‘हॅपिनेस स्क्वाड’च्या निमित्ताने...

    02-Dec-2022   
Total Views |
 
हॅपिनेस स्क्वाड
 
 
 
 
त्याची माणसं देशातल्या प्रत्येक शाळेतील 13 ते 15 वर्षांच्या मुलींवर नजर ठेवतात. त्यातली सर्वांत सुंदर मुलगी, जिचा आवाज मधूर आहे आणि उंची 170 सेमी आहे, तिला तिची आणि तिच्या पालकांची सहमती असो वा नसतो तिला ‘हॅपिनेस स्क्वाड’मध्ये भरती केले जाते. तिथे तिला नृत्य, गायन आणि इतर प्रमुख कलांच्या बरोबरच मनोरंजन करण्याची कलाही शिकवली जाते. शिक्षण पूर्ण झाले की मग या मुलींची रवानगी तीनपैकीएका ग्रुपमध्ये केली जाते. मुलगी कोणत्या ग्रुपमध्ये काम करणार हे तिच्या सौंदर्यानुसार आणि विकसित कलागुणांनुसार ठरवले जाते. हे तीन ग्रुप कोणते? तर एक ग्रुप विवस्त्र नृत्य करणार्‍या मुलींचा, दुसरा ग्रुप अर्धनग्न अवस्थेत गायन आणि संवाद करणार्‍या मुलींचा तिसरा ग्रुप मसाज करणार्‍या मुलींचा. हे सगळे या मुलींनी कुणासाठी करायचे तर देशातील प्रमुख सैन्य आणि प्रशासकीय अधिकार्‍यांसाठी.
 
 
या ‘हॅपिनेस स्क्वाड’ ग्रुपमध्ये दोन हजार मुली आहेत. यातल्या सगळ्यात सुंदर मुली मात्र केवळ आणि केवळ देशाच्या प्रमुखासाठीच काम करणार. वयाच्याा 13व्या वर्षी कामाला ठेवल्या जाणार्‍या या मुलींना वयाच्या 25 पर्यंत निवृत्ती दिली जाते. मात्र, या ‘स्क्वाड’बद्दल तिने कुठेही वाच्यता करायची नाही. तसे करणे म्हणजे राजद्रोह, त्याची सजा मृत्युदंड! 21व्या शतकात ही मुलींसाठीची लैंगिक गुलामगिरी कुठे आहे, तर उत्तर कोरियामध्ये.
 
 
या ‘हॅपिनेस स्क्वाड’ची सुरुवात खरे तर 70च्या दशकात किम जोंग-उनच्या आजोबांनी केली होती. या ‘हॅपिनेस स्क्वाड’ला उत्तर कोरियामध्ये ‘किप्पुमजा’ म्हणतात. ‘किप्पुमजा’ ‘हॅपिनेस स्क्वाड’मध्ये खरेच ‘हॅपिनेस’ आहे का? वयाने तिप्पट असलेल्या पुरुषांच्या मनोरंजनाचे साधन बनावे म्हणून या बालिकांना त्यांच्या मर्जीविरूद्ध जीवन जगावे लागते. मर्जी असो नसो, समोरचा अधिकारी आवडो की न आवडो, आदेश आला की त्यांना त्या अधिकार्‍याचे सर्व प्रकारचे (त्यात लैंगिक संबंधही आलेच!) मनोरंजन करावेच लागते. त्यांना नकार द्यायचा अधिकार नाही. तसे केले तर सजा ठरलेली!
 
 
या गुलामगिरीविरोधात कोण आवाज उठवणाार? या देशातले लोक? त्यांचे जगणे तर आधीच अनेक नियामंनी जखडलेले. इतके की इथे देशातील महिला आणि पुरुषांनी कोणती केशरचना करावी, याचेही प्रकार ठरवून दिलेत. मुली-महिला केवळ 18 पद्धतीचे, तर पुरूष केवळ दहा पद्धतीची केशरचना करू शकतात. त्या व्यतिरिक्त त्यांनी केशरचना केली, तर गुन्हा आहे आणि सजा आहेच. इथे बाहेरच्या देशाशी कोणत्याही साधनाने संपर्क साधणेही गुन्हा आहे. केवळ ठरावीक प्रशासकीय अधिकारी कामानिमित्त दुसर्‍या देशातल्या अधिकार्‍यांशी संपर्क करू शकतात.
 
 
देशाच्या राजधानीत देशातल्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोकांनी राहायचे तर गरीब आणि सामान्य लोकांनी राजधानी बाहेर राहायचे हा नियम. देशात रात्री वीज नसते. हो, मायक्रोव्हेव वापरणेही गुन्हा आहे. किंग जोंग-उनने नव्याने काढलेला नियम आहे की, सहा महिन्यांपासून ते यापुढे जी मूल जन्माला येतील, त्यांची नाव युद्धसामग्री आणि देशभक्तीपरच असली पाहिजेत. तसे झाले नाही, तर पालकांनाच देशद्रोही ठरवले जाणार. यावर कडी म्हणजे या देशातील ‘प्रिझन व्हिलेज.’ हे आणखी भयंकर प्रकरण.
 
 
किंग जोंग-उन किंवा प्रशासनाविरोधात बोलले की, बोलणार्‍या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. त्या व्यक्तीची रवानगी कैद्यांच्या गावात केली जाते. इथे सगळे कैदी राहतात. त्यांना अपुरे अन्न आणि कष्टाचे काम दिले जाते. एक प्रकारे वेठबिगार म्हणूनच आजन्म ठेवले जाते. कुपोषणामुळे इथले हजारो लोक मृत्युमुखी पडले. या ‘प्रिझन व्हिलेज’मध्ये दोन लाख कैदी आहेत.हे कैदी पळून जायचा प्रयत्न तर काय विचारही करत नाहीत. कारण, त्यांनी तसे केले तर त्यांच्या पूर्ण कुटुंबीयांना मृत्युदंडाची सजा होणार. यामध्ये कुटुंब म्हणजे त्या व्यक्तीचे आजी-आजोबा, आई-वडील आणि त्या व्यक्तीची अपत्ये यांचा समावेश.
 
 
सगळ्या नियमांना कंटाळून या देशातले नागरिकसुद्धा देशही सोडू शकत नाहीत. कारण, सरकारी काम सोडून देशाबाहेर कुणी व्यक्तीने जाण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना ‘शुट अ‍ॅट साईट’ करावे असा कायदा आहे. त्या देशात बाहेरच्या देशातले नागरिक गेले आणि त्यांनी गाईड सोडून इतर नागरिकांशी बोलायचा प्रयत्न केला, तर त्यांनाही तुरुंगात डांबले जाते. उत्तर कोरियामध्येही कधी ना कधी लोकक्रांती होईलच. या पार्श्वभूमीवर भारतीय म्हणून आपण नक्कीच भाग्यवान आहोत!
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.