समजपासून तुटलेला आदिवासी समाज मुख्य प्रवाहात यायला हवा : चंद्रशेखर नेने

हिंदू सेवा संघांचे संस्थापक दामूअण्णा टोकेकर यांच्या 32 व्या स्मृतिदिनानिमित्त आंभाण येथे गोशाळेचे उदघाट्न

    29-Dec-2022
Total Views |

nene
 चंद्रशेखर नेने
 
 
पालघर : "आपल्या देशाचं भवितव्य काय? आजची लहान मुलं हेच आपलं भवितव्य. त्यासाठी समाजापासून तुटलेला प्रत्येक घटक मुख्य प्रवाहात आणणं महत्वाचं आहे." इतिहास तज्ज्ञ व परराष्ट्र संबंधाचे अभ्यासक चंद्रशेखर नेने म्हणाले. हिंदू सेवा संघांचे संस्थापक दामूअण्णा टोकेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात यावेळी ते बोलत होते. टोकेकर यांचा 32 वा स्मृतिदिन व गोशाळेचे उदघाट्न असा कार्यक्रम पालघर जिल्ह्यातील मनोर जवळील आंभाण केंद्र येथे पार पडला. यावेळी मॅड फाउंडेशचे सदस्य हरेश शाह यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
 
दामूअण्णांची संगीताची आवड, लाकडापासून वाद्य निर्मितीच्या दुकानापासून त्यांच्या रा. स्व. संघातील भरीव योगदानबद्दल सांगत नेनेंनी अण्णांची ओळख करून दिली. त्यानंतर ते पुढे म्हणाले, "आदिवासी समाज पालघर भागात जास्त आहे. अनेक रोगांची औषधे व उपाय याची त्यांना चांगली माहिती असते. ही संस्कृती भारताने जोपासली. इतर राष्ट्रात ज्याप्रमाणे आदिवासी समाजाला भूमिगत व्हावे लागले तशी वेळ भारतात आली नाही, उलट पक्षी त्यांचा अधिकार आणि हक्क जाणून घेऊन पंतप्रधानांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती होण्याची संधी दिली." आदिवासी जमातीतील लुप्त होत असलेला वैदू समाज, त्यांची संस्कृती असलेलं भरड धान्य, त्याची उपयोगिता व वैशिष्ट्य सांगत भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीवर त्यांनी प्रकाश टाकला. नुकताच जाहीर केलेला वीर बाल दिवस व त्याचे महत्व सांगून भारतातील सामाजिक सद्यस्थीतीवर भाष्य करत त्यांनी अनेक महत्वपूर्ण विषयांवर आपलं अभ्यासपूर्ण मत मांडलं.
 
मॅड फाउंडेशन तर्फे हरेश शाह यांनी वसतिगृह संकल्पनेविषयी माहिती दिली. ते म्हणाले, "वासतिगृहात दाखल होणाऱ्या मुलांची संख्या घटत आहेत आणि हेच या योजनेचे यश आहे. विक्रमगड भागात असलेल्या अत्याधुनिक सुविधा असलेलं विक्रमगड केंद्र आज 70 मुलांना आधार देतं. 6 प्रयोगशाळा व एक फिरती प्रयोगशाळा असलेली अशी केंद्र अनेक ठिकाणी व्हायला हवीत असे त्यांनी सांगितले.
 
दामूअण्णांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व गोशाळेचे उदघाट्न करून समूहगीताने कार्यक्रमला सुरुवात झाली. आदिवासी समाजातील तरुणांना अधिकाधिक संधी प्राप्त व्हाव्यात यासाठी चर्चा मंचावर झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत सौरा यांनी केले तसेच हिंदू सेवा संघाच्या 56 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल त्यांनी विस्ताराने सांगितले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.