सीमा भागात लोकवस्ती विस्तारण्याची गरज : सैन्यदल प्रमुख

    19-Dec-2022   
Total Views |
जनरल अनिल चौहान


९ डिसेंबर रोजी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक तवांग भागात घुसण्याचा प्रयत्न करीत असताना भारतीय सैनिकांनी त्यांना पिटाळून लावले. चीनच्या सैनिकांनी केलेला घुसखोरीचा अयशस्वी प्रयत्न लक्षात घेऊनच सीमा भागात दूरवर जेथे वस्ती नाही अशा भागात लोकवस्ती वसविण्याची सैन्यदल प्रमुख चौहान यांनी केलेली सूचना नक्कीच रास्त आहे.


उत्तराखंड राज्यातील सीमेलगतच्या अनेक भागांमध्ये वस्ती नाही. राज्याच्या शेवटच्या गावांच्या पलीकडे लोकवस्ती नसलेला प्रचंड भूभाग आहे. अशा भागांमध्ये लोकवस्ती वसविण्याची आवश्यकता आहे. त्या भागात लोकवस्ती वसविण्याचा प्रयत्न व्हायला हवा. काही कारणांमुळे ते शक्य नसल्यास सीमा पर्यटन लोकप्रिय होईल यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत,” असे प्रतिपादन सैन्यदल प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी केले आहे. नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

उत्तराखंड राज्यातील शेवटच्या गावांच्याही पुढे लोकवस्ती नसलेला मोठा भूभाग आहे. तेथे लोकवस्ती नसेल, तर त्या भागावर शत्रूची नजर पडू शकते, हे लक्षात घेऊन सैन्यदल प्रमुखांनी ही सूचना केली आहे. उत्तराखंडमधील सहा खोर्‍यांमध्ये इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. अलीकडेच तवांग भागात भारतीय जवान आणि चिनी सैनिक यांच्यात झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सैन्यदल प्रमुखांनी आपले मत व्यक्त केले आहे. चीनने अलीकडेच अरुणाचल प्रदेशात यांगत्से येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करून ‘जैसे थे’ स्थिती एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न केला होता. पण चीनच्या सैनिकांना भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले, अशी माहिती अलीकडेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात दिली होती.

भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवान किरकोळ जखमी झाले होते. आपली क्षेत्रीय एकात्मता राखण्यासाठी आपली सैन्यदले वचनबद्ध आहेत आणि आपल्या प्रदेशात घुसखोरी करण्याचा कोणताही प्रयत्न त्यांच्याकडून हाणून पाडला जाईल, असेही संरक्षणमंत्र्यांनी म्हटले होते.या महिन्यात ९ डिसेंबर रोजी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक तवांग भागात घुसण्याचा प्रयत्न करीत असताना भारतीय सैनिकांनी त्यांना पिटाळून लावले. चीनच्या सैनिकांनी केलेला घुसखोरीचा अयशस्वी प्रयत्न लक्षात घेऊनच सीमा भागात दूरवर जेथे वस्ती नाही अशा भागात लोकवस्ती वसविण्याची सैन्यदल प्रमुख चौहान यांनी केलेली सूचना नक्कीच रास्त आहे.
हे १९६२ साल नव्हे; तवांगच्याभिक्षुंचा इशारा
चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा जो असफल प्रयत्न केला तो लक्षात घेऊन तवांगच्या बौद्ध मठामध्ये राहणार्‍या धर्मगुरू आणि भिक्षूंनी चीनला खणखणीत इशारा दिला आहे. हे १९६२ वर्ष नसून हे २०२२ वर्ष आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे, असे या मठाच्या भिक्षूंनी चीनला बजाविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणालाही सोडणार नाहीत. आम्ही मोदी सरकार आणि भारतीय सैन्यदलाच्या पाठीशी आहोत, असेही या भिक्षूंनी म्हटले आहे. तवांग येथील बौद्ध मठ १७व्या शतकातील असून या मठात राहणार्‍यांनी १९६२च्या भारत-चीन युद्धाचा अनुभव घेतला आहे. या मठातील लामा ऐशी खावो म्हणाले की, चीन हा नेहमीच अन्य देशांचे भूभाग गिळंकृत करीत असतो. त्यांचा भारतीय प्रदेशावरही डोळा आहे.

 चीनचे हे वर्तन चुकीचे आहे. त्यांना जागतिक शांतता हवी असेल, तर त्या देशाने असे वर्तन करणे साफ चुकीचे आहे, असेही लामा खावो यांनी म्हटले आहे. चीनने तिबेट गिळंकृत केल्यानंतर तवांगवर आपला दावा केला आहे. पण अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य आहे, असे चीनला ठणकावून सांगण्यात आले आहे. असे असूनही चीन भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा असफल प्रयत्न करीत आहे. या भागात भारतीय सैन्य असल्याने आम्हाला चिंता करण्याचे काहीच कारण नाही, असेही लामा खावो यांनी स्पष्ट केले. तवांग येथील बौद्ध मठ १६८१ मध्ये स्थापन झाला आहे. हा मठ आशिया खंडातील दुसरा भव्य मठ आहे. पाचव्या दलाई लामांच्या मान्यतेनंतरच या मठाची उभारणी करण्यात आली होती.

साम्यवादी हे गुन्हेगारच; हंगेरियन निर्मात्याचे स्पष्ट मत


केरळमध्ये डाव्या आघाडीचे सरकार असून त्या राज्यात आयोजित करण्यात आलेल्या २७व्या केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘हंगेरियन’ चित्रपट निर्माते बेला टार यांनी साम्यवाद्यांचे पितळ उघडे पाडले. साम्यवादी राजवट असलेल्या केरळ राज्यातच त्यांनी साम्यवाद्यांबाबतची आपली मते निर्भीडपणे व्यक्त केली. या हंगेरियन निर्मात्याने आपण चांगला साम्यवादी आतापर्यंत कधीच पहिला नाही, असे सांगून साम्यवादी हे गुन्हेगार असतात, असे मत मांडले. एका मल्याळम वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले हे मत मांडले आहे. ते म्हणाले की, “आपल्या देशाने (हंगेरी) एकेकाळी साम्यवादाचा स्वीकार केला होता. पण त्याच माझ्या देशाने आपणास साम्यवादाचा द्वेष करण्यास शिकविले.

आपण वयाच्या १६ वर्षेपर्यंत कट्टर साम्यवादी होतो. पण ज्या नेत्यांना आम्ही आदर्श मानत होतो ते नेते ढोंगी असल्याचे नंतर दिसून आले. त्यानंतर साम्यवादाचा मार्ग आपण सोडून दिला. आपण आतापर्यंत एकही चांगला साम्यवादी पाहिला नाही. आपली गुन्हेगारी कृत्ये लपविण्यासाठी नेतेमंडळी साम्यवादाचा बुरखा पांघरतात,” असेही या चित्रपट निर्मात्याने म्हटले आहे. “त्यातील अनेकांना साम्यवाद आणि मार्क्सवाद यातील फरक माहीत नाही. केरळमध्ये काय स्थिती आहे याची आपणास कल्पना नाही,” असेही ते म्हणाले.साम्यवाद आणि समाजवाद यांच्याद्वारे प्रगती केलेला एकही देश आपण पाहिला नाही. त्यावर काही चीनचे नाव घेतील. पण चीन हा भांडवलशाही देश आहे, असे आपले मत आहे. केवळ फलकावर कम्युनिस्ट छापले याचा अर्थ कम्युनिस्ट पार्टी असा होत नाही, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत! साम्यवादामुळे ज्या देशांची दुरवस्था झाली त्यांची मोठी सूची होईल. माजी साम्यवादी देशांमध्ये आजच्या घडीला प्रचंड गरिबी आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. साम्यवादी राजवटीचा अनुभव घेतलेल्या या ‘हंगेरियन’ चित्रपट निर्मात्याने जी परखड मते व्यक्त केली ती पाहता साम्यवाद्यांचा नेमका चेहरा कसा आहे, ते या निर्मात्याने जगापुढे दाखवून दिले आहे.



नमामि गंगे


‘नमामि गंगे’चा १० जागतिक उपक्रमांमध्ये समावेश!


भारताने गंगा नदीचे पावित्र्य राखण्यासाठी आणि त्या नदीच्या क्षेत्रातील पर्यावरणाची जपणूक आणि संवर्धन करण्याच्या हेतूने जो ‘नमामि गंगे’ कार्यक्रम हाती घेतला आहे त्या कार्यक्रमाचा संयुक्त राष्ट्रांनी जगभरातील दहा पर्यावरण संवर्धन कार्यक्रमामध्ये समावेश केला आहे. संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रमाने जे दहा प्रकल्प यासाठी निवडले आहेत त्याद्वारे सुमारे ६८ दशलक्ष एकर जमीन पुन्हा वापराखाली येईल. तसेच त्यामुळे सुमारे १ कोटी, ५० लाख रोजगार उपलब्ध होतील. म्यानमार, फ्रान्स किंवा सोमालियाच्या क्षेत्रापेक्षा जास्त जमीन उपयोगाखाली येईल, असा अंदाज आहे. त्या दहा महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये ‘नमामि गंगे’ प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे.

गंगा प्रदूषणमुक्त करणे, वनक्षेत्राची पुन्हा निर्मिती करणे यासह ज्या विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत त्याचा लाभ गंगेच्या खोर्‍यात राहणार्‍या ५२ कोटी जनतेला होणार आहे. त्याचप्रमाणे डॉल्फिन, कासवे, हिल्सा मासे यासह अन्य अनेक वन्यजीवांचे संवर्धन या कार्यक्रमामुळे होणार आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक उपक्रमाने म्हटले आहे. ‘नमामि गंगा’ उपक्रमामुळे २५ हजार वनस्पती आणि वन्यजीव यांचे संवर्धन केले जाणार आहे. या दहापैकी अन्य नऊ प्रकल्प अन्य देशांमध्ये आहेत. त्यामध्ये ‘नमामि गंगे’ उपक्रमाचा समावेश करण्यात आला ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.