‘कोरोना’मुळे चीन ताळ्यावर...!

    25-Dec-2022   
Total Views |
कोरोना

जागतिक महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहणार्‍या चीनला गेल्या काही महिन्यांपासून एकामागून एक झटके बसत आहे. विस्तारवादाची नीती, शेजारील राष्ट्रांना गिळंकृत करण्याची तडफड आणि एकाधिकारशाही चीनला धोकादायक ठरू लागली आहे. भारतीय सीमेलगत कुरापत काढण्याची एकही संधी चीन सोडत नाही. परंतु, नव्या भारतात चीनला तोडीस-तोड उत्तर मिळत असल्याने चीनचे डावपेच यशस्वी होत नाहीत. नुकतीच चीनने अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात कुरापत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.


भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना चोप देत तवांग भागातून हुसकावून लावले. याआधीही डोकलामवर चीनने आपला हक्क सांगत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तिथेही भारताने माघार न घेता सामंजस्याने आणि आपल्या कूटनीतीने चीनला माघार घेण्यास भाग पाडले. ज्या-ज्या वेळी चीनने भारताशी पंगा घेण्याचा वा डिवचण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भारताने चीनसमोर न झुकता चीनला सडेतोड उत्तर दिले. आधी डोकलाम आणि त्यानंतर तवांगमध्येही भारतीय सैन्याकडून मिळेल्या प्रत्युत्तरामुळे चीन आता सारवासारव करण्याच्या भूमिकेपर्यंत येऊन पोहोचला आहे. चिनी सैन्याला झालेल्या मारहाणीनंतर चीनने चक्क भारताला संबंध सुधारण्याचे आवाहन केले असून भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत करण्याची इच्छा असून त्या दिशेने प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.

दि. ९ डिसेंबर, २०२२ रोजी भारतीय लष्कराने अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये घुसखोरी करणार्‍या चिनी सैनिकांना हुसकावून लावले होते. यानंतर दोन्ही देशांच्या लष्कराच्या ‘कोअर कमांडर’ स्तरावरील बैठकीची १७ वी फेरी नुकतीच पार पडली. यादरम्यान, पश्चिम भागात सुरक्षा आणि स्थिरता राखण्यावर भारत आणि चीनमध्ये सहमती झाली. रविवारी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी, चीन स्थिर संबंध आणि मजबूत विकासाच्या माध्यमातून भारतासोबत काम करण्यास तयार असल्याचे सांगत दोन्ही देश राजनैतिक आणि लष्करी माध्यमातून संपर्क ठेवत असल्याचे म्हटले. वांग यी म्हणाले की, चीन आणि भारताने राजनैतिक आणि लष्करी ते लष्करी माध्यमांद्वारे संवाद कायम ठेवला आहे. दोन्ही देश सीमावर्ती भागात स्थिरता आणि शांतता राखण्यासाठी कटिबद्ध आहेत. चीन-भारत संबंधांच्या स्थिर आणि सुदृढ विकासासाठी आम्ही भारतासोबत काम करण्यास तयार आहोत.

दोन्ही देशांच्या सैन्यांमधील चकमकीनंतर, परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, भारत आणि चीनने चुशुल-मोल्डो सीमेवर नुकतीच कोअर कमांडर स्तरावर बैठक घेतली. यादरम्यान, पश्चिम सेक्टरमध्ये सुरक्षा राखण्यावर एकमत झाले. त्याचवेळी, दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या संपर्कात राहणे, लष्करी आणि राजनयिक माध्यमांद्वारे संवाद कायम ठेवण्याचे आणि उर्वरित मुद्द्यांवर लवकरात लवकर परस्पर स्वीकारार्ह तोडगा काढण्याचे काम करण्याचे मान्य केले आहे. दरम्यान, चीनची अवस्था सध्या वाईटाहूनही वाईट झाली आहे. चीन कोरोनाच्या विळख्यात सापडला असून आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. चीनच्या विकास दराचे मूल्यांकनही कमी करण्यात आले आहे. दररोज नव्याने आढळणार्‍या कोरोनारुग्णांची संख्या लाखांच्या घरात आहे. प्रतिदिवशी हजारोंचे मृत्यू होत असल्याने अंत्यसंस्कारासाठी दोन आठवड्यांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागत आहे.

अस्थींसाठीही टोकन पद्धतीचा वापर केला जात आहे. लाखो बाधितांना रूग्णालयात रुग्णशय्येसाठी झगडावे लागत आहे. एकंदरीत पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाल्याने चीनमधील अर्थव्यवस्था व जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. निर्बंधांमध्ये दिलेली सवलत आता चीनसाठी जिकिरीची ठरत आहे. चीनवर कोरोना मृतांचे आकडे लपवत असल्याचा आरोपही केला जात आहे. त्यामुळे या सगळ्या अडचणीत चीनला भारताशी पंगा घेणे कदापिही परवडणारे नाही. कारण, चीनमधील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने आणि लोकांचा रोष शी जिनपिंग याच्या एकाधिकारशाही कारभारावर वाढत चालल्याने चीनला शेजारी राष्ट्रांशी दुश्मनी परवडणार नाही. कोरोना आणि नागिरकांचा सरकारवरील वाढता रोष यांमुळे चीन आतून पोखरत चालला आहे. त्यामुळे चीनला आता भारतासोबत संबंध सुधारण्याची सद्बुद्धी सुचली आहे. परंतु, बेभरवशा चीनपासून भारताने सावध राहणे कधीही हितावह.








आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.