मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाची चूल वेगळी!

मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाची गरज काय? काय आहेत यावर्षीच्या संमेलनातील चर्चासत्रांचे विषय?

    30-Dec-2022   
Total Views |
musli
मुस्लिम मराठी साहित्य
 
 
भाषा धर्माशी जोडून आपण नेहमीच गल्लत करतो. भाषा तर संस्कृतीचं प्रतिनिधित्व करते. मग तिला धर्माचं बंधन काय? खरंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन इतक्या जोशात, मोठ्या प्रमाणात साजरं होत असताना त्याच्याच आजूबाजूला घुटमळणारी विद्रोही संमेलनं, मुस्लिम साहित्य संमेलनं यांची गरजच काय असा प्रश्न उपस्थित होतो तो अगदी स्वाभाविक आहे. परंतु साहित्य संमेलनाला प्रतिवर्षी लागत असलेला राजकीय रंग साहित्याच्या निखळ कलाकृतीला झाकोळून टाकतो असे दिसते. साहित्य म्हणजे विविध काळात, विविध विचारसरणीच्या लोकांनी निर्माण केलेली कलाकृती असायला हवी. सर्वच साहित्यप्रकाराकडे समभावाने पाहता यावे. तटस्थतेने सर्वच विचारधारांना न्याय देता यायला हवा. कोण्या साहित्य प्रकाराविषयी किंवा साहित्यिकांविषयी मनात द्वेष असता काम नये. असे झाले तरच आपली वैविध्यपूर्ण संस्कृती आपण संमेलनांतून सामावून घेऊ शकू.
 
 
मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात
फकरुद्दीन बेन्नूर, प्रा. अजीज नदाफ, पत्रकार नल्लामंदू, कवी मुबारक शेख या मान्यवरांच्या मनात प्रथम मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन व्हावे हा विचार आला. त्यानंतर १९९० साली सोलापूर येथे पहिले मुस्लिम मराठी साहित्य संमेलन झाले. प्रा. फ.म. शहाजिंदे हे यावेळी संमेलनाध्यक्ष होते. या संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभरातील शंभरहून अधिक लेखक एकत्र आले होते. गेल्या ३२ वर्षांत मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाने बाळसे धरले आहे. सुरुवातीला फक्त महाराष्ट्रातून एकत्र येणाऱ्या मुस्लिम साहित्यिकांच्या बरोबर आता देशभरांतून अनेक साहित्यिक एकत्र येतात.
 
१९८९ साली मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाने साहित्य परिषदेची स्थापना केली व या परिषदेमार्फत हे संमेलन भरवले जाते. स्थापनेपासूून परिषदेने सात संमेलने घेतली. सोलापूर, नागपूर, रत्नाागिरी, मुंबई, पुणे, सांगली आणि औरंगाबाद शहरात ही संमेलने झाली. औरंगाबादला झालेले संमेलन २००९ साली शेवटचे ठरले. त्यानंतर मंडळातील सदस्यांच्या आपसातील बेबनाव वाढल्याने संमेलनात खंड पडला. अजीज नदाफ हे सुरुवातीपासून मंडळात कार्यरत असून त्यांना कोणतेच पद न मिळाल्याने ते नाराज होते. त्यानंतरही संमेलने होत होती मात्र त्यात पूर्वीची आत्मीयता राहिली नाही. पुढील संमेलने जळगाव, पनवेल व पुणे या शहरांत झाली. यावर्षीचे १४ वे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन काही कारणाने पुढे ढकलले गेले व त पुढील वर्षी जानेवारी महिन्यात २८ व २९ तारखेला नाशिक शहरात पार पडत आहे.
 
 
या संमेलनाचा उद्देश काय ?
मराठी भाषेत सर्व ज्ञाती धर्मातील संवेदनशील लेखक, कवींनी केलेली साहित्य निर्मिती म्हणजे साहित्य तर मुस्लिम कवी-लेखकांनी लिहिलेले साहित्य म्हणजे 'मुस्लिम मराठी साहित्य' असे वर्गीकरण केले गेले. मुस्लिम सूफींनी, संतांनी लिहिलेल्या या मराठी साहित्याला ३०० वर्षांचा इतिहास आहे परंतु त्याला समग्र मराठी साहित्यात समाविष्ट करून घेअपक्ष त्याला मुस्लिम साहित्य म्हणू वेगळा मोहरा द्यावा असे सदस्यांना वाटले. रा.चिं. ढेरे यांनी मुसलमान मराठी संतकवी या पुस्तकात याबद्दल माहिती दिली आहे. तसेच फकरुद्दीन बेन्नूर यांनी मुस्लिम मराठी साहित्य : एक दृष्टिक्षेप या पुस्तकात आधुनिक मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचा इतिहास सांगितलं आहे.
तेराव्या शतकात दखनी भाषेसोबत मुस्लिम मराठी साहित्याचा विकासदेखील झालेला आहे. अगदी तेराव्या शतकापासून संत शेख महंमद, शाह मुंतोजी असे जवळजवळ ५० मुस्लिम-मराठी संत, कवी होऊन गेले. आधुनिक काळात अमर शेख यांच्यासारखे अनेक लोक शाहीर घेऊन गेले. तसंच एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातही मुस्लिम-मराठी साहित्य लिहिले जात आहे. परंतु या सर्वात संत कबीरांच्या दोह्यांचा उल्लेख करता येईल की नाही यावर मात्र निर्णय करणे थोडे अवघड आहे.
 
 
‘मुस्लिम मराठी साहित्य’ या संकल्पनेची पार्श्वभूमी
मुस्लिम मराठी साहित्य म्हणजे मुस्लिम लेखकांनी लिहिलेले साहित्य की मुस्लिम संस्कृती व परंपरांबद्दल उल्लेख असलेले साहित्य याबाबत ठाम मत सांगता येत नाही. १९३६ मध्ये सांगलीच्या सय्यद अमीन यांनी ‘मुस्लिम मराठी साहित्य’ हा शब्दप्रयोग सर्वप्रथम केला होता. महाराष्ट्रात १५ व्या शतकापासून मराठी भाषांत साहित्य निर्मिती करणारे मुस्लिम धर्मीय होऊन गेले. भक्तिगीते, अभंग, ओव्या लिहिणारे कित्येक कवी होऊन गेले.
 
 
यावर्षी च्या संमेलनातील चर्चासत्रे
नाशिक येथे पुढील महिन्यात होणाऱ्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनात जेष्ठ विचारवंत अब्दुल कादर मुकादम यांची निवड करण्यात आली आहे. शहरातील भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात हे दोन दिवशीय संमेलन होणार आहे. या संमेलनाची जोरदार तयारी करण्यात येत असून देशभरातून दीड हजाराहून अधिक साहित्यिक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मुस्लिम प्रश्न, वास्तव आणि अपेक्षा, मुस्लिम मराठी साहित्य चळवळीची दशके : साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक विश्लेषण, आम्ही भारताचे लोक, सांस्कृतिक दहशतवाद आदी विषयांवर मंथन होणार आहे. त्याचबरोबर कवी संमेलने, चित्रकला स्पर्धा, नाट्य स्पर्धा, ग्रंथदिंडी, पथनाट्य, समाजप्रबोधनपर गीते, निसर्ग पोस्टर प्रदर्शन, संमेलनाध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांची मुलाखत, विविध पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.