‘भारत तोडो’ यात्रा...?

    29-Dec-2022   
Total Views |
मणिशंकर अय्यर



'भारत जोडो’ यात्रा आता शेवटाकडे असताना काँग्रेसजनांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. त्यामुळेच त्यांचा वाचाळपणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आधी सलमान खुर्शिद यांनी राहुल गांधींना भगवान श्रीरामचंद्रांची उपमा दिली आणि त्यानंतर वाचाळपणात आघाडी घेतली आहे ती मणिशंकर अय्यर यांनी. होहो तेच ते. २०१४ साली लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होता आणि तेव्हा अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणून हिणवले होते. एवढच नाही, तर चहावाला देशाचा पंतप्रधान होऊच शकत नाही, असेही म्हटले होते. परंतु, जनतेने मोदींना भरभरून मतदान आणि प्रेम दिले. आताही अय्यर यांचे बोल बिघडल्याने त्यांना टीकेचे धनी व्हावे लागत आहे. भारत तुटला आहे त्यामुळे एकजूट होण्याची गरज असल्याचे सांगत ‘भारत जोडो’यात्रेचाही हाच उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले. यावर भाजपने आक्षेप घेत अय्यर यांचे हे वक्तव्य देशाचा व सरदार वल्लभभाई पटेल यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या १३८व्या स्थापना दिनी, हे संघ परिवाराचे लोक धर्माच्या, भाषेच्या, जातीच्या व संस्कृतीच्या आधारावर भारताचे तुकडे करत आहे. त्याविरोधात ही यात्रा काढण्यात येत आहे. अय्यर यांच्या वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला म्हणाले की, असे बोलून अय्यर यांनी सरदार पटेल यांचा अपमान केला आहे. पटेल यांच्या योगदानाला काँग्रेस पक्ष वारंवार कमी लेखत आहे. मुळात अय्यर यांचा बोलघेवडेपणा नवा नाही. परंतु, ज्या सरदार पटेलांनी भारताला एकसंध केले, तोच भारत आज तुटल्याचे काँग्रेस सांगत आहेत. सरदार पटेलांच्या योगदानाचा हा अपमानच म्हणावा लागेल. देशभरात अख्खी काँग्रेस तुटण्याच्या मार्गावर असताना अय्यर यांना रा. स्व. संघाला दूषणे द्यायची आहेत. संघावर वारंवार शाब्दिक वार करूनही काँग्रेसच्या हाती काहीही लागत नाही. काँग्रेसचे राजकारण रा. स्व. संघाशिवाय पूर्ण होत नाही हे या वक्तव्यावरून सिद्ध होते. मोदींना नीच, चायवाला, खूनी अशी अनेक दुषणे देऊन झालेले अय्यर हे याआधीही नको ते बरळले आहेत. वर्षभरापूर्वी त्यांनी भारत २०१४ पासून अमेरिकेचा गुलाम झाल्याचे विधान केले होते. मात्र, स्वतः गांधी घराण्याचे आपण गुलाम आहोत, मात्र ते जाणीवपूर्वक विसरले होते.


मोदी सरकारचा ‘गोल्डन प्लान’



जगावर सध्या महागाई आणि युद्धाचे ढग दाटून आले आहे. महागाई आणि आर्थिक मंदीचा थेट परिणाम ब्रिटेन सरकारवर झाला आणि तिथे सत्तांतर झाले. जागतिक परिस्थितीमुळे सातत्याने वाढणार्‍या महामाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी मोदी सरकार सत्तेत आल्यापासून विविध उपाययोजना राबवत आहे. त्यापैकीच एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे मोदी सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाढलेली सोन्याची खरेदी. महागाई कमी करण्यासाठी जागतिक परिस्थितीवर अवलंबून न राहता देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबुती देण्यासाठी सोने खरेदीवर सर्वाधिक भर दिला जात आहे. मागील अडीच वर्षांत रिझर्व्ह बँकेने अन्य देशांच्या तुलनेत सर्वाधिक सोने खरेदी असून इतके सोने अन्य कोणत्याही देशाच्या मध्यवर्ती बँकेने खरेदी केलेले नाही. एप्रिल २०२० ते सप्टेंबरपर्यंत भारताने तब्बल १३२.३४ मेट्रिक टन सोने खरेदी केले. यात २०२० साली ४१, २०२१ मध्ये ७७ आणि सप्टेंबरपर्यंत ३१ मेट्रिक टन सोने खरेदी केले आहे. मागील साडेचार वर्षांत भारताचा सोन्याचा साठा विक्रमी २२५ टन इतका वाढला असून सप्टेंबरपर्यंत तो ७८५.३५ टनापर्यंत पोहोचला आहे. परकीय चलनात सोने हा महत्त्वाचा भाग मानला जातो. परकीय चलनात भारताचा सोन्याचा हिस्सा ५.८७ टक्क्यांवरून थेट ७.८६ वर पोहोचला आहे. गेल्या पाच वर्षांत तर यामध्ये तब्बल ३६ टक्क्यांची वृद्धी पाहायला मिळत आहे. सोन्याच्या साठ्यात भारताचा जगात नववा क्रमांक आहे. २०२१-२२ दरम्यान रशियाने सहा टन सोने खरेदी केले. ही बाब वगळता अमेरिका, जपान, इटली, फ्रान्स, चीन, जपान, स्वित्झर्लंड यांसारख्या देशांनीही सोन्याची खरेदीच केली नाही. मात्र, भारताने याच कालावधीत तब्बल ६८ टन सोने खरेदी केले. भारत आपला सोन्याचा साठा नेमका का वाढवत आहे, हे जाणून घेणे महत्त्वपूर्ण आहे. कोरोना व नंतर रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाई वाढत गेली. परिणामी, चलनात घट होण्याची शक्यता वाढते. सोन्याचे भाव फारसे खाली येत नाही. त्यामुळे सोन्याला परकीय चलनामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. चलनाची घसरण होऊ नये, रुपयाला मजबुती मिळावी आणि भविष्यात महागाईचे संकट उभे राहू नये, यासाठी मोदी सरकार आतापासूनच काळजी घेत असून सोने खरेदी हा त्यावरील रामबाण उपाय आहे. संकट आल्यावर पावले उचलण्यापेक्षा त्याआधीच उपाययोजना करण्यास मोदी सरकार प्राधान्य देत आहे, हे नक्कीच कौतुकास्पद आहे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.