‘जलयुक्त बोअरवेल्स’साठी ‘ऊर्ध्वम्’चे तंत्रज्ञान

    22-Dec-2022   
Total Views |
Urdhwam' technology for 'water borewells'


पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या ठिकाणी बोअरवेल हा एकमेव आधार. याच बोअरवेलच्या माध्यमातून, त्या-त्या भागांमध्ये पिण्यासाठी, रोजच्या वापरासाठी, शेतीसाठी पाणी उपसले जाते. सातत्याने उपसा करून करून जेव्हा ती बोअरवेल कोरडीठाक पडते, तेव्हा खरा पाण्यासाठीचा संघर्ष सुरु होतो. फक्त भारतातच नाही तर जागतिक पातळीवरही हा प्रश्न गंभीर बनला आहे. म्हणूनच पुढचे युद्ध कदाचित पाण्यासाठी लढले जाईल, असे जे म्हंटले जाते, ते वास्तव ठरु शकते. याच समस्येवर वरदान ठरू शकेल, असे काम आपल्या ‘ऊर्ध्वम् एन्व्हार्नमेंटल टेक्नोलॉजीज् प्रायव्हेट लिमिटेड’च्या माध्यमातून राहुल बाकरे करत आहेत. त्यांच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...



दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न देशासह जगभरातही गंभीर रुप धारण करताना दिसतो. दरवर्षी उन्हाळ्यात अनेक गावांना, हल्ली शहरांमध्ये सुद्धा टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. भारतातील भूजलाचा अमर्याद उपसा हेदेखील या समस्येमागचे एक मूलभूत कारण. एका आकडेवारीनुसार, भारत हा जगातील सर्वात मोठा भूजल उपसा करणारा देश आहे. जवळपास चार ते पाच कोटी बोअरवेल्स एकट्या भारतात आहेत. या बोअरवेल्समधून दरवर्षी पाण्याचा प्रचंड मोठा उपसा केला जातो. परिणामी, भारतातील भूजल पातळी, खूपच खालावत चालली आहे. त्यातच उपसा करणारे कोट्यवधी हात असले तरी या भूजलाचे पुनर्भरण करणारे फार कमी हात कार्यरत आहेत. पण, जर ही भूजल पुनर्भरण मोहीम व्यापक पातळीवर राबविली गेली तर भारतातली भूजल पातळी खूप सुधारेल आणि पाण्याच्या दुर्भिक्ष्याची समस्या तुलनेने कमी होईल. याचसाठी कार्यरत आहेत राहुल बाकरे आणि त्यांची ‘ऊर्ध्वम् एन्व्हार्नमेंटल टेक्नोलॉजीज् प्रायव्हेट लिमिटेड.’

भारतातील असंख्य गावांमध्ये बोअरवेल्स हाच एकमेव पाण्याचा स्रोत. या बोअरवेल्समधून वारंवार उपसा केल्याने त्यांची क्षमताही हळूहळू खालावते. कधी कधी 400 ते 500 फुटांपर्यंत जाऊनही पाणी मिळत नाही. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होते. प्यायलाच पाणी मिळण्याची मारामार, तिथे शेतीसाठी कुठून पाणी मिळणार? मग अशा परिस्थितीत पिके करपून जातात आणि उत्पादकता कमी होते. परिणामी, शेतकर्‍यांचे उत्पन्न कमी होते. त्यामुळे कर्जबाजारीपणा, नापिकी यांसारख्या समस्या आ वासून उभ्या राहतात आणि काही हतबल, हताश शेतकरी मग आत्महत्येचाही दुर्देवी मार्ग अवलंबतात. ही बाब लक्षात घेता, बोअरवेल्सच्या पुनर्भरणासाठी काम करायचे राहुल यांनी ठरविले आणि त्यांनी बोअरवेल्सच्या पुनर्भरणाचे तंत्रज्ञानही विकसित केले. अशा या ‘बोअर इंजेक्टिंग तंत्रज्ञाना’चा वापर करून राहुल यांची ‘ऊर्ध्वम्’ ही कंपनी 2014 पासून या क्षेत्रात कार्यरत आहे.

कुठल्याही बोअरवेलमध्ये भूगर्भाच्या कितीतरी खाली पाणी सापडते, जे कितीतरी कोटी वर्षांपूर्वीचे असण्याचीही शक्यता असते. त्या बोअरवेलमध्ये जो वरचा पाईप असतो, तो सच्छिद्र नसतो. त्यामुळे त्या पाईपमधून नवीन, दरवर्षी पडणारे पावसाचे पाणी पडत नाही. तसेच अनेकवेळा जिथे ‘बोअरवेल’ असते, तिथे जवळपास नैसर्गिक पाण्याचा स्रोतही नसतो, असेही दिसून येते. जसे की, ओढा, नदी, छपरावरून पडणारे पाणी असा कुठलाही नैसर्गिक पाण्याचा स्रोत उपलब्ध नसतो. त्यामुळे अशा ठिकाणचे पाणी हे कितीतरी वर्षांपूर्वीचे असते आणि ते जाड पाणी असल्याने त्याचा पिण्यासाठी, रोजचा वापर, शेती इत्यादी कामांसाठी वापर करता येत नाही. त्यामुळे अशा बोअरवेलचे पाणी जास्त उपयुक्त नाही. कारण, त्यांचे नैसर्गिक झरे आटलेले असतात, त्यांचे पुनर्भरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्या बोअरवेलमध्ये नवीन पाणी सोडले गेले पाहिजे. त्यासाठी राहुल यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान, त्या बोअरवेलच्या वरच्या नळीला बरोबर नेमक्या ठिकाणी छिद्रे पाडून त्यातून पावसाचे ताजे पाणी आत खालपर्यंत जाईल, अशी व्यवस्था करता. अशा पद्धतीने दरवर्षी जवळपास पाच ते सहा लाख लीटर पाणी जमिनीत त्या बोअरवेलद्वारे जिरवले जाते. आतापर्यंत अशा तब्बल 1800 बोअरवेल्सना जलयुक्त करण्याच राहुल यांना यश आले आहे.

या सर्व कामांदरम्यान काही चांगले अनुभवांनीही राहुल भारावून गेले. असाच एक हुमाणाबादच्या शेतकर्‍याचा अनुभव ते सांगतात. त्या शेतकर्‍याच्या शेतातली बोअरवेल उन्हाळ्यात अवघी 15 मिनिटे चालायची. त्यातून तेवढेच काय ते पाणी मिळायचे. मग तेच पाणी घरासाठी आणि शेतीसाठीही वापरावे लागायचे. राहुल यांनी त्यांच्या तंत्रज्ञानाप्रमाणे या बोअरवेलवर काम केले आणि अवघ्या एका वर्षीच्या पावसात त्या शेतकर्‍याच्या बोअरवेलमध्ये इतके पाणी जमा झाले की, अत्यंत कडक उन्हाळ्यातदेखील त्या शेतकर्‍याला बोअरवेलमधून सहा तास पाणी मिळते. अशी ही राहुल यांच्या कामाची कमाल. असाच आणखी एक अनुभव निलंगा शहराचा. काही वर्षांपूर्वी कडक उन्हाळ्यात या भागाला मिरजहून मालगाडीने पाणी पुरवठा करावा लागल्याचे आपल्या स्मरणात असेल. त्याच पाणीटंचाईने कळस गाठलेल्या शहराचे आणि आसपासच्या पाच-सहा गावांचे काम राहुल यांच्याकडे आले. त्यातून त्यांनी आपल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करत, तेथील जवळपास 100 बोअरवेल्सना पाणी आणून दाखवले आणि आता तो परिसर उन्हाळ्यातसुद्धा आता टँकरमुक्त असतो.

या संपूर्ण कामातून राहुल यांनी अनेक गावांमधील कोरड्याठाक बोअरवेल्सना जलयुक्त केले आणि हेच कार्य व्यापक पातळीवर राबविण्याचा राहुल यांचा मानस आहे.भारत हा मोठा खंडप्राय देश. त्यामुळे या एवढ्या मोठ्या देशात आपल्याला केवढे मोठे काम करणे बाकी आहे, याची राहुल यांनाही कल्पना आहेच. हे साहजिकच एकट्यादुकट्याने करायचे काम नक्कीच नाही, त्यासाठी अनेक हातांची, मदतीची गरज आहे. म्हणूनच अनेक जणांनी या कामांत आपला हातभार लावणे गरजेचे आहे. तेच काम पुढे नेण्यासाठी राहुल यांनी अनेक गावांतील होतकरू तरुणांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी पुढे यावे, हे तंत्रज्ञान शिकून घ्यावे आणि या क्षेत्रात काम करावे आणि आपापल्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी करण्यासाठी काम करावे, यातूनच हे काम पुढे जाणार आहे. लोक त्यातूनच बोध घेऊन पुढचे काम करणार आहेत. त्यामुळे या क्षेत्रात काम करताना राहुल यांच्यासमोर लोकांच्या सहभागातून हा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे उद्दिष्ट आहे.

आतापर्यंत या क्षेत्रात काम करत असताना, आलेल्या अनुभवांवरून या क्षेत्रात नव्याने येणार्‍या युवकांना राहुल हाच संदेश देतात की, “प्रश्न आणि त्यांचे गांभीर्य ओळखून काम करायला शिका. या कामातून आपण फक्त फायदा मिळविणे, हाच एकमेव उद्देश न ठेवता आपण एक सामाजिक बांधिलकी जपत आहोत, हे गांभीर्य ठेवावे. या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रचंड संधी आहेत, फक्त तितक्या मनापासून काम करायला हवे.”स्वतःच्या कामातून, अभिनव कल्पनांमधून समाजाच्या भल्यासाठी आपल्या बुद्धीचा वापर करणार्‍या आणि जलसंवर्धनासाठी काम करणार्‍या राहुल यांचे आणि त्यांच्या ‘ऊर्ध्वम् एन्व्हार्नमेंटल टेक्नोलॉजीज् प्रायव्हेट लिमिटेड’चे काम अत्यंत महत्त्वाचे आणि काळाची गरज आहे, असेच म्हणावे लागेल.









आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हर्षद वैद्य

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये उपसंपादक (वेब आणि प्रिंट) म्हणून कार्यरत. रुईया महाविद्यालयातून गणित या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. आर्थिक क्षेत्राशी संबंधित वृत्तांकन आणि लेखन. भारतीय संगीत, इतिहास या विषयांमध्ये विशेष रस. महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य. अर्थशास्त्र विषयात महाविद्यालयात संशोधन केले आहे. शैक्षणिक, सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्राचाही अनुभव.