मौत का सौदागर ते हत्येची तयारी

    16-Dec-2022   
Total Views |
Raja Pateriya


‘पंतप्रधान मोदींच्या हत्येला तयार व्हा’ असे आवाहन करण्यात पटेरियानामक आपल्या नेत्याने काही चूक केली आहे, असे एकाही वरिष्ठ काँग्रेस नेत्याला वाटत नाही ही वस्तुस्थिती भीषण आहे. अर्थात, काँग्रेसकडून ती अपेक्षा बाळगणेसुद्धा योग्य होणार नाही, कारण त्यांची भूमिका त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केली आहे.



देशाच्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी मोदींची हत्या करायला तयार व्हा!’ असे जाहीर आवाहन मध्य प्रदेशातील एक काँग्रेस नेते राजा पटेरिया यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे. राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा मध्य प्रदेशचा टप्पा आटोपून बाहेर पडल्या पडल्या हे भाषण समोर आले आहे. हे पटेरिया मध्य प्रदेशमध्ये दिग्विजय सिंग मुख्यमंत्री असताना काँग्रेस मंत्रिमंडळात मंत्री होते, आजही ते दिग्विजय सिंग यांचे निकटवर्ती मानले जातात. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचे जाहीर आवाहन करणारे हे पतेरीया कोणी तरी लहानसहान कार्यकर्ता नाहीत, तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा मध्य प्रदेशमध्ये असतानाच पटेरिया यांनी केलेल्या या आवाहनानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते.

पंतप्रधानांची हत्या करण्यासाठी केलेल्या या जाहीर आवाहनाबद्दल मध्य प्रदेश सरकारने पतेरीया यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. एवढे झाल्यानंतर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी पटेरियांवर कारणे दाखवा नोटीस बजावली; तसेच मोदी यांना दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थनाही केली आहे. पण ही निव्वळ सारवासारव आहे. ‘मोदींचा पराभव करण्यासाठी तयार व्हा असे मला म्हणायचे होते, माझ्या बोलण्याला चुकीचे वळण दिले जात आहे,’ असा दावा पटेरिया आता करत आहेत. पण त्यांच्या भाषणाचा व्हिडिओच उपलब्ध असल्यामुळे त्यांनी दिलेले स्पष्टीकरण उपयोगाचे ठरलेले नाही. काँग्रेस नेते पतेरीया आता काही खुलासा करत असले तरी त्यात काही तथ्य नाही, हे लोकांच्या लक्षात आले आहे. पण या सगळ्या घटनेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे मौन एकतर आश्चर्यकारक म्हणण्याजोगे आहे नाहीतर त्याचा जो अर्थ निघतो तो अत्यंत भयावह आहे.



राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा मध्य प्रदेशमध्ये असताना हे भाषण केले गेले. हा योगायोग असावा असे आपण म्हणू. पण त्या भाषणाचा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर राहुल गांधींसह कोणत्याही वरिष्ठ काँग्रेस नेत्याने त्याचा इन्कार किंवा निषेध केलेला नाही. वास्तविक एवढे भयंकर आवाहन जाहीरपणे करणार्‍या व्यक्तीची त्या पक्षातून तत्काळ हकालपट्टी केली गेली पाहिजे होती. पण, तसे काहीही न करता, भरपूर गदारोळ झाल्यानंतर, काहीतरी थातूरमातुर कारवाई करत आहोत असे दाखवत काँग्रेस मूग गिळून गप्प बसली आहे. याचा सरळ सरळ अर्थ हा आहे की सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व अन्य काँग्रेस नेत्यांना पतेरीयांची भूमिका मान्य आहे किंवा या मौनाचा दुसरा अर्थ असाही होतो की काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिकाच पतेरीया बोलत होते. ''To test the waters' अशी एक म्हण आहे. एखाद्या विषयाबद्दल काय प्रतिक्रिया येते हे चाचपून बघायला एखाद्या दुय्यम व्यक्तीला बोलायला सांगितले जाते. तसा प्रकार तर इथे चालू नाही ना? तसे जर असेल तर निवडणुकांमधील पराभवांमुळे, सत्ता गमावल्यामुळे व पुन्हा सत्तेच्या जवळपाससुद्धा जाण्याची लक्षणे दिसत नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेली काँग्रेस कोणत्या थराला जाऊन पोहोचली आहे हे यातून दिसून येते.



सोनिया गांधींनी काँग्रेसचा ताबा घेतल्यापासून हा बदल झालेला आहे आणि आता राहुल गांधी त्यात भर घालत आहेत असे म्हणण्याची वेळ दुर्दैवाने आलेली आहे. वेगवेगळे राजकीय विचार असणे, विचारांचे मतभेद असणे हे लोकशाहीचे पहिले तत्त्व आहे. मतभेद असले तरीही सर्वांनी एकत्र राहून, एकमेकांचा सन्मान राखून, किमान सहमतीच्या आधाराने काम करणे ही लोकशाहीची कल्पना आहे. देशाच्या संविधानाने दिलेल्या मार्गाने आपले विचार जनतेसमोर मांडून, जनतेकडून कौल मिळवणे ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी आहे. त्याच मार्गाने जनतेसमोर आपली भूमिका मांडत, सात दशके संघर्ष करत आम्ही इथे आलो आहोत. आम्ही मांडलेले विचार, मुद्दे जनतेला पटले म्हणून जनतेने आम्हाला निवडून दिलेले आहे. आजचे पंतप्रधान हे जनतेने निवडून दिलेले नेतृत्व आहे. २००० पूर्वी आम्ही सतत हरतच होतो. पण त्या काळात जनतेने दिलेला कौल नम्रपणे स्वीकारून आम्ही पुन्हा काम सुरू करत होतो. विजयी झालेल्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या, पंतप्रधानांच्या हत्येचे आवाहन तर आम्ही कधीच केले नाही. आमचा पराभव झाला म्हणजे संविधानाचा अंत झाला असेही आम्ही कधी मानले नाही, म्हटलेही नाही. पण, सोनिया गांधी आणि त्यांची अपत्ये असे मानत नाहीत.




जनतेने त्यांना नाकारले आहे हेच त्यांना मान्य नाही. जनतेने आपल्याला नाकारले म्हणजे जनतेने संविधान नाकारले असा अजब समज त्यांनी व त्यांच्या अनुयायांनी करून घेतला आहे. जनतेकडे जाऊन, जनतेसमोर आपली भूमिका मांडून जनतेचा कौल मागणे हे त्यांना कमीपणाचे वाटते. सिंहासनावर बसणे हा अधिकार आपल्याला विवाहाने, जन्माने मिळालेला आहे, त्याचा जनतेशी काही संबंध नाही अशी त्यांची समजूत आहे. त्या समजुतीपोटी अशी भावना तयार होते आणि मग ती पतेरीयासारख्या व्यक्तीच्या तोंडून वदवली जाते. पतेरीयांचे विधान समोर आल्याबरोबर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करणे यासाठी आवश्यक होते. अर्थात काही न बोलणे हीसुद्धा भूमिका स्पष्ट करण्याची एक पद्धत आहे. जेव्हा केले गेलेले विधान अपेक्षेनुसारच केलेले असते तेव्हा काही न बोलता गप्प राहणे म्हणजे त्या विधानाला असलेली मान्यता स्पष्ट करणे असते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया व राहुल गांधी यांनी पटेरियांबाबत बाळगलेले मौन त्या धर्तीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल काँग्रेस जी भाषा सतत वापरत आली आहे त्याचे अंतिम टोक आता काँग्रेसकडून गाठले गेले आहे.



काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी व राहुल गांधींनी सातत्याने मोदींबद्दल असभ्य व अश्लाघ्य भाषेचा वापर केलेला आहे. सार्वजनिक जीवनात बोलताना पाळावयाचे सभ्यतेचे कोणतेही संकेत गांधी माय-लेकांना मान्य नाहीत. ‘मौत का सौदागर’, ‘खून का दलाल’, ‘खून की खेती करनेवाला’, ‘नीच’ अशी शेलकी विशेषणे त्यांनी मोदींबद्दल बोलताना नेहमी वापरली आहेत. 1984 साली शिखांची राक्षसी कत्तल होत असताना आपण शांतपणे बघत बसलो होतो हे सोयीस्करपणे विसरून सोनिया गांधी मोदीजींना ‘खून की खेती करनेवाला’ म्हणतात, हे लक्षात ठेवले पाहिजे. राहुल गांधी मोदींना ‘चोर’ म्हणतात. या राहुल गांधींवर ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात कोट्यवधी रुपयांची हेराफेरी केल्याचा आरोप आहे आणि ते जामिनावर बाहेर फिरत आहेत, ही वस्तुस्थिती मात्र ते विसरतात. ‘चोरांची नावे मोदी का असतात?’ असा सवाल शहाजोगपणे विचारताना त्याच चोर नीरव मोदीकडून आपण राजीव गांधी ट्रस्टला कोट्यवधी रुपये देणगी म्हणून घेतले आहेत हेही राहुल गांधी विसरतात. काँग्रेसचे नवे अध्यक्ष खर्गे मोदींना ‘रावण’ म्हणतात. मणिशंकर अय्यर यांनी तर मोदींचा पराभव करण्यासाठी पाकिस्तानने मदत करावी, असे आवाहन पाकिस्तानात जाऊन केले होते. पतेरीया यांनी या सर्व भाषेचा तार्किक शेवट गाठला आहे.



‘पंतप्रधान मोदींच्या हत्येला तयार व्हा’ असे आवाहन करण्यात पटेरियानामक आपल्या नेत्याने काही चूक केली आहे, असे एकाही वरिष्ठ काँग्रेस नेत्याला वाटत नाही ही वस्तुस्थिती भीषण आहे. अर्थात, काँग्रेसकडून ती अपेक्षा बाळगणेसुद्धा योग्य होणार नाही, कारण त्यांची भूमिका त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केली आहे. पण, देशातल्या प्रसिद्धी माध्यमांना, कोणते शब्द राजकीय दृष्टीने योग्य आहेत हे ठरवण्याचा मक्ता ज्यांनी स्वत:च स्वत:कडे घेतला आहे त्या वर्गालासुद्धा काँग्रेसी पठडीत तयार झालेला नेता पतेरीया यांनी पंतप्रधानाच्या हत्येचे केलेले आवाहन गैर, आक्षेपार्ह वाटलेले नाही हे लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही वृत्तपत्राच्या ‘निर्भिड’ संपादकाने त्यावर ‘सडेतोड भाष्य’ केले नाही, कोणत्याही वृत्तवाहिनीने त्यावर ‘खणखणीत चर्चा’ घडवल्या नाहीत. ही भाषा लोकशाहीचा गळा घोटणारी आहे असे ‘ठणकावून सांगायला’ कोणताही ‘पुरस्कार मंडित’ लेखक, विचारवंत पुढे आलेला नाही. ट्विटरवरदेखील पूर्ण शांतता आहे. हीच परिस्थिती उलटी असती तर? सोनिया गांधी, राहुल गांधींबद्दल कोणी असे आवाहन केले असते तर? तर आतापर्यंत या सर्वांनी आकाश पाताळ एक केले असते, अभूतपूर्व थयथयाट केला असता. पण, ‘आवाहन नरेंद्र मोदींच्या हत्येचे झाले आहे, ते योग्यच आहे,’ असे मानणारे हे सर्वजण असल्यामुळे सगळे गप्प आहेत.



या सगळ्या गोष्टींचा अर्थ स्पष्ट आहे. ‘न्यूयॉर्क टाईम्स’पासून भारताच्या एखाद्या कोपर्‍यात बसलेल्या ‘महान विचारवंता’पर्यंत पसरलेली अदृश्य पण अत्यंत संघटित यंत्रणा इकोसिस्टम भारताबद्दल कशा पद्धतीने विचार करते आहे ते या वक्तव्यातून उघड झाले आहे. ‘भारतामध्ये जिहादी आणि नक्षली, दहशतवादी कारवाया करणार्‍यांना मोकळे रान देणारी काँग्रेसच सत्तेत राहिली पाहिजे, भारतीय जनतेने जर काँग्रेसला बाजूला सारून दुसर्‍या कोणाला सत्तेवर बसवले आणि ते सत्ताधारी आमच्या इराद्यांच्या आड आले, तर अशा सत्ताधार्‍यांना आम्ही संपवल्याशिवाय राहाणार नाही,’ ही प्रच्छन्न धमकी या मार्गाने दिली गेली आहे. काँग्रेस नेते राजा पतेरीया यांच्या बोलण्यातून मोदींच्या जीविताला असलेला धोका जसा उघड झाला आहे तसा किंवा त्यापेक्षा अधिक धोका भारतातल्या लोकशाहीला आहे हे स्पष्ट झाले आहे.सर्व जागरूक व राष्ट्रभक्त नागरिकांनी या गोष्टीची दखल घेणे आवश्यक आहे.





(लेखक महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष आहेत)

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

माधव भंडारी

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते