भगवद्गीता आणि अन्य गीतांमधील तत्त्वज्ञान

    02-Dec-2022   
Total Views |

Geeta
 
 
आज गीता जयंती. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील शुक्ल एकादशी हा दिवस ‘गीता जयंती’ म्हणून ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध कार्यक्रम, उपक्रम या दिवशी आयोजित केले जातात. त्यानिमित्ताने भगवद्गीता आणि अन्य उपलब्ध गीतांचा थोडक्यात आढावा घेऊ.
 
जारो वर्षांपासून सर्व स्तरांतील, प्रदेशांतील सर्वांना गीतेतील अवीट माधुर्याने आणि सौंदर्याने मुग्ध केले आहे. भगवंतांनी अर्जुनाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानवजातीला गीताज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन मार्ग दाखवला, तो आजचा दिवस म्हणजे गीता जयंती. एखाद्या ग्रंथाचा निर्माणोत्सव साजरा होणे, हे दुर्मीळच!
 
 
 
कौरव-पांडवांच्या ऐन युद्धाच्या प्रसंगी भगवंतानी अर्जुनाला रणांगणामध्ये दोन सैन्यांच्या मध्ये रथ उभा केलेला असताना दोन्ही बाजूंची रणवाद्यं गर्जू लागली तेव्हा हा उपदेश केला. वडील-बंधू, गुरू, काका, मामा, पुत्रपौत्र, सासरे आणि मित्र हे दोन्ही पक्षांत संग्रामार्थ सज्ज झालेले पाहून आणि पुढे घडणार्‍या भयंकर भावी संहाराचे चित्र त्याच्या मनासमोर उभे राहिले आणि तो त्या दारूण विनाशाच्या भीतीने स्तंभित झाला. त्याच्या हृदयात आप्तजनांविषयी करूणा उत्पन्न झाली. तो संहार डोळ्याने पाहण्यापेक्षा युद्धातून निवृत्त होऊन संन्यास घेतलेला बरा, असा विचार त्यांच्या अंत:करणात प्रबळ झाला. त्याला असे दिसू लागले की, विजय मिळाला किंवा पराभव झाला काय, युद्ध संपल्यावर जगण्याची इच्छाच राहणार नाही. ज्यांच्याकरिता जगायचे आहे, त्यांचाच संहार होणार आहे.
 
 
 
या युद्धामुळे कोणतेच कल्याण होणार नाही म्हणून अर्जुन श्रीकृष्णाला या द्विधा मनःस्थितीत म्हणाला की, “मी युद्ध करण्यास तयार नाही.” अशा संभ्रमावस्थेत असलेल्या अर्जुनाला आध्यात्मिक तत्त्वज्ञानाच्या आधाराने भगवंतानी अखेरीस युद्धास प्रवृत्त केले, असे आपण भगवद्गीतेविषयी म्हणू शकतो.
 
 
 
श्रीमद्भगवद्गीता आणि त्यातील अध्यात्म हे परिचित आहेच. परंतु, भारतवर्षात आणि पाश्चात्यांमध्ये गीतेविषयी झालेले संशोधन बघणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. साधरण इसवी सन पूर्व चौथ्या-पाचव्या शतकाच्या सुमारास प्रचलित झालेल्या भागवत धर्म, त्यातून आलेली वैष्णव उपनिषदे आणि त्याचाच विस्तार म्हणजे सध्याची भगवद्गीता असावी, असे अनेक पाश्चात्य संशोधकांचे मत आहे. इसवी सन पूर्व दुसर्‍या शतकातील काही कोरीव लेखांवरून असे दिसते की, गांधार देशातील (अफगाणिस्तानातील) ग्रीक रहिवांशानी भागवत धर्माचा स्वीकार केला होता. भगवद्गीता मुळात छोटीच असली पाहिजे, असे हे गृहित धरून जर्मन पंडित आ. र. गार्वे याने मूळ भगवद्गीता आणि त्यात नंतर भर पडलेली म्हणजे ‘प्रक्षिप्त भगवद्गीता’ केवढी हे स्वतः प्रकाशित केलेल्या गीतेच्या पुस्तकात दाखवून दिले. त्यांच्या मते, हा प्रक्षिप्त भाग म्हणजे वेदांत तत्त्वज्ञान आणि वैदिकधर्मासंबंधी वचने होय.
 
 
शिक्षणशास्त्रज्ञ ग. श्री. खैर यांना मूळ गीतेच्या शोधासंदर्भातील पुस्तक लिहून गीतेचे लेखन निरनिराळ्या वेळी, वेगवेगळ्या लेखकांनी केले असावे, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यातील पहिल्याने ब्रह्मप्राप्तीचे, दुसर्‍याने अव्यक्त अशा परम पुरुषाच्या प्राप्तीचे आणि तिसर्‍याने वासुदेव देवतेच्या सगुण भक्तीचे स्वरूप वाचकांपुढे मांडले, असे खैर म्हणतात.
 
 
 
परंतु, आज अस्तित्वात असलेल्या गीतेचे समग्र स्वरूप आहे, ते सर्व विचारात घेता, त्यातील विचारांचा ऐतिहासिक क्रम कोणता, मूळ भाग कोणता व नंतरचा भाग कोणता या गोष्टींचा निर्णय करणे अवघड आहे. भगवद्गीतेमध्ये ज्ञानमूलक कर्मयोगाचाच आदेश हा मुख्य आहे, असे ‘गीतारहस्य’कार लोकमान्य टिळक यांचे मत जरी खरे असले, तरी काही ठिकाणी सांख्य, योग किंवा ज्ञानयोगाचा, अखेरच्या अठराव्या अध्यायात भक्तियोगाचा अंतिम संदेश भगवंतानी दिला आहे, असे स्पष्ट दिसते. ज्ञानयोग, कर्मयोग व भक्तियोग यापैकी कोणताही योग हा प्रधान मानला, तरी ज्ञानयोगाला कर्मयोगाची आणि भक्तियोगाची जोड द्यावीच लागते.
 
 
ज्ञानापासून आणि भक्तीपासून या तीन योगांपैकी कोणताही योग वेगळा करता येत नाही. अचल समाधी हा त्यांचा गाभा आहे. सुख-दुःखाच्या द्वंद्वांच्या पलीकडची अनासक्त अवस्था हे या सर्व योगांचे शुद्ध अधिष्ठान आहे. या अधिष्ठानाचे परमशांती किंवा ब्रह्मप्राप्ती हे अंतिम स्वरुप आहे.
 
 
 
प्राचीन काळापासून आतापर्यंत अनेक भाष्यकार झाले आहेत. प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातून भगवद्गीतेचे ज्ञान सांगितले आहे. आद्य शंकराचार्यांच्या मते, भगवद्गीता म्हणजे निष्काम कर्मजन्य चित्तशुद्धीने निष्पन्न होणारे ज्ञान आहे. रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्काचार्य, संत ज्ञानेश्वर इ. आचार्यांच्या मते ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करीत साक्षात्काररुप झालेली भक्ती म्हणजे भगवद्गीता होय. योगी अरविंदांच्या मते, कर्म, पातंजलयोग, ज्ञान व भक्ती याचा समुच्चय म्हणजे पूर्णयोग होय. तीच भगवद्गीता आहे.
 
 
 
प्रत्येक आचार्यांचे भगवद्गीतेसंदर्भात वेगवेगळे मत असले तरी भगवद्गीता ही समस्त विश्वाला श्रद्धास्थानी आहे.
अर्जुनाच्या संमोहाचा किंवा संग्रमाचा निरास करण्याकरिता आत्मतत्त्वाच्या विवरणापासून भगवंतांनी प्रारंभ केला. त्यात कर्मयोग सांगून फलाची अपेक्षा न धरता निष्काम बुद्धीने स्वधर्माने आचरण करावे, हा सिद्धांत ते मांडतात. परंतु, त्याबरोबरच वैराग्यमूलक नैष्कर्म्याचा उपदेशही केलेला आढळतो, तो योगधर्माचा उपदेश आहे.
 
 
सर्व सुखपरित्याग करून ईश्वर चिंतन करताना आधी मृत्यू प्राप्त झाला, तर सर्व साधना वाया जाते का, असा प्रश्न अर्जुनाने भगवंताला केला. त्यावर भगवंतांनी उत्तर दिले की, “स्वतःचे जसे पूर्वकर्म असेल त्याचप्रमाणे म्हणजे कर्मानुरूप पुढील जन्म मनुष्यास प्राप्त होत असतो, हा कर्मवाद. या नियमानुसार योगसाधना अर्धवट सोडून या जगातून गेलेला मनुष्य पवित्र श्रीमंत कुलात अथवा योग्यांच्याच कुलात जन्मतो आणि मागील जन्माचा योगाभ्यास त्याला योगसाधनेकडे ओढतो, प्रवृत्त करतो व तो सिद्धावस्थेस पोहोचतो, हे भगवद्गीतेतील योगदर्शन होय.”
 
 
 
पुढे येतो तो भक्तियोग. अत्यंत पापी, दुराचारी मनुष्याचासुद्धा उद्धार होऊ शकतो, असे भगवंतानी आश्वासन दिले, त्याचा मार्ग भक्तिमार्ग होय. परमेश्वराची अनन्यभक्ती केल्याने समस्त जीव भवसागर तरून जातात, असे श्रीकृष्ण सांगतात. शरणागत भावनेने पान, फूल, फळ जरी वाहिले तरी परमेश्वर त्याचा स्वीकार करतो.
 
 
 
आता भगवद्गीतेत अंतर्विरोधी विधाने भरपूर आहेत. त्यामुळे सामान्य भक्त गोंधळून जातो. अशावेळी गीतेवरील भाष्य अभ्यासावीत. ‘गीतारहस्य’सारख्या ग्रंथाचा अभ्यास करावा. अनेक जणं गीता पाठ करतात, पठण करतात, रोज वाचतात. पण, केवळ गीता वाचण्यापेक्षा तिचा अर्थ जाणून घेऊन, उमजून तो आपल्या आयुष्यात उतरविणे, गीतेत सांगितलेला एखादा योग आचरणे महत्त्वाचे आहे.
 
 
अंतिमत: संपूर्ण गीताशास्त्राचा निःश्रेयस पर्यवसायी सारभूत अर्थ म्हणजे -
मत्कर्मकृन्मत्परमो मदभक्तः संगवर्जितः।
सर्वभूतेषु यःस मामेति पांडव ॥ (गीता 11.55)
 
 
माझ्याकरिता कर्मे करणारा, मीच ज्याचे अंतिम उद्दिष्ट आहे असा माझा भक्त, आसक्तीरहित, प्राणिमात्राबद्दल निर्मोह वृत्तीचा असे सर्व माझ्यापाशी येतात... हे गीतासार जाणून गीता जगण्याचा प्रयत्न आपण गीता जयंतीच्या निमित्ताने केला पाहिजे.
 
 
आता ‘गीता’ हा जरी भगवद्गीता शब्दाचाच संक्षेप असला, तरी संस्कृतमध्ये ‘गीता’ हे उपपद असलेल्या सुमारे 200 गीता सापडतात.
 
 
अनुगीता : अनु म्हणजे एक मोठ्या भागासोबत, लागून किंवा चिकटून! ‘अनुगीता’ महाभारताच्या अश्वमेधिक पर्वामध्ये आहे. जेव्हा कुरुक्षेत्राचे युद्ध संपून ज्येष्ठ पांडव युधिष्ठिराचा राज्यभिषेक होणार असतो तेव्हा साधलेला हा संवाद आहे. श्रीमद्भगवद्गीतेसारखाच या अनुगीतेतील संवाद श्रीकृष्ण आणि अर्जुनमध्ये झालेला आहे.
 
 
 
उद्धवगीता : सुरुवातीपासूनच उद्धव हा भाऊ, श्रीकृष्णाचा सारथी असतो. जेव्हा श्रीकृष्णाचे मनुष्य अवताराचे ध्येय साध्य होऊन जाते तेव्हा ते त्यांच्या वैकुंठाला जायचे ठरवतात. तेव्हा ते उद्धवाला जवळ बोलावतात आणि म्हणतात की, “माझ्या पूर्ण जीवनकालात तू माझी सेवा केली आहेस, तरी तू माझ्याकडून काहीच मागितले नाहीस.” त्यावर उद्धव आपली शंका बोलून दाखवतो. तो म्हणतो, “तुम्ही या जीवनकालात अनेक गोष्टी केल्यात. तुमचे तत्त्वज्ञान आणि तुमचे वैयक्तिक जीवन वेगळे होते. मला याबद्दल ज्ञान आणि उपदेश करा.” त्यावरून मग श्रीकृष्ण आणि उद्धवामध्ये संवाद झाला. हा संवाद ‘उद्धवगीता’ म्हणून ओळखली जाते.
 
 
 
अवधूतगीता : अवधूतचा अर्थ मोक्ष मिळालेला, ब्रह्मप्राप्ती झालेला किंवा परिपूर्ण स्वतंत्र झालेला असा आहे. गुरु दत्तात्रेय यांनी ‘अवधूतगीता’ सांगितलेली आहे, म्हणून या गीतेला ‘दत्तात्रेय गीता’ किंवा ‘अवधूत ग्रंथ’ असेही म्हणतात.
व्याधगीता : महाभारतातील वन किंवा अरण्य पर्वामध्ये ही गीता आढळते. पांडवांनी 12 वर्षांचा वनवास सुरु केला होता तेव्हा युधिष्ठिरला मार्कंडेय ऋषींनी ही गीता सांगितली.
 
 
 
गुरुगीता : ही गीता स्कंदपुराणमध्ये आहे. या गीतेत उपदेश देणारे भगवान शिव आहेत आणि प्रश्नकर्ता त्यांची शक्ती देवी पार्वती आहे. गुरू या शब्दाचा अर्थ = गु - अंध:कार, रु - नष्ट करणारा, बाहेर काढणारा म्हणजेच अंधार, अज्ञान नष्ट करणारा असा होतो. गुरुगीतेत महादेवांनी एक गुरू कसा असतो, त्याची आराधना आणि भक्ती कशी करावी याबद्दल देवी पार्वतीला उपदेश दिलेले आहेत.
 
 
 
अष्टावक्र गीता : मिथिलाचे राजा जनक यांना मला मुक्ती कशी मिळेल, या प्रश्नाचे उत्तर हवे असते. या आणि अशाच अनेक शंकेचे निराकरण अष्टावक्र यांनी केलेले आहे. अष्टावक्र ऋषी जे आठ वेगवेगळ्या ठिकाणी शरीराने वाकलेले होते त्यांचा आणि राजा जनक यांचा हा संवाद आहे. म्हणून ही ‘अष्टावक्र गीता.’
 
 
 
अशा अनेक गीता आपल्याला संस्कृत साहित्यात आढळून येतात. समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये
 
शिवगीता रामगीता। गुरुगीता गर्भगीता।
उत्तरगीता अवधूतगीता। वेद आणि वेदांत॥
भगवद्गीता ब्रह्मगीता। हंसगीतां पांडवगीता। गणेशगीता यमगीता। उपनिषदें भागवत॥
 
 
असे सांगितले आहे. यावरून साधरण किती गीता प्रचलित असाव्यात याचा अंदाज येतो.
आज गीता जयंतीच्या निमित्ताने श्रीकृष्णाला स्मरून त्याने सांगितलेली भगवद्गीता जगण्याचा प्रयत्न करूयाच, परंतु, अन्य गीतांमधीलही तत्त्वज्ञान अभ्यासूया...
9156740781
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

वसुमती करंदीकर

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात संस्कृतमध्ये पीएच.डी करत आहे. प्राच्यविद्या शास्त्र, संस्कृत वृत्तपत्रविद्या यामध्ये पदविका: ब्राह्मी, मोडी, हस्तलिखितशास्त्र, मायथॉलॉजी यांचे सर्टिफिकेट कोर्स विशेष श्रेणीसह पूर्ण केले आहेत. मुंबई विद्यापीठाचे विद्यापीठ स्तरावरचे बुद्धिबळाचे सुवर्ण तर कथा लेखनाचे रौप्य पदक प्राप्त. आतापर्यंत ८ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.