मुंबई : मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीने आज १७ डिसें. रोजी काढण्यात आलेल्या महामोर्चावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी निशाणा साधला. विक्रमी मोर्चा होईल, असे वातावरण तयार करण्यात आले. मात्र, असे काहीही झाले नाही. उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप मंत्री सामंत यांनी यावेळी केला. पत्रकार परिषद घेत त्यांनी मविआवर निशाणा साधला.
सामंत म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचे कारस्थान रचण्यात आले आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून देवदेवतांचा अपमान केला जात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळावरून वादग्रस्त विधान केली जात आहे. तर दुसरीकडे सरकारला बदनाम केले जात आहे; परंतु याकडे आम्ही लक्ष देणार नाही, कारण आम्ही महाराष्ट्राला विकासाचे देणे लागतो. " असे म्हणत त्यांनी भुमिका स्पष्ट केली.
रत्नागिरी सभेचा आढावा घेताना सामंत पुढे म्हणाले, "काल जी सभा झाली माझ्या मतदारसंघामध्ये आपण देखील पाहिली असेल. रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासातली सगळ्यात मोठी सभा काल रत्नागिरीमध्ये झाली. आता ती मोठी होती की छोटी होती हे मला सांगायचं नाही. परंतु ती जिवंत सभा होती. आणि त्या जिवंत सभेच्या समोर जी कोकणाची इतके वर्षाची मागणी होती की कोकणाच्या विकासासाठी काहीतरी झालं पाहिजे. ते धाडस दाखवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कोकणाच्या विकासासाठी आणि कोकणाचा विकासात्मक अनुशेष दूर करण्यासाठी कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण हे MMRDAच्या धरतीवर करण्याचा निर्णय घेतला." अशी माहती सामंत यांनी दिली.