विदेशी प्राणी-पक्षी पाळताय ? आता सावधान...!

वन्यजीव संरक्षण कायद्यातील सुधारित तरतुदींना मान्यता

    30-Dec-2022   
Total Views |
kangaroo





मुंबई (समृद्धी ढमाले) -
'वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२'मध्ये सुधारणा झाली असून आता या कायद्याअंतर्गत परदेशी प्रजातींनाही (एक्सझाॅटिक) संरक्षण देण्यात आले आहे. ’संयुक्त राष्ट्र संघा’अंतर्गत काम करणार्‍या ’कनव्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एनडेंजर्ड स्पिसीज ऑफ वाईल्ड फौना अ‍ॅण्ड फ्लोरा’मध्ये (सायटिस) समाविष्ट असलेल्या काही प्रजातींना या सुधारित कायद्यामध्ये संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या पुढे विनापरवाना या प्रजातींना पाळणे कायदेशीर गुन्हा ठरणार आहे. भारतातील वन्य प्रजातींना संरक्षण देण्याच्या हेतूने १९७२ साली वन्यजीव संरक्षण कायद्याची निर्मिती करण्यात आली.
काळानुरुप या कायद्यात १९७२ पासून अनेक सुधारणा केल्या गेल्या आहेत. यामधील नवीन सुधारणा २०२२ मध्ये करण्यात आली. या कायद्यातील सुधारित तरतुदींना नुकतीच मंजुरी देण्यात आली असून त्यासंदर्भातील अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सुधारित तरतुदींमध्ये 'सायटिस'अंतर्गत संरक्षित असलेल्या प्रजातींबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राच्या ’आययूसीएन’ या परिषदेने १९६३ साली ’सायटिस’ची स्थापना केली. वन्यप्राण्यांसह नैसर्गिक संपत्तीची आंतरराष्ट्रीय तस्करी त्यांच्या अस्तित्वाला धोका उद्भवू नये म्हणून खबरदारीच्या योजना निर्माण करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आले. १९७३ साली ८० देशांनी ’सायटिस’चे वन्यजीवांच्या तस्करीसंदर्भात नियम मान्य करून या परिषदेचे सदस्यत्व स्वीकारले. सध्या या परिषदेत भारतासह १३८ देश सदस्य आहेत. या कायद्याअंतर्गत आता 'सायटिस'मध्ये समाविष्ट असलेल्या प्रजातींना चौथ्या श्रेणीत संरक्षण देण्यात आले आहे. या श्रेणीत 'सायटिस'अंतर्गत संरक्षण दिलेल्या काही परदेशी प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे.
आज भारतामध्ये मोठ्या संख्येने परदेशी बॉल पायथन, स्कारलेट मकाव, विविध प्रकारचे लव्ह बर्ड, परदेशी पोपट, गोड्या पाण्यातील कासव, कांगारु, कोल्हे, पाणमांजर, हमिंग बर्ड, मार्मोसेट आणि करड्या रंगाचे आफ्रिकन पोपट इत्यादी विदेशी प्रजाती सर्हास पाळल्या जातात. या प्रजाती त्या-त्या देशांमध्ये संरक्षित असल्या, तरी यापूर्वी भारतीय 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत त्यांना लाभलेले नव्हते. मात्र, आता सुधारित तरतुदींमध्ये यामधील काही प्रजातींना चतुर्थ श्रेणीत संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे या प्रजातींना पाळणे कायदेशीर गुन्हा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.



काय आहे सायटीस ?

केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरण बदल मंत्रालयाने (एमओईएफसीसी) पाळीव विदेशी प्राणी-पक्ष्यांच्या मालकी हक्काच्या नोंदणीबाबत आदेश जारी केला होता. या आदेशानुसार विदेशी प्रजाती पाळणाऱ्या लोकांना स्वेच्छेने या प्राण्यांची नोंद करणे आवश्यक होते. पाळीव विदेशी प्राण्यांच्या नोंदीची प्रक्रिया केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या 'परिवेश' या संकेतस्थळावरुन केली जात होती. गेल्या दोन वर्षांमध्ये ही प्रकिया पार पडली आहे. अशा परिस्थितीत आता वन्यजीव संरक्षण कायद्यामधील सुधारित तरतुदींमध्ये परदेशी प्राण्यांना संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे ज्या लोकांनी आपल्या पाळीव परदेशी प्राण्यांची नोंदणी केली नसेल, तर त्यांच्यावर कारवाई होणार का हे पाहण्याजोगे ठरेल.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.