कोरोना, येशूची करुणा आणि तेलंगणमधील ख्रिस्ती धर्मांतरण

    24-Dec-2022   
Total Views |
डॉ. जी. श्रीनिवास राव

“भारत कोरोनामधून केवळ येशूमुळे वाचला. वैद्यकीय अधिकारी किंवा डॉक्टर यांच्यामुळे नाही, तर केवळ येशूची दया होती म्हणून भारत कोरोनातून सावरला. भारताचा विकास ख्रिस्ती नागरिकांमुळे झाला,” असा अजब दावा नुकतेच तेलंगणचे अधिकारी डॉ. जी. श्रीनिवास राव यांनी केला. डॉक्टर असलेल्या आणि मोठ्या हुद्द्यावर असलेल्या एका व्यक्तीने मांडलेले हे मत... त्यामुळे त्याची पार्श्वभूमी, त्याचे परिणाम तपासणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने तेलंगणमधील धर्मांतरणाचे चित्र उलगडणारा हा लेख...


" ‘कोविड’मधून देश वाचला, याला कारण जीजस-येशू आहे. भारत जगला याचे कारण ख्रिश्चॅनिटी! ‘कोविड’ काळात देश सावरला याचे कारण वैद्यकीय उपचार नाहीत, तर केवळ येशूची दया आहे. इतकेच काय, भारताच्या विकासाचे कारणही ख्रिश्चन नागरिकच आहेत,” असे विधान तेलंगण राज्याचे आरोग्य अधिकारी डॉ. जी. श्रीनिवास राव यांनी केले. तेलगंणमध्ये नाताळनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अतिथी म्हणून डॉ. जी. श्रीनिवास राव उपस्थित होते. त्यांच्या या विधानावर तेलंगणमधील विरोधी पक्ष, हिंदुत्ववादी विचारसरणीच्या संघटना आक्रमक झाल्या. आपले विधान आपल्या विरोधात गेले हे पाहून की काय, मग काही तासांनंतर राव यांनी त्यांच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले की, ”केवळ येशूमुळे कोरोनामधून देश वाचला असे म्हणायचे नव्हते, तर मला म्हणायचे होते की, कोरोना काळात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्या आरोग्यसेवेबरोबरच येशूची दयादेखील होती, असे मला म्हणायचे होते.” अर्थात, राव यांनी कितीही स्पष्टीकरण दिले, सारवासारव केली तरी त्यांच्या विधानाचे गृहीतक एका पायावरच उभे आहे ते म्हणजे येशूची कृपा होती, दया होती म्हणून भारतीय कोरोना काळात वाचले. अर्थात, श्रद्धा, भक्ती ज्याची त्याची असतेच.




मात्र, हे विधान राज्याच्या आरोग्याचा अधिभार असलेल्या अधिकार्‍याने आणि तेही डॉक्टर असलेल्या व्यक्तीने केले, हे ऐकून धक्का बसला.आता कुणी म्हणेल की, आपल्या देशात व्यक्तिस्वातंत्र्य आहे, अभिव्यक्तिस्वातंत्र्यामुळे कुणीही कोणत्याही पंथावर श्रद्धा ठेवू शकतो आणि त्याचा उच्चार करू शकतो. कायदेशीररित्या हे ठीकच आहे म्हणा. पण, वास्तव हेच की, तेलंगणमध्ये १९९१च्या जनगणनेची तुलना करता २०११ मध्ये ख्रिश्चन धर्मांतराचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. तिथे एका हक्काच्या पदावर असलेल्या उच्च सरकारी अधिकार्‍याने भारतातील कोरोना केवळ येशूमुळे बरा झाला, हे म्हणणे म्हणजे तेलंगणमध्ये वेगाने होत असलेल्या धर्मांतरणाला खतपाणी घालण्यासारखेच आहे. तेलंगणमधील समाजअभ्यासकांचे म्हणणे आहे की, तेलंगणमध्ये मागासवर्गीय जाती आणि जनजातींचे धर्मांतरण वेगाने होत आहे. एक तांदळाची पिशवी देऊनही धर्मांतरण झाल्याच्या घटना तिथे घडल्या आहेत.



तेलंगणमध्ये सध्या वातावरण कसे आहे, हे दाखवणारी अशीच एक घटना. २०२२ची दिवाळी जगभरातल्या हिंदूंनी साजरी केली. तेलंगणमध्येही ती साजरी झाली. मात्र, हैदराबादमधील परिसरात ‘अर्चना अपार्टमेंट’ या उच्चभ्रू सोसायटीत दिवाळीमुळे वाद झाला. या सोसायटीत हिंदू आणि ख्रिश्चन कुटुंबांना सामायिक गॅलरी होती. दिवाळीनिमित्त हिंदू कुटुंबाने गॅलरीमध्ये रांगोळी काढली. त्यावर पारंपरिकरित्या दिव्यांची आरासही केली. ही सजावट अशी केली की, दोन्ही घरातील व्यक्ती सहज तिथून येऊ-जाऊ शकत होत्या. रांगोळी किंवा दिव्यांचा त्रास नव्हताच. मात्र, ख्रिश्चन कुटुंबातील महिलेने हिंदू कुटुंबाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर ती तिला चपलेने मारायला धावली. सामायिक गॅलरी आहे. तुम्ही इथे दीपावलीची रांगोळी कशी काढली? दिवे कसे लावले? असे म्हणत ती भांडू लागली. इतकेच नाही, तर तिने लाथेने दिवे उधळून लावले. हिंदू कुटुंबाने त्यांचीही मालकी असलेल्या गॅलरीमध्ये रांगोळी आणि रोषणाई करून ख्रिस्ती कुटुंबाला त्रास दिला होता, असे या ख्रिस्ती कुटुंबाचे म्हणणे. दरम्यान, या महिलेचे भांडण, शिवीगाळ आणि लाथेने दिवे उलथवणे हे सगळे कुणीतरी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. ते समाजमाध्यमांत वेगाने पसरले. हे पाहून स्थानिक विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते या महिलेच्या विरोधात पोलिसांनी तक्रार दाखल करावी, यासाठी एकत्र आले. लोकांचा मोठा जमाव एकत्रित झाला. त्यामुळे की, काय त्या महिलेवर गुन्हा दाखल झालाही.




 मात्र, त्याचवेळी स्थानिक पोलीस अधिकार्‍यांनी स्वत:चे म्हणणे प्रसारमाध्यमांवर मांडले की, कुणीही या घटनेला हिंदूविरोधी घटना म्हणून पाहू नये. हे केवळ दोन शेजार्‍यांमधील भांडण आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर तेलंगणमध्ये आजही काही जणांवर गुन्हे दाखल आहेत. ते कशासाठी तर? सोसायटीमध्ये, भरवस्तीमध्ये कुणीतरी एक भाडोत्री म्हणून राहायला आले. काही दिवसांनी त्याच्या घरात न चुकता १५-२० लोक येऊ लागले. मोठमोठ्याने येशूची करूणा भाकू लागले. टाळ्या वाजवून मोठ्या आवाजात भजन म्हणू लागले. कुणी विचारलेच, तर विचारणार्‍यालाच भजनात सामील व्हा, तुमचे सगळे दु:ख दूर होईल, असे सांगण्यात येई. उच्चभू्र हिंदू वस्तीमध्ये अनेकांना या आवाजाचा त्रास झाला. हे अनेक वस्त्यांमध्ये घडत होते. वस्तीमधील कुणी भजन बंद करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर तत्काळ धार्मिक उन्मादामुळे ख्रिस्ती धर्माचा अपमान केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. या घटनांमध्ये हिंदू विरोधी ख्रिस्ती असेच स्वरूप दिले गेले. अशा घटनांमध्ये कुणीही म्हणाले नाही की, दोन शेजार्‍यांची भांडणं आहेत. शेजारच्या घरात धर्माच्या नावाने का होईना सारखा आवाज होत असेल, तर शेजार्‍याला त्रास झाला म्हणून दोन शेजार्‍यांमध्ये भांडण झाली, असे म्हणाले नाही. या घटनांचा आढावा घेत तेलंगणमधील सामाजिक कार्यकर्ते प्रश्न उपस्थित करतात की, ”तर्क आणि मुद्दा दोन्ही समाजासाठी सारखेच हवेत. आमच्यासाठी धार्मिक कट्टरतेचा आरोप तर त्यांच्यासाठी शेजार्‍यांची निरूपद्रवी भांडणे अशी भूमिका का?”



तेलंगणमध्ये जगभरात चालते तशाच धर्मांतरण करण्यासाठीच्या पद्धती आहेत. संपर्क, खोटी सेवा प्रलोभन वगैरे वगैरे. पण, दक्षिण भारतात एक आणखीन पद्धत आहे. दुर्गम भागात जिथे मागासवर्गीय जातीजमातीची वस्ती आहे, लोक गरीब आणि अल्पशिक्षित आहेत, अशा वस्तीत एक दु:खनिवारण बॉक्स ठेवला जातो. वस्तीत सांगितले जाते - तुमचे दु:ख चिठ्ठीमध्ये लिहून बॉक्समध्ये टाका. चिठ्ठीत नाव आणि पत्ता हवा. गरीब त्रासलेले लोक बघू तरी काय होते, या विचाराने स्वत:च्या समस्या चिठ्ठीत लिहून चिठ्ठी बॉक्समध्ये टाकतात. कुणाला मुलांच्या शाळेचे शुल्क भरायचे असते; कुणाला औषध हवे असते; कुणाला शेतीची किंवा मासेमारीची अवजारे हवी असतात. काही दिवसांनी पाद्री महाशय या लोकांच्या घरी जातात. देवाने तुमचे दु:ख दूर करायला पाठवले. तुम्हाला काय हवे ते पण सांगितले. मग त्या गरजू व्यक्तीला थातुरमातूर मदत करून पाद्री त्याला चर्चमध्ये येण्याचे, येशूच्या कृपाछत्राखाली येण्याचे सांगतात. धर्मांतराची सोपी प्रक्रिया.




या सगळ्या प्रकारामुळे तेलंगणमध्ये मागासवर्गीय जाती-जनजातीमध्ये धर्मांतराचे प्रमाण वाढले.असो. तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर स्वत:ला कट्टर हिंदू मानतात. ते म्हणाले होते, ”ते (म्हणजे भाजप) मतांसाठी हिंदुत्ववादी आहेत. मी मात्र धर्मकर्माने हिंदू आहे आणि मोदींपेक्षाही जास्त हिंदू आहे.” त्यांना असे म्हणणे भागच आहे. कारण, २०११च्या जनगणनेनुसार तेलंगणमध्ये ८५.९५ टक्के हिंदू आहेत. १२.४३ टक्के मुस्लीम, तर १.२४ टक्के ख्रिश्चन लोकसंख्या आहे. जवळजवळ ८६ टक्के लोकसंख्या हिंदू असलेल्या तेलगंणमध्ये सत्तेच्या बेगमीसाठी हिंदुत्वाची कास धरणे गरजेचे आहे, हे काय वेगळे सांगायला हवे! केसीआर स्वत:ला कट्टर हिंदुत्ववादी समजतात. त्यांच्या समर्थकाने म्हणजे डॉ. राव यांनी कोरोनामध्ये देश केवळ येशूमुळे वाचला आणि भारत देशाचा विकास केवळ ख्रिश्चनामुळे झाला, हे म्हटले आहे. यावर केसीआर काय म्हणतील? छे! केसीआर स्वत:ला कितीही हिंदुत्ववादी म्हणोत, पण आपण किती ‘सेक्युलर’ आहोत, हे दाखवण्याची संधीही ते सोडत नाहीत. राज्यातील हिंदू मागासवर्गीय जाती जनजातींच्या लोकांचे होणारे धर्मांतरण पाहून केसीआर मागे म्हणाले होते की, “एक हिंदू म्हणून समाजात होणारे हे धर्मांतरण मला दु:ख देते. चूक आपल्या समाजाची आहे.



 आपण मागासवर्गीय जातीजमातीच्या बांधवांना आदर देत नाही म्हणून ते ख्रिश्चन होतात.” अर्थात, हे वाक्यही ‘गुडीगुडी’च आहे. स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणार्‍या केसीआर यांनी धर्मांतराला थेट विरोध नाही, तर लोक ख्रिस्ती होतात. कारण, हिंदू धर्मात त्यांना आदर, प्रेम मिळत नाही, असे म्हटले. शब्दांमध्ये खूप जादू असते. त्यातही शब्द जर समाजाच्या गणमान्य सत्ताधार्‍यांनी उद्गारले असतील तर? तर सामान्य भोळी जनता त्या उद्गाराला सत्य मानते. नेता म्हणतो ना म्हणजे ते खरेच असले पाहिजे. त्यामुळेच केसीआरचे म्हणणे की, हिंदू धर्मात मागासवर्गीय जातीजमातींना आदर मिळत नाही म्हणून ते ख्रिस्ती झाले. याचाच दुसरा अर्थ लोक असाही घेऊ शकतात की ”मागावर्गीय जातीजमातीतील लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला की त्यांना आदर प्रेम वगेरे सगळे मिळत असावे. त्यामुळे धर्मांतरण केले तरे बरेच केले.” म्हणजेचे केसीआर यांनी एकप्रकारे धर्मांतराचे समर्थनच केले आहे की काय अशी शंका येते. आता कुणी म्हणेल की, सुतावरून स्वर्ग गाठला आहे किंवा तर्काची कमाल केली आहे. तर तसे नाही.



इतिहासाचा मागोवा घेतला, तर पारतंत्र्याच्या काळात इंग्रजांच्या सत्तेत ख्रिस्ती पाद्री समाजातील महाजनांना, तथाकथित उच्च जातीच्या व्यक्तींना ख्रिस्ती बनवत. कारण, समाजातले मान्यवर ख्रिस्ती झाले, तर त्यांचा आदर्श मानणारे सामान्य लोक त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून धर्मांतरण करणारच करणार!विषयांतर झाले, पण तेलंगणमध्ये सध्या धर्मांतरणाबाबत सत्ताधारी कशी थालीच्या बैंगणची भूमिका घेतात हे दाखवण्यासाठी हे महत्त्वाचे होते.या सगळ्या वास्तवाचा मागोवा घेतला तर जाणवते की, तेलंगण काय किंवा दक्षिण भारतातील मागासवर्गीय जातीजमातीमधील व्यक्ती ख्रिश्चन झाल्या म्हणून काही परिवर्तन होते का? तर एम. मारी जॉहन (द प्रेसिडंट ऑफ द दलित ख्रिश्चन लिब्रेशन मूव्हमेंट अ‍ॅण्ड द नॅशनल कौन्सिल ऑफ दलित ख्रिश्चन) यांचे म्हणणे आहे की, कॅथलिक धार्मिक पदोन्नतीमध्ये दलित ख्रिश्चनांना वगळले जाते. ‘नॅशनल कौन्सिल ऑफ दलित ख्रिश्चन’चे समन्वयक फ्रॅन्कलिन सिझर थॉमस यांनी मत मांडले की ”गुणवंत दलित पाद्रीला बिशप पदाच्या उमेदवारीतून वगळण्याची भेदभावपूर्ण नीती व्हॅटिकन चर्चने बंद केली नाही, तर आम्ही आमची स्वत:ची ‘इंडियन दलित कॅथलिक चर्च’ किंवा ‘द इंडियन दलित कॅथलिक रिट धर्मसंस्था उभी करू.” हिंदू समाजातील ख्रिस्ती झालेल्या आणि त्यानंतर चर्चसंस्थेमध्ये दुय्यम वागणूक किंवा भेदभावपूर्ण नीतीची शिकार झालेले हे लोक.




 मागासवर्गीय जातीजमातीमधून धर्मांतरित होऊन ख्रिस्ती धर्म स्वीकारला म्हणून यांच्यासाठी चर्च वेगळे असते आणि स्मशानही वेगळे असते. इतकेच काय तर या लोकांच्या चर्चमध्ये केवळ मागासवर्गीय जातीजमातीतून ख्रिस्ती धर्मांतरित झालेली व्यक्तीच पाद्री किंवा बिशप असतात. थोडक्यात, आदर किंवा प्रेम, समानता मिळवण्यासाठी आम्ही ख्रिस्ती धर्म स्वीकारला, असे म्हणणारे एक तर खोटे बोलतात किंवा ते इतके दुर्बल आहेत की, सहन करण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. तर तेलंगणचे आरोग्य अधिकारी डॉ. जी. श्रीनिवास राव यांच्या वक्तव्यामुळे तेलंगणमधील धर्मांतराचा मागोवा घेताना अशा बर्‍याच गोष्टी जाणवल्या. हे केवळ एक हिमनगाचे टोक आहे. आज नाताळ. इंग्रजी नवीन वर्षही आता अवघ्या काही दिवसांवर... त्या अनुषंगाने धर्मांतराचे पेवच फुटेल. मागास जातीजमातींच्या न्याय हक्कासाठी लढणार्‍या त्या काही तद्दन भंपक संघटनांना सणाच्या नावावर होणारे हे धर्मांतरण आणि समाजाची फसवणूक दिसणार नाहीच. पण, आपण आपल्या स्तरावर सजग राहायला हवे. एक गेला झाला ख्रिश्चन म्हणून काय झाले? असा विचार करताना इतकेच लक्षात ठेवायला हवे की, शेकडो वर्षे एका एका हिंदूला धर्मांतरित करणारे, त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजणारे लोक काय मूर्ख आहेत? एक व्यक्ती त्याद्वारे एक कुटुंब आणि त्याद्वारे समाज हेच त्यांचे लक्ष्य आहे. त्यामुळे तेलंगणच्या आरोग्य अधिकारी डॉ. जी. श्रीनिवास राव यांचे म्हणणे गंभीरतेने घ्यायला हवे. श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा का? त्यातच पुन्हा कोरोनाने जगात डोके वर काढले आहे. भारत समर्थ आहे. पण, या कोरोनाचा वापर करून धर्मांतरणाचे मार्ग मोकळे करणार्‍या कोणत्याही षड्यंत्राला तिथेच ठेचले पाहिजे!




२०२० साली कोरोनाने भारतात पाय रोवले. जसजसा कोरोना वाढला तसे ‘लॉकडाऊन’ लागले. लोकांचे कामधंदे बंद पडले. अन्नाची ददात सुरू झाली. भयंकर प्रसंग कोसळला. त्यावेळी सुदैवाने केंद्र सरकार आणि मोदीजींनी कोरोना काळ कुशलतेने हाताळला. प्रशासकीय अधिकारी, सर्वच शासकीय यंत्रणा आणि मुख्यत: स्थानिक स्तरावरच्या सर्वच सेवाभावी संस्था रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी कोरोनाशी दोन हात केले. यामध्ये रा. स्व. संघ संबंधित सर्वच आयामातील संस्था अग्रेसर होत्या. या सगळ्यांनी मिळून भारतीयांना वाचवले. या सगळ्या घडामोडीत ते ‘येशूची प्रार्थना करा, तुम्ही बरे व्हाल,’ असे म्हणणारे लोक गोरगरिबांच्या वस्तीत सुरुवातीला फिरत होते. मात्र, नंतरच्या कोरोनाच्या भयंकर काळात ते लोक नंतर कुठेच दिसले नाहीत. आता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काय? तेलंगण काय? वास्तव हेच होते आणि हे असे असताना तेलंगणच्या आरोग्य अधिकार्‍याने भारताला कोरोनामधून केवळ येशूने वाचवले म्हणणे किती चुकीचे आहे. अंधश्रद्धा पसरवल्याबद्दल, अधिकारी पदावर असताना चुकीची माहिती पसरवल्याबद्दल डॉ. श्रीनिवास यांच्यावर काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. तूर्त ‘समाजासाठी सेवा, धर्मांतरणासाठी नव्हे’ हा माणुसकीचा मंत्र धर्मांतरण करणार्‍यांना कळेल तो समाजाचा आणि देशाचा सुदिन समजायला हवा!






आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.