कागदाच्या नोटा बनविण्याचे आमिष दाखवून 5 लाखांची फसवणूक

    19-Dec-2022
Total Views |
नोटा

उल्हासनगर :साधारण कागदाच्या बनविण्याचे आमिष दाखवून एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या सुपरवायझरला ५ लाखांचा गंडा घालणाऱ्या ३ जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उल्हासनगर -५ या परिसरात प्रभाकरण शंकर कुनतली ( ५२ ) हा इसम त्याच्या कुटुंबासह राहतो. प्रभाकरन यांचा भाचा सुमित कैनादत्त याने त्यांना घरी बोलावून राजू पांडुरंग भोईर, राहणार खुपरी बेलवली तालुका वाडा , जिल्हा पालघर , सुरेश मोतीराम भोईर राहणार, नंदी, तालुका भिवंडी जिल्हा ठाणे आणि एका अन्य इसमाशी ओळख करून दिली. या इसमांनी एक साधारण कागद पाण्यात बुडवून हातचलाखी व लबाडीने शंभर रुपयांची नोट बनवून दाखवली होती. यामुळे आरोपींनी प्रभाकरणचा विश्वास संपादन केला.

आरोपींनी प्रभाकरण यांना आणखी पैसे हवे असतील तर काही सामान आणि पैशांची जुळवाजुळव करावी लागेल असे आमिष दाखवून त्याला आपल्या जाळ्यात ओढले, प्रभाकरणने किती खर्च होईल असे विचारले असता आरोपींनी ५ लाख रुपयांपर्यंत खर्च येईल मात्र त्याचे दुप्पट पैसे तुम्हाला मिळतील असे सांगितले, प्रभाकरणने त्याच्या बँक खात्यात असलेले १५ हजार रुपये आरोपींना दिले व उर्वरित ४ लाख ८५ हजार रुपये आरोपींना देण्यासाठी त्याने घरातील सोन्याचे दागिने गहाण ठेवले व ते पैसे आरोपी राजू पांडुरंग भोईर, सुरेश मोतीराम भोईर व एका अन्य आरोपीला दिले .

उल्हासनगर -४ येथील व्हीनस टॉकीज जवळ राहणाऱ्या प्रभाकरण याची बहीण व भाचा सुमित यांच्या घरात कागदाच्या चलनी नोटा बनविण्यासाठी आरोपींनी रद्दी पेपरचे गठ्ठे आणि केमिकल आणले कागदी पेपरच्या चलनी नोटा कसे बनवितात याचे प्रात्यक्षिक दाखवतो असे आरोपींनी सांगितल्यानंतर ते बघण्यासाठी प्रभाकरण, त्याचा भाचा सुमित व त्याचा मित्र पप्या जाधव उपस्थित होते, आरोपींनी कागदांच्या तुकड्यांवर केमिकल टाकले व एका प्लास्टिकच्या थैलीते ते गुंडाळून ठेवले, यामुळे उपस्थित असलेल्या प्रभाकरण व इतरांच्या डोळ्यात जळजळ होऊ लागली, थोड्या वेळानंतर आरोपींनी कागदी तुकड्यांच्या नोटा बनण्याची प्रक्रिया सुरू असून उद्यापर्यंत १० लाख रुपये बनतील तोपर्यंत प्लास्टिकची थैली उघडू नका असे सांगितले उद्या आम्ही येऊन तयार झालेल्या नोटा तुम्हाला देऊ असे प्रभाकरणला सांगितले व ते निघून गेले.

यानंतर आरोपी राजू पांडुरंग भोईर, सुरेश मोतीराम भोईर व एका अन्य आरोपी फरार झाले, त्यांनी त्यांचे मोबाईल नंबर सुध्दा बंद करून ठेऊन फसवणूक केली. या प्रकरणी प्रभाकरण यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी आरोपींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे . या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक कापरे हे करीत आहेत.