांनी लढावे ही काही विशेष अभिमानाची गोष्ट आहे, असे नाही हे खरे; पण ते ब्रिटिशांच्या मदतीस गेले? स्पृश्य हिंदूंनी त्यांना नीच मानून कुत्र्या-मांजरापेक्षा वाईट वागविले म्हणून! पोट भरण्याचे काही साधन नसल्यामुळे नाईलाजाने ते ब्रिटिशांच्या फौजेत भरती झाले हे लक्षात ठेवले पाहिजे.”डॉ. बाबासाहेबांचे समाजावर, या देशावर अनंत उपकार आहेत. त्यांच्या सुवचनांची मोडतोड करून आपल्या स्वार्थासाठी वापर करणारे काही विकृत महाभाग आहेत. बाबासाहेबांची ’मी प्रथम भारतीय आणि अंतिमही भारतीय’ ही राष्ट्रत्वाची संकल्पना अशा लेकांना मान्य नाहीच. त्यांना बाबासाहेबांची जातीअंताची लढाईही मान्य नाही. जातीअंत झाला, तर दोन समाजात तेढ माजवता येणार नाही आणि समाज-देश अस्वस्थ करता येणार नाही, असे या समाजविघातक शक्तींना वाटते. मग हे लोक जातीच्या नावाने काहीबाही उकरून काढतात आणि भोळ्या भाबड्या समाजाला त्यात गुंंतवतात. या अशाच लोकांचे म्हणणे असते की, ”सदैव वंचित राहिलेल्या समाजाचे शौर्य उच्चजातीच्या लोकांना पाहवत नाही म्हणून ते भीमा-कोरेगावला विरोध करतात.


पेशव्यांच्या राज्यात मागास समाजाला गळ्यात मडके आणि कंबरेला झाडू बांधून फिरावे लागे. या त्रासाला कंटाळून पेशव्यांना हरवण्यासाठीच समाज एकवटला होता. त्यांनी पेशव्यांची सत्ता खाली खेचली आणि इंग्रजांचा युनियन जॅकचा झेंडा पडकवला.” आजही समाजातल्या तरूणाईशी बोलले, तर त्यांचे म्हणणे असते की, ”मग आमच्या बापजाद्यांच्या गळ्यात मडके आणि कंबरेला झाडू बांधले, आम्हाला त्रास दिला, ज्यांनी हे केले त्यांचे वारसदार आमचे मित्र कसे होतील?” याबाबत एक महत्त्वाची चर्चा इथे नमूद करावीशी वाटते. पेशव्यांच्या काळात मागास समाजघटकांतील व्यक्तींच्या गळ्यात मडके आणि पाठीला झाडू लावण्याची सक्ती होती की नव्हती, याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंत नरसिंह केळकर यांच्यात पत्रव्यवहार झाला होता. पत्रव्यवहारात बाबासाहेबसुद्धा म्हणाले की, ”गळ्यात मडकी किंवा कंबरेला झाडू बांधावे लागत असे, याबाबत पुरावा नाही. पण, हे समाजात वयस्कर लोक सांगतात. दंतकथा आहे आणि त्याचा पुरावा देऊ शकत नाही.”

विद्वत्तेचा महासागर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच जिथे याबाबत पुरावा नाही, असे म्हटले तिथे आज समाजातील काही लोक मोठ्या द्वेषाने हा दंतकथेचा, सांगोवांगीचा इतिहास गोरगरिबांच्या वस्तीतील तरुणांना शोधून का सांगत आहेत? यातून आजच्या मागास समाजाचे काय भले होणार आहे? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेला मोठ्या विश्वासाने दिलेल्या धम्मात या कोरेगाव-भीमाचे काय योगदान आहे? की आज समाजाने त्या आदर्श शिंदेच्या गाण्याला पुरावा मानायचे? त्याच्या ‘कोरेगाव-भीमा केले’ या गाण्यात तो म्हणतो, “महार पेशव्यांना म्हणाले की, तुम्ही आम्हाला सन्मान द्या. आम्ही तुमच्यासाठी प्राण देऊ. यावर अहंकाराने पेशव्यांचा बाजीराव चिडतो. तो म्हणतो, आमची जात उच्च आणि तुम्ही अतिशुद्र. आमच्याकडे मानाची आस बाळगता?श्वानासारखीही तुमची बरोबरी नाही. अशी कर्मठ त्या कावळ्याने कावकाव केली आणि मग पेटलेल्या लोकांनी कोरेगाव-भीमा केले कोरेगाव-भीमा!” शिक्षणामुळे तर्कसंगत विचार करायला लागलेल्या तरुणाईने विचार करावा की आदर्श शिंदे म्हणाला ते खरे आहे का? आदर्श शिंदे याला या गाण्याच्या सत्यार्थाबद्दल प्रश्न का विचारला गेला नाही? पण, म्हणून तो आज विचारायचाच नाही, असे नाही. वेळ अजूनही गेलेली नाही, तो प्रश्न विचारायलाच हवा, नाहीतर सत्य जाणून घ्या, त्यासाठी आवाज उठवा, असा महामंत्र देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आम्हाला माफ करणार नाहीत.

दुसरे असे की, कोरेगाव-भीमाची लढाई ज्या काळातली आहे, तो काळ आद्यक्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवेंचाही आहे. वस्ताद हे मातंग समाजाचे होते. पण, अगदी ब्राह्मणांपासून सर्वच अठरापगड जातीचे लोक त्यांच्या तालमीत यायचे आणि त्यांना गुरू मानायचे. तसेच, महात्मा जोतिबा फुल्यांचा जन्म १८२७ सालचा, म्हणजेच भीमा-कोरेगावचे युद्ध होऊन केवळ दहा वर्षे झाली असतील. जर गळ्यात मडके आणि कंबरेला झाडू बांधले जायचे म्हणून भीमा-कोरेगाव युद्धात ५०० लोक सामील झाले असतील, तर त्यानंतर १०-१५ वर्षांत ही पद्धत संपुष्टात आली का? अशी संपुष्टात आली की, औषधालाही कुणाला दिसली नाही? थोडक्यात, अस्पृश्यता होती, जातीभेद होता. ते भयानकच होते. मात्र आज गल्लीबोळात जाऊन हे समाजद्वेष्टे समाजातील भोळ्या तरुणांना सांगतात की, ब्राह्मणांच्या पेशवेकाळात तुम्हाला गळ्यात मडकी आणि कंबरेला झाडू बांधला गेला. या सांगण्याला कोणताही पुरावा नाही. त्यामुळे त्यात तथ्य नाही. या विषयाची चर्चा यासाठी की, भीमा- कोरेगाव युद्ध ‘पेशवा विरूद्ध महार’ असे लढले गेले, हे जे म्हंटले जाते ते धादांत खोटे आहे, हेच यातून सिद्ध होते.

असो. या वर्षी करणी सेनेने कोरेगाव- भीमाला पुन्हा खतपाणी घालण्याचे काम केलेले दिसते. देशात इतकी सगळी राष्ट्रीयत्वाची सकारात्मक कामे पडली असताना करणी सेनेचे म्हणे की, या जयस्तंभाच्या विरोधाचा विषय हातात घेतला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि ‘रिपाइं’ गटाचे सचिन खरात यांनी प्रतिक्रिया दिली. आव्हाडांना या जयस्तंभात इतिहासाची अनुभूती दिसली? पण, कशी ते त्यांनी सांगितली नाही. तसेच करणी सेना भीमा- कोरेगावला आल्यास त्यांचा खिमा होईल, असेही ते प्रतिक्रिया देताना म्हणाले. व्हा रे व्हा! किती संविधानात्मक विधान आहे हे? माजी मंत्री असलेल्या आव्हांडानी समाजातील भेद मिटवण्याऐवजी दोन समाजगटातील काही लोकांमध्ये विद्वेष आणि हिंसा पसरवण्याच्या गोष्टी केल्या, तर सचिन खरात यांचे म्हणणे करणीसेनावाले खैबर खिंडीतून आले. हे सचिन आणि त्यांच्यासारख्या लोकांचे आवडते गृहीतक.



‘मूलनिवासी दलित मुस्लीम भाई भाई, हिंदू कोम कहासे आई’ अशा घोषणा देत यांचे आयुष्य गेले. आपण सगळे भारतीय आहोत, आपला इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रीयत्व एक आहे, या संकल्पनेवर यांचा कधीही विश्वास नसतोच. सचिनच्या म्हणण्यानुसार, करणीसेना म्हणजे त्या सेनेला समर्थन करणार्‍यांचा समाज हा देशाबाहेरून आलेला आहे. सचिन त्यांच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देतील का? जयस्तभांचा विकास करणार, असे गेल्यावर्षी त्यावेळी असलेल्या महाविकास आघाडी सरकारने म्हटले होते. इतिहास काय सांगतो? त्याचे परिणाम काय? याचा विचार त्यांनी केला नसेलच. केवळ तिथे जमलेल्या हजारो लोकांना व्होटबँकेत कसे परावर्तीत करता येईल, असा त्यांचा विचार असावा.

या सगळ्या लोकांकडून काहीच अपेक्षा नाही. पण, म्हातारी मेल्याचे दुःख नसते,तर काळ सोकावतो याचेच दुःख आहे. हे सगळे गल्लीबोळातले नेते प्रत्येक घटनेत जातीयतेचे विष पेरतात आणि त्याचे बळी होतात सर्वसामान्य नागरिक. मी हे म्हणू शकते, कारण, २०१८च्या भीमा-कोरेगाव हिंसाचारात मी मुलुंड ते वडाळा विभागात मोजून १४ गटांना भेटले. हे गट पूर्व द्रुतगती मार्गावर उभे होते. त्यामुळे द्रुतगती मार्ग बंद होता. मुलुंड, भांडुप, विक्रोेळी, घाटकोपर, चेंबूर येथील रस्त्यांवर उतरलेल्या गटांमध्ये वयस्कर आयाबाया, अगदी लहान मूलंही होती. मी आयाबायांना विचारत होते ‘तुम्ही रस्त्यावर का आलात?’ तर त्यांचे म्हणणे होते, “का म्हणजे? तिथे भीमा- कोरेगावला आमच्या बायांना नागडं करून मारायला घेतलं. आमच्या बायांसाठी आम्ही रस्त्यावर आलो.” मी विचारले, तुम्हाला कुणी सांगितले? तर कुणालाही याचे उत्तर देता आले नाही.



 केवळ कर्णोपकर्णी त्यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचला होता. त्याच दिवशी विक्रोळी पश्चिमेला एका व्यक्तीची नुकतीच विकत घेतलेली कार जाळण्यात आली. त्याच्या घरात घुसून त्याला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचे साक्षीदार असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, घरात घुसणार्‍या त्या जमावात हिंसापीडित व्यक्तीचा वैयक्तिक द्वेष करणारे लोक होते. कम्युनिस्ट पार्टीचे झेंडेही या मोर्चात दिसले होते. तसेच, जमावात टोपीधारी आणि दाढीधारी युवक सक्रिय होते. हे सगळे ऐकून, पाहून खूप वाईट वाटले. पुढे या हिंसेमध्ये नक्षल्यांचा आणि फुटीरतावाद्यांचा सहभाग होता आणि फार झारखंड ते दिल्लीतून ते नक्षली समर्थक सहभागी झाले होते, हे तर कायद्याने स्पष्ट झाले.

असो. काही लोक म्हणतात की, प्रत्येक समाजाला त्यांच्या शूरतेचा इतिहास हवा असतो. त्यामुळे समाजाने भीमा-कोरेगावचा इतिहास जागवला, तर काय चुकले? यावर एकच वाटते की, ज्या समाजात, ज्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे महापुरूष जन्मले, तिथे परकीय इंग्रजांनी भारतीयांची दिशाभूल करण्यासाठी उभारलेल्या स्तंभाला जातीय अस्मिता आणि वारसा म्हणून मानणे हे अनाकलनीय आहे. ज्यांना डॉ. बाबासाहेबांचा जातीअंत मान्य नाही, तेच लोक किंवा ज्यांची दिशाभूल झाली आहे, असे भाबडे लोकच या स्तंभाला समाजाचा गौरवशाली वारसा समजत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्य दिले आहे. त्या स्वातंत्र्यानुसार, हे माझे मत आहे. बाकी कोरेगाव-भीमाच्या नावाने काहीबाही करण्यात समाजशत्रू मग्न असतीलच. समाजाने आता तरी सतर्क राहावे, जात म्हणून नाही, तर भारतीय म्हणून प्रत्येक घटनेकडे पाहावे. त्यात कोरेगाव- भीमाही आलेच!








आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.