"अहमदनगरचे अहिल्यानगर कधी होणार?", पडळकरांच्या प्रश्नावर काय म्हणाले मंत्री?

    29-Dec-2022
Total Views |


"अहमदनगरचे अहिल्यानगर कधी होणार?", पडळकरांच्या प्रश्नावर काय म्हणाले मंत्री?
नागपूर : आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज विधानपरिषदेत "अहमदनगरचे अहिल्यानगर कधी होणार?" असा सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, "पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं काम अखंड हिंदुस्थानामध्ये सगळ्यांना सर्वश्रुत आहे. हिंदू धर्माचं रक्षण असेल, मंदिराचा जीर्णोद्धार असेल, वेगवेगळ्या धर्मशाळा बांधण्याचा विषय असेल, घाट बांधण्याचा विषय असेल काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार, पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केला. आणि आत्ता जेव्हा माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर निर्माण केला. त्याचा लोकार्पण झाला फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा केंद्र सरकारच्या वतीनं बसवून अहिल्यादेवींच्या कामाची पोचपावती केंद्र सरकारनं दिलेली आहे."
 
 
पुढे ते म्हणाले, "पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म नगर जिल्ह्यामध्ये चौंडी येथे झालेला आहे. आणि महाराष्ट्रातील तमाम लोकांची भावना आहे. की अहिल्यानगर हे नाव अहमदनगरला देण्यात यावं. तर सरकारच्या वतीनं सकारात्मक उत्तर मिळालेलं आहे. सरकारकडं माझी हीच मागणी आहे की तुम्ही किती दिवसामध्ये अहमदनगरचं नाव अहिल्यानगर देणार आहात?"
 
 
पडळकरांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री दीपक केसरकर म्हणाले, "केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अहमदनगर शहराचे नाव बदलण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी अहमदनगर व विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांना 7 सप्टेंबर 2022 च्या पत्रान्वये करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडून प्रस्ताव तयार करणेबाबत विविध स्थानिक विभाग प्रभाग प्रमुखांकडून 3 नोव्हें. २०२२ पत्रान्वये पुढीलप्रमाणे माहिती मागवण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये अहमदनगरचं नाव बदलण्याच्या संदर्भात त्यानंतर विभागीय रेल्वे कार्यालय यांच्याकडून माहिती मागवली आहे. पोस्ट ऑफिसची ना हरकत मागवलेली आहे. आणि तहसीलदारकडून काही माहिती मागवलेली आहे." अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.