वर्णभेद कधी संपेल?

    29-Dec-2022   
Total Views |
Apartheid in South Africa


२९ डिसेंबर रोजी नाताळ सण साजरा करण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एक कुटुंब दक्षिण आफ्रिकेतील फ्री स्टेटमधील रिसोर्ट मेसलस्पूर्टमध्ये गेले. या कुटुंबातील १३ वर्षांचा आणि त्याच्या सोबतचा १८ वर्षांचा त्याचा भाऊ जलतरण तलावात पोहोण्याचा आनंद लटू लागला. मात्र, इतक्यात काही लोकांनी या मुलांना बेदम मारहाण सुरू केली. ही दोन्ही मूलं रडत होती. दयेची भीक मागत होती. पण, मारहाण करणार्‍यांना त्यांची दया आली नाही.



या सगळ्या घटनेचा व्हिडिओ मार खाणार्‍या मुलांच्या बहिणीने तयार केला. त्यामुळे ही घटना जगभरात वायुवेगाने पसरली. या मुलांना मारहाण कोणी आणि का केली तर? मूलं अश्वेतवर्णीय होती. त्यांना मारहाण करणारे श्वेतवर्णीय होते. आपण ज्या जलतरण तलावात आहोत, तिथे अश्वेतवर्णीय मुलांनी येण्याची हिंमतच कशी केली, याचा राग म्हणे त्यांना आला. भयंकर संतापजनक आणि लज्जास्पद अशी ही घटना आणि या घटनेचे पडसाद जगभरात उमटले.

दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णभेदाचा अत्यंत विद्वेषी इतिहास आहे. या देशामध्ये १९४८ ते १९९४ दरम्यान एक वर्णद्वेषी समाजरचना होती. देशामधील काळ्या वर्णाच्या सर्व नागरिकांवर अनेक बंधने घालण्यात आली होती. ही बंधने कुणी घातली होती, तर सत्ताधारीश्वेतवर्णीयांनी, जे संख्येने अल्पसंख्य होते. १९४८ साली डॅनियेल फ्रान्स्वा मलान दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान बनला. त्याच्या सत्ताकाळात वर्णभेदाने परिसीमा गाठली. देशामधील सर्व नागरिकांची वर्णावरून विभागणी करण्यात आली. १९६० ते १९८३ दरम्यान सुमारे ३५ लाख कृष्णवर्णीय व भारतीय वंशाच्या लोकांना त्यांच्या राहत्या घरांमधून अक्षरश: हकलवले गेले.


या ३५ लाख लोकांना खास त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष भागांमध्ये वसवण्यात आले. त्याला ‘बांटूस्तान’ असे नाव देण्यात आले. खरे तर हेच लोक दक्षिण आफ्रिकेचे मूळ नागरिक.असो. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की, गांधीजींनासुद्धा इथे वर्णद्वेषाचा सामना करावा लागला होता. पुढे वर्णद्वेषाविरोधात नेल्सन मंडेला यांनी याच देशात मोठा लढा उभारला. त्याची शिक्षा म्हणून त्यांना २७ वर्षे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.

या सर्व काळात दक्षिण आफ्रिकेमध्ये शब्दातीत वर्णभेद होता. इतके की दक्षिण आफ्रिकेची क्रिकेट टीम केवळ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांसोबतच क्रिकेट खेळायची. १९६८ साली इंग्लंड विरूद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना रंगणार होता. त्यावेळी इंग्लंडने ब्रासील डि ओलिविरा या खेळाडूला संघात स्थान दिले. पण, ओलिविरा हा अश्वेतवर्णीय होता, म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने सामना खेळण्यास नकार दिला.


सामना रद्द होऊ नये म्हणून इंग्लंडने ओलिविराला संघातून बाहेर काढले आणि त्याच्याजागी टॉम कार्टराईट याला स्थान दिले. याचे पडसाद जगभरात उमटले. जगभरात दक्षिण आफ्रिकेवर ताशेरे ओढले गेले. मात्र, दक्षिण आफ्रिकेमध्ये इंग्लंडने ओलिविराला संघातून काढले म्हणून अक्षरशः आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यानंतर टॉम कार्टराईट याने आपण सामना खेळण्यास ‘अनफिट’ आहोत, म्हणत सामना खेळण्यास नकार दिला. त्यामुळे इंग्लंडला ओलिविराला संधी देण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

पण, ओलिविरा हा अश्वेतवर्णीयखेळाडू इंग्लंडच्या क्रिकेट संघात असणार आहे, हे कळल्यावर दक्षिण आफ्रिकेने हा सामनाच रद्द केला. याचे परिणाम पुढे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला भोगावे लागलेच म्हणा. जगातल्या उदारमतवादी देशांनी दक्षिण आफ्रिकेवर आर्थिक बहिष्कार टाकला. अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेसोबतचे संबंध तोडून टाकले. दक्षिण आफ्रिकेवर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याची बंदी घालण्यात आली. अखेर १९९० साली राष्ट्राध्यक्ष फ्रेडरिक विलेम डी क्लर्क याने वर्णभेदी धोरणे मागे घेण्याचे ठरवले.


१९९४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाचा विजय झाला व नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे पहिले अश्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष ठरले. याचबरोबर वर्णभेदाचाही अस्त झाला असे म्हटले जाते. पण, आजही दक्षिण आफ्रिकेतील सत्ता स्थानावर श्वेतवर्णीय आहेत. नुकत्याच केलेल्या एका जागतिक सर्वेक्षणानुसार, दक्षिण आफ्रिकेतील ७० टक्के संपत्ती देशातील दहा टक्के श्वेेतवर्णीयांकडे आहे, तर देशातील ६० टक्के गरीब हे अश्वेतवर्णीयच आहेत. जगभरात या न त्या स्वरूपात अस्तित्वात असलेला हा वर्णभेद कधी संपेल?






आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.