
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या अलीगढ भागात नीलांचल एक्सप्रेसमध्ये धक्कादायक दुर्घटना उघडकीस आली आहे. रेल्वे रुळावर पडलेला एक रॉड सरळ रेल्वेची खिडकी तोडून थेट प्रवाशाच्या मानेत घुसला आणि डोक्याचा भाग फाडून बाहेर आला. दरम्यान, या दुर्घटनेत प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. यावेळी रेल्वे ताशी ११० किमी वेगाने जात होती. ही दुर्घटना डाबर-सोमना रेल्वे स्थानकादरम्यान झाली. या दुर्घटनेनंतर बोगीत हाहाःकार माजला होता. प्रवाशांची एकच तारांबळ उडाली होती. नेमका प्रकार काय घडला हे काहीकाळ कळलेच नाही.
संपूर्ण बोगी रक्ताने लाल झाली होती. त्यानंतर प्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबवली. पुढील तपासासाठी प्रवाशाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. रेल्वेतर्फे वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रवाशाचे नाव हरिकेश कुमार दुबे, असे असून तो सुल्तानपुरच्या गोपीनाथपुर गावातील रहिवासी होता. गुरुवारी घरी जाण्यासाठी सुल्तानपुरासाठी निघाला होता. अपघातग्रस्त अलीगडच्या सोमनात पोहोचणार असतानाच ही दुर्घटना घडली होती. हरिकेशच्या दिल्लीतील मोबाइल टॉवरशी निगडीत कंपनीत टेक्निशिअन होते. मृत प्रवासी जनरल बोगीत खिडकी जवळ बसला होता.
सहप्रवाशांची उडाली भांबेरी
या भयानक दुर्घटनेनंतर हरिकेशजवळ बसलेली सहप्रवासी महिला थोडक्यात बचावली. ही महिला दुबेच्या बाजूलाच बसली होती. रॉड महिलेच्या मानेजवळून गेला. याच महिलेने रेल्वे अधिकाऱ्यांना याबद्दलची माहिती दिली. रेल्वे वेगात होती. त्यानंतर डोळ्याची पापणी लवते न लवते तोच ही दुर्घटना घडली. रेल्वेचा आवाज इतका होता की, प्रवाशाची किंचाळीही कुणाला ऐकू आली नाही. त्यानंतर काहीकाळाने महिलेने पाहिलं तर दुबे यांच्या मानेत रॉड घुसला होता. त्यानंतर सहप्रवाशांची एकच तारांबळ उडाली होती. त्यानंतर रेल्वे पोलीसांत याबद्दल तक्रार करण्यात आली.