काँग्रेसचा हिंदू राग...

    27-Dec-2022   
Total Views |
Rahul Gandhi

काँग्रेसजन हिंदू धर्म आणि हिंदुत्वावर टीकेचे बाण सोडण्याची एकही संधी सोडत नाही, हे आजपर्यंतचा इतिहास सांगतो. भगवान श्रीरामाला आणि रामसेतूला ‘काल्पनिक’ म्हणण्यापर्यंतही त्यांची मजल गेली होती. आताही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधींची तुलना चक्क भगवान श्रीराम यांच्याशी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसजनांना ‘भारत’ असे संबोधले आहे. सलमान खुर्शीद राहुल गांधींच्या ’भारत जोडो यात्रे’संदर्भात उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी ही वायफळ बडबड केली. खुर्शीद इथपर्यंतच थांबले नाहीत, तर त्यांनी राहुल गांधींना जास्त माणुसकी असल्याचे म्हटले. तसेच, “राहुल गांधी हे महामानव आहेत. आम्ही थंडीत गोठत असल्याने जॅकेट घालत आहोत. परंतु, राहुल गांधी टी-शर्ट घालून बाहेर पडत आहेत. ते एका योगीसारखे आहेत, जे आपले तप काळजीपूर्वक पूर्ण करत आहे,” असे बोलून खुर्शीद यांना नेमके काय साध्य करायचे होते हे त्यांनाच ठाऊक. परंतु, त्यातून हिंदू आणि हिंदुत्वाला कशाप्रकारे ‘टार्गेट’करता येईल, याचाच विचार जास्त केल्याचे दिसून येते. याआधीही यावर्षीच ऑक्टोबर महिन्यामध्ये राजस्थान सरकारमधील मंत्री परसादी लाल मीणा यांनी राहुल गांधी यांना ते रामापेक्षाही महान असल्याची उपमा दिली होती. राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून 3 हजार, 500 किलोमीटरचा पायी प्रवास करत आहेत. म्हणजे ते प्रभू रामापेक्षा जास्त चालत आहेत. त्रेतायुगातील वनवासात प्रभू रामानेही इतका लांबचा प्रवास केला नसल्याचे मीणा यांनी म्हटले होते. भगवान राम अयोध्येपासून श्रीलंकेपर्यंत चालत गेले होते आणि त्याहीपेक्षा राहुल गांधींची ही ऐतिहासिक पदयात्रा कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत जाणार आहे. देशात सध्या जातीयवादाचे वातावरण निर्माण झाले असून, देशाला एकत्र आणण्याचे काम राहुल गांधी करणार आहेत. तसेच, एवढी मोठी पदयात्रा आजवर कोणी काढली नाही आणि भविष्यात कोणी काढू शकणार नाही, अशी मुक्ताफळेही मीणा यांनी उधळली होती. काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही भगवान श्रीराम यांना ‘काल्पनिक’ असल्याचे म्हटले होते. काँग्रेसने कधीही रामजन्मभूमी आंदोलनाला पाठिंबा दिला नाही. उलटपक्षी तीव्र विरोध केला. एका विशिष्ट समुदायाचे लांगूलचालन करण्यासाठी काँग्रेस आपला हिंदू राग आळवते, हे खुर्शीद यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले.


कळलाव्या मिटकरींना आवरा!




राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांची वाणी किती रसाळ आणि गोड हे अख्खा महाराष्ट्र चांगल्याच पद्धतीने जाणतो. एक आमदार कसा नसावा आणि त्याने काय बोलू नये, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मिटकरी. सोमवारी विधान परिषदेत मिटकरींनी पंढरपूर कॉरिडोरविषयी प्रश्न विचारला. तेव्हा प्रश्न विचारताना काहीही कारण नसताना मिटकरींनी डॉ. सुब्रमण्यम स्वामींचे वादग्रस्त ट्विट वाचून दाखवले. यामध्ये मोदी हे रावणासारखे असून वाराणसी, उत्तराखंडनंतर पंढरपुरातील मंदिरे ताब्यात घेण्याचा प्रयत्न ते करत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे गरज नसताना जाणूनबुजून मिटकरींनी कळ काढत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मोबाईलमध्ये वाचून दाखवता येणार नाही, असे सभापतींनी बजावूनही मिटकरी मागे हटले नाही आणि मोदींना रावण बोलूनच त्यांनी विश्रांती घेतली. मानधन घेऊन शिवाजी महाराजांविषयी प्रबोधन करणारे मिटकरी यांचे विचार प्रत्यक्षात मात्र तेढ निर्माण करणारे आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना साधे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मवर्षही सांगता आले नाही. सतत मिमिक्री करायची, विशिष्ट समाजाला ‘टार्गेट’करायचे. विशेषतः ब्राह्मण समाजावर कायम टीका करायची, यामुळे मिटकरी धुतल्या तांदळासारखे नक्कीच नाही. अशा आगलाव्या स्वभावाच्या माणसाला शरद पवारांनी हेरले नाही तर नवलच! पाहता पाहता मिटकरींना आमदारकीही मिळाली. खरेतर कळ लावण्यासाठी आणि काढण्यासाठीच मिटकरींना आमदार केलं की काय अशी शंका येते. गोपीचंद पडकळकरांनी मिटकरींना जाहीरपणे ‘बाजारू’ म्हटल्यानंतरही मोठा वादंग उठला होता. सतत गरळ ओकणार्‍या मिटकरींना पवार साहेब सुसंस्कृतपणाचे डोस कधीही पाजताना दिसले नाही. स्वतःच्या गावातली निवडणूकही जिंकून न येण्याची पात्रता असलेले मिटकरी बाता मात्र थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भिडण्याच्या करतात. मुळात ट्विट वाचून मिटकरींना पुढे गोंधळ होणार होता, हे माहिती होते. परंतु तरीही त्यांनी ते वाचलेच. म्हणजे मुद्दाम सभागृहाचे वातावरण खराब करण्याचा त्यांचा हेतू होता. एका आमदाराला पंतप्रधानपदी बसलेल्या व्यक्तीचा सन्मान करता येत नसेल, सभागृहात काय वागावे व बोलावे हे उमगत नसेल, तर त्याहून दुसरे दुर्दैव तरी काय म्हणा! समाजात असे अनेक मिटकरी वातावरण गढूळ करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांना वेळीच ओळखून थांबवणे गरजेचे आहे, हे नक्की.






आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.