मुंबई : मागील काही दिवसांपासून विविध अनधिकृत-बेकायदेशीर बाबींमुळे वादाच्या भोवर्यात सापडलेल्या नवी मुंबईतील बेथेल गॉस्पेल चर्चवर अखेर शुक्रवारी हातोडा पडला आहे. लहान मुलींचे शोषण आणि शासकीय जागेवर करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामामुळे नवी मुंबईमधील या चर्चवर अखेरीस नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे स्थानिकांसह हिंदुत्ववादी संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.
नवी मुंबईच्या सेक्टर-48 सीवूड्स परिसरात उभ्या असलेल्या बेथेल गॉस्पेल चर्चच्या विरोधात सातत्याने अनेक तक्रारी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. तसेच प्रशासनाकडूनदेखील हे चर्च अनधिकृतरित्या उभारण्यात आल्याच्या संदर्भात चर्चला नोटीसही बजावण्यात आली होती. परंतु, नोटीस देऊन अनेक दिवस उलटले तरी या चर्चविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे काही हिंदुत्ववादी संघटनांसह स्थानिक रहिवाशांनी या विरोधात आंदोलनही केले होते.
तसेच भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सोमवार, दि. 28 नोव्हेंबर रोजी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांची भेट घेत कारवाईचीही मागणी केली होती. अखेरीस शुक्रवार, दि. 2 डिसेंबर रोजी दुपारनंतर पोलीस बंदोबस्तात नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत या चर्चवर कारवाई करण्यात आली असून हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे.