कांदळवन सहजीवनातून रोजगार निर्मिती आणि संवर्धन: कांदळवन प्रतिष्ठानचा निर्धार

रोजगार प्रकल्पातील शिणाने (हिरवे शिंपले) केरळहून मुंबईत दाखल

    29-Dec-2022   
Total Views |
Green
 
मुंबई (उमंग काळे) : कांदळवन प्रतिष्ठानच्या कांदळवन सहजीवन व रोजगार योजनेचा भाग असलेल्या हिरवे शिंपले पालन प्रकल्पासाठी लागणाऱ्या हिरव्या शिंपल्यांच्या बिजांचे आगमन बुधवार दि. २८ डिसेंबर रोजी झाले. हे बीज केरळ वरून आण्यात आले आहे. या बिजांचे वाटप कोकणातील ७ गावांमध्ये केले जाणार आहे.शिणाने हे मत्स्याहारी लोकांमध्ये त्यांच्या चवीमुळे आणि औषधी गुणधर्मांमुळे विशेष प्रसिध्द आहेत.
 
भारतामध्ये खाण्यासाठी आणि व्यापारासाठी शिणान्यांच्या दोन प्रजाती वापरल्या जातात यामध्ये हिरवे शिणाने, (पर्ना विरीडीस) आणि तपकीरी शिणाने (पर्ना इंडीका) यांचा समावेश आहे. पश्चिम किनारपट्टीवर केरळ, गोवा आणि महाराष्ट्राच्या कोकणात शिणाने मोठ्या प्रमाणावर गोळा करून खाल्ले जातात. शिणान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयुक्त अशी खनिजे, पॉलीअनसॅच्युरेटेड स्निग्ध पदार्थ, अमीनो आम्ल, अँटीऑक्सीडंट गुणधर्म तसेच जीवनसत्व असतात.
 
महाराष्ट्र शासनाच्या कांदळवन प्रतिष्ठानने दि. २० सप्टेंबर २०१७ पासून महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये ‘कांदळवन संवर्धन व उपजीविका निर्माण’ ही योजना सुरू केली. कांदळवन प्रतिष्ठानातर्फे ही योजना गावांमध्ये तयार केलेल्या 'कांदळवन सह-व्यवस्थापन समिती'च्या मार्फत राबविली जात आहे. या योजनेमध्ये गटामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना ९०% अनुदान मिळते , तर वैयक्तिक प्रकल्पाला (१ एकर पेक्षा जास्त खाजगी कांदळवन जमीन असणार्‍या मालकांना) ७५% अनुदान मिळते. या योजनेला २०२५ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. २०१७ ते २०२२ या वर्षांमध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील १२२ गावे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निवडली गेली आहेत.
 
शिणाने पालन प्रकल्पाची यशोगाथा
 
सन २०२१-२२ या वर्षात महाराष्ट्र शासनाच्या 'कांदळवन संरक्षण व उपजिविका निर्माण' योजनेतंर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकुण २० बचत गटांनी तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण ४ बचत गटांनी शिणाने पालन प्रकल्प राबविला होता. या प्रकल्पांमधून एकूण रु. २६,७९, ३७१ एव्हढे उत्पन्न मिळाले. शेजारील गोवा राज्यामध्ये शिणान्यांना खुप मागणी असल्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीवरील मच्छीमार लोकांसाठी शिणाने पालन हा एक शाश्व उपजिविकेचा पर्याय असल्याचे दिसून आले. गेल्यावर्षी मिळालेले यश पाहून यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘कांदळवन संरक्षण व उपजिविका निर्माण' योजनेतंर्गत नवीन ४४ बचत गट शिणाने प्रकल्प राबवित आहेत तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नवीन ८ बचत गट शिणाने पालन प्रकल्प राबवित आहेत. अशाप्रकारे सन २०२२-२३ या वर्षामध्ये कांदळवन संरक्षण व उपजिविका निर्माण योजनेतंर्गत एकूण ६४ बचत गट सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर १२ बचत गट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिणाने पालन प्रकल्प राबवित आहेत. तसेच 'UNDP GCF' प्रकल्पांतर्गत ७ नवीन प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे.
 
 
वनविभाग आणि स्थानिक लोकांमधला भावबंध वाढेल
“उपजिविका निर्माण योजनेचा चढता आलेख, ग्रामस्थांचा योजनेला मिळता प्रतिसाद आणि हुरूप पाहता या चालू वर्षात सर्व प्रकल्पांना चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा निश्चितच बाळगून आहे. अशा शाश्वत उपजिविका निर्माण योजनेबद्दल एक प्रकारचा सकारात्मक दृष्टीकोन गावातील लोकांमध्ये निर्माण झाला आहे. या योजनेमुळेच वनविभाग आणि किनारी समुदाय यांच्यातील भावबंध अधिकच घट्ट होऊ शकतात.”                                       --विरेंद्र तिवारी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास.