अर्थव्यवस्था मजबूतच

    25-Dec-2022   
Total Views |
 Narendra Modi


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. देशाच्या दृष्टीने सर्वात आनंदाची बातमी म्हणजे, चालू आर्थिक वर्षांत विकासदर सात टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याची अपेक्षा आहे. नीति आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगढिया नुकतेच याबाबत म्हणाले की, चालू आर्थिक वर्षांत अर्थव्यवस्था सात टक्क्यांपेक्षा अधिक दराने वाढेल. इतकेच नव्हे तर २०२३-२४ मध्येदेखील हा वृद्धीदर कायम राहील. ते म्हणाले की, ”मंदीची शक्यता काही काळापासून तयार झालेली आहे, पण अमेरिका वा युरोपीय संघदेखील मंदीच्या छायेत आलेला नाही. भारतासाठीचा सर्वात वाईट काळ आता संपलेला आहे.” अरविंद पनगढिया म्हणाले की, “भारतीय अर्थव्यवस्था जागतिक झटक्यांच्या दरम्यान सर्वोच्च आणि झुंजार क्षमतेचे प्रदर्शन करत आहे.” जागतिक बँकेनेदेखील आर्थिक वर्ष २०२२-२३साठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) आधीचा अंदाज ६.५ टक्क्यांवरुन वाढवून ६.९ टक्के केला आहे. जागतिक बँकेने म्हटले की, जागतिक हेडविंडचा सामना करण्यासाठी भारत चांगल्याप्रकारे तयार आहे. जागतिक बँकेने म्हटले की, बिघडत्या जागतिक परिस्थितीमध्ये आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या वाढीचा दर ६.९ टक्के राहण्याची अपेक्षा आहे. पण, त्यानंतरदेखील भारत जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. जागतिक बँकेने ‘इंडिया ग्रोथ आऊटलूक रिपोर्ट’मध्ये म्हटले की, उभारत्या अर्थव्यवस्थांमधील मंदी भारताला एक आकर्षक पर्यायी गुंतवणूकस्थान म्हणून सादर करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था मजबूत असून नीति आयोगाचे माजी उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्या मते, जगभरातील मंदीच्या शक्यतेचा भारतावर काहीही परिणाम होणार नाही. ते म्हणाले की, अमेरिका, युरोप, जपान आणि चीनची अर्थव्यवस्था खाली येत असून आगामी महिन्यात जागतिक अर्थव्यवस्था मंदीकडे जाऊ शकते. पण, त्यांनी हेही स्पष्ट केले की, अनिश्चित जागतिक परिस्थितीमुळे भारतीय अर्थव्यवस्था प्रभावित नक्कीच होऊ शकते, पण २०२३-२४मध्ये भारतीय अर्थव्यवस्था सहा ते सात टक्क्यांनी वाढेल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, भारतात मंदीची शक्यता नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था


मोदी राज्यात भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाची स्थिती असून आहे की, देशात कित्येक वर्षांपर्यंत नऊ टक्क्यांचा वृद्धीदर राहू शकतो. राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यात जी २० अध्यक्षतेअंतर्गत आयोजित पहिल्या शेर्पा बैठकीमध्ये आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सान्याल म्हणाले की, “भारत कित्येक वर्षांपर्यंत नऊ टक्क्यांची आर्थिक वृद्धी कायम राखण्यासाठी सक्षम आहे.” ते म्हणाले की, ‘’२०३० च्या सतत विकास लक्ष्याला (एसडीजी) प्राप्त करण्यासाठी जगाने सातत्याने उच्च वृद्धीदर प्राप्त करणे आवश्यक आहे.” सान्याल म्हणाले की, “भारताचे दर माणशी उत्पन्न केवळ २ हजार, २०० अमेरिकन डॉलर आहे आणि ते कित्येक वर्षांच्या उच्च वृद्धीदरानंतर प्राप्त करण्यात आले आहे. विशेषत्वाने दक्षिण गोलार्धात ’एसडीजी’ प्राप्त करण्यासाठी ‘जीडीपी’ विकास दर कायम राखणे महत्त्वपूर्ण आहे. भारत आगामी वर्षांत ‘जी २०’ गटातील देशांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असणार आहे. ’रेटिंग एजन्सी मूडीस इन्व्हेस्टर्स सर्व्हिस’ने म्हटले की, राजकोषाच्या स्तरावर भारताची मजबूत स्थिती कायम असून येणार्‍या काळात राजस्वाबरोबरच कर्ज स्थिरीकरणाच्या प्रकरणात उत्तम प्रदर्शनाची अपेक्षा आहे. ’मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिस’चे वरिष्ठ उपाध्यक्ष क्रिश्चियन डी. गुजमॅन म्हणाले की, ”देशाची आर्थिक प्रणाली मजबूत आहे.” ते म्हणाले की, ‘’आमच्या अनुमानाप्रमाणे भारत आगामी वर्षात ’जी २०’मध्ये तीव्र आर्थिक वृद्धी प्राप्त करणारा देश राहील. ’मूडीज’ने २०२२ साठी भारताच्या आर्थिक वृद्धीचा अंदाज सात टक्के, २०२३ साठी ४.८ टक्के आणि २०२४ साठी ६.४ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. ‘मूडीज’ने ‘जी २०’ अर्थव्यवस्थांच्या वाढीचा दर २०२३मध्ये १.३ टक्के राहण्याचे अनुमान वर्तवले आहे. दरम्यान, ‘पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री-पीएचडीसीसीआय’ने म्हटले की, चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था सहा ते सात टक्क्यांच्या दराने पुढे जाऊ शकते. ‘पीएचडीसीसीआय’चे नवे अध्यक्ष साकेत डालमिया म्हणाले की, “उत्पादनात वेग आला असून देशातील मागणी मजबूत आहे.” डालमिया असेही म्हणाले की, “उद्योग मंडळाने आपल्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी आणि रसायनांसारख्या ७५ संभावित उत्पादनांची ओळख केली आहे. जेणेकरुन वर्ष २०२७ पर्यंत ७५० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी मदत मिळेल.”



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

महेश पुराणिक

मूळचे नगर जिल्ह्यातील. नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदव्युत्तर पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक(वृत्त) पदावर कार्यरत.