‘इन्फ्रारेड रेडिएशन्स’ची ‘लायटेक्स’ ऊर्जा

    15-Dec-2022   
Total Views |
Litex Electrical Private Limited


हल्ली सगळीकडेच अपारंपरिक ऊर्जास्रोतांबद्दल जागरुकता निर्माण झाली आहे. तसेच यांसारख्या ऊर्जास्रोतांचा वापर वाढला पाहिजे, म्हणून व्यापक पातळीवर जनजागृतीचाही वेग वाढलेला दिसतो. पण, या ऊर्जांस्रोतांचा वापर करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी साधने उपलब्ध आहेत का? आपल्याला त्यांचा वापर वाढवता येईल, असे काही होऊ शकते का? याचा विचार कधी केला आहे का? याच गोष्टीवरून बरेच संशोधन सध्या भारतातच नव्हे, तर जगभरात सुरु आहे. तसेच भारतातही या क्षेत्रात संशोधन करून नवनवीन उत्पादने बाजारात आणली जात आहेत. अशाच प्रकारच्या एका उत्पादनाचे संशोधन करुन त्याचा व्यवसाय सुरु करणारे ‘लायटेक्स इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड’चे तपन करकरे यांच्या उद्योजकीय प्रवासाविषयी...


भारतावरील वीजटंचाई, वीजकपातीचे ग्रहण अद्याप पूर्णत: सुटलेले नाहीच. गावखेड्यांमध्ये वीज हळूहळू पोहोतच असली तरी अजून फार लांबचा पल्ला याबाबत आपल्याला गाठायचा आहे, हे वास्तव. भारताच्या ग्रामीण भागांमध्ये तर अजूनही साधे पाणी तापवण्यासाठी परंपरागत पद्धतीनेच म्हणजे जळणासाठी लाकडांचा वापर करून पाणी तापवले जाते. पण, यामुळे साहजिकच वायुप्रदूषण वाढते आणि आरोग्यालाही हा धूर तितकाच हानीकारक ठरतो. त्यामुळे यांसारख्या पारंपरिक ऊर्जास्रोतांना सक्षम पर्याय शोधणे आज गरजेचे आहे. आणि हे पर्याय असे हवे की, अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते मोठमोठ्या उद्योगांपर्यंत सगळ्यांनाच त्याचा वापर करता येणे शक्य होईल.

तपन यांचा हा व्यवसाय खरेतर त्यांच्या काकांचा आहे. तपन यांनीही काकांच्या व्यवसायात हातभार लावण्यास सुरुवात केली. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन उत्पादने घेण्यास सुरुवात केली. या नव्या ‘इन्फ्रारेड रेडिएशन्स’च्या क्षेत्राशी संबंधीतच त्यांचे काम चालते. सध्या ‘लायटेक्स’ तीन पद्धतींच्या उत्पादनांवर काम करते. पहिले उत्पादन हे मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आहे. यात रंगमंच, स्टुडिओज या सगळ्यांसाठी लागणारे ‘लॅम्प्स’ तयार केले जातात. यातून त्यांच्यासाठी ‘इन्फ्रारेड रेडिएशन्स’चाच वापर करून त्यांना हवे तसे दिवे किंवा त्यांना लागतील, असे दिवे तयार करून दिले जातात. दुसरे म्हणजे, उद्योगांसाठी लागणारे दिवे तयार करून दिले जातात. उद्योगांना लागणारे लाईट्स, त्यांच्या गरजांनुरुप, मागणीनुसार तयार करून दिले जातात. तपन यांचे सर्वात महत्त्वाचे ‘प्रॉडक्ट’ म्हणजे ’कॅम्फर्ट हीटर.’ या ’हीटर’मुळे आपल्याला पाणी तापवणे किंवा जिथे जिथे आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने ऊर्जा तयार केली जात होती, त्या ठिकाणी या ‘हीटर’चा वापर केला जातो. याचे वैशिष्ट्य म्हणजे, हा ‘हीटर’ आजूबाजूच्या वातावरणात काहीच फरक करत नाही. बाजूला बसलेल्या माणसाला त्या उष्णतेचा काहीच त्रास होत नाही किंवा त्यामुळे निसर्गालाही अपाय होत नाही, असे हे अभिनव तंत्रज्ञान आहे.

आपल्या भारतात जवळपास वर्षभर उष्णताच असते. गोठवणारी थंडी वगैरे आपल्याकडे फारच कमी काळ आणि कमी प्रदेशांत आढळते. त्यामुळे अशाच प्रदेशांसाठी हा ‘हीटर’ तयार करण्यात आला आहे आणि त्यांच्यासाठी खरोखरीच तो खूप उपयुक्त आहे. काही प्रदेश असे आहेत की, जिथे तापमान शून्य अंशांच्या खाली घसरते, तिथे हा ’हीटर’ नक्कीच फायदेशीर ठरतो. त्याहीपुढे जाऊन आपल्याकडे आपले सैन्यदल त्या गोठवणार्‍या थंडीत काम करत असते. त्यांच्या सर्व सैनिकी कारवाया या त्याच प्रदेशात चालू असतात. त्यांना त्या अवघड कामांसाठी सतत उष्णतेची गरज असते. त्यासाठी हा ‘रेडिएशन्स’वरच्या ‘हीटर’चा चांगला उपयोग करून घेता येऊ शकतो. याच बरोबरीने या उपकरणाने आपल्याकडील सर्व प्रदूषणकारी सवयी पूर्ण बदलून टाकता येतील, असे यातून साध्य करायचे आहे, असे तपन सांगतात.

 
औद्योगिक वापराबद्दल बोलायचे झाल्यास, आतापर्यंत आपल्याकडे मोठे-मोठे बॉयलर्स, तसेच मोठ्या मोठ्या रासायनिक खतांच्या कंपन्यांमध्ये लागणार्‍या ‘प्रोसेसेस’ या सगळ्यांसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे. या सर्वांसाठी सध्या वापरले जाणारे इंधन, त्यातून तयार होणारी उष्णता या सर्वच गोष्टी आपल्याचसाठी नव्हे, तर एकूणच पर्यावरणासाठीही तितक्याच हानिकारकच आहेत. वर्षानुवर्षे या सर्व प्रक्रियांमधून प्रचंड प्रदूषण नोंदवण्यात आले. त्यामुळे उद्भवणारे आजार हे देखील आता आपल्या परिचयाचे आहेत. पण, ‘इन्फ्रारेड’ तंत्रज्ञानाने आपण या सर्व गोष्टींमधून सुटका करून घेऊ शकतो. कारण, हे तंत्रज्ञान खूपच कमी वेळात या सर्व गोष्टी तयार करु शकते. त्यामुळे या तंत्रज्ञानाची आपल्याला निश्चितच गरज आहे. हे लक्षात घेऊन आपल्याला या तंत्रज्ञानाचा वापर करून काम करणारी उपकरणे तयार करण्यासाठी संशोधन करणे गरजेचे आहे.
 उदाहरण द्यायचे झाल्यास, आता साधा ‘टेक्सटाईल’ उद्योग घ्या. कपडे तयार झाल्यावर ते बाजारात आणण्यासाठी त्यांच्यावर प्रक्रिया कराव्या लागतात.



 या प्रक्रियांमधून त्या कपड्यांना ’ग्लेझ’ आणली जाते. ती ‘ग्लेझ’ आणण्यासाठी या ’रेडिएशन्स’ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या तंत्रज्ञानाचा वापर करून त्या कपड्यांना चकाकी आणली जाते. त्यामुळे या तंत्रज्ञानाविषयी लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.या क्षेत्राच्या भविष्याबद्दल बोलायचे झाल्यास, भविष्यात सर्वच ठिकाणी या तंत्रज्ञानाचा वापर सुरु होईल. या ’इन्फ्रारेड’ तंत्रज्ञानाच्या वापराने जवळपास प्रत्येक क्षेत्रात आपण काम करू शकतो. वैद्यकीय क्षेत्र, रासायनिक खतांचे क्षेत्र, सूक्ष्म संशोधन, निरनिराळ्या उपचार पद्धती, तसेच ‘मॅन्युफॅक्चरिंग’ क्षेत्र असे जवळपास सर्वच क्षेत्रांत या ’इन्फ्रारेड’ तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो. या वापराने आपल्याकडची कामे अत्यंत कमी वेळात आणि प्रदूषणविरहित पद्धतीने पूर्ण करता येतील.

 त्यामुळे फक्त भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात या पद्धतींचा वापर होऊ शकतो. तसेच ‘लायटेक्स’चे भविष्यातील लक्ष्यही याच पद्धतीचे काम करण्याचे आहे. फक्त भारतीय बाजारपेठच नव्हे, तर जगभरात आपल्या व्यवसायाचा विस्तार करणे, हादेखील त्यामागचा उद्देश. फक्त यासाठी आपल्याकडे याबद्दल जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. चांगल्या पद्धतीने या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या संपूर्ण उद्योगक्षेत्राला एक पर्यायी ऊर्जास्रोत म्हणून उपलब्ध होईल, असे या क्षेत्राच्या भविष्याबद्दल सांगता येईल.या क्षेत्रातच नव्हे, तर एकूणच अशा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ज्या नवीन उद्योजकांना उद्योग सुरु करायचा असेल, त्यांनी लक्षात ठेवावे की, ज्या पद्धतीने रोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे, त्याबद्दल आपण सतत अपडेट राहणे गरजेचे आहे.

त्याबद्दल सतत संशोधन करून आपल्या उत्पादनात नावीन्य आणणे, हे आपले उद्योजक म्हणून मुख्य्य कर्तव्य आहे. त्यामुळे जगाशी सातत्याने संपर्क ठेवा आणि त्यातून नवीन नवीन गोष्टी शिकत राहा, असेही तपन सांगतात. काही वेळा आपल्या काही गोष्टी चुकतीलही, पण या चुकांमधूनच आपण शिकत शिकत पुढे जायला हवे आणि आपल्या उत्पादनावर, संकल्पनेवर विश्वास ठेवून पुढे जात राहायला हवे. तसे केल्यास आपला मार्ग नक्कीच सापडेल आणि त्याच मार्गाने आपली प्रगती निश्चित आहे, हे लक्षात ठेवून काम करा, हाच नवीन उद्योजकांनी लक्षात ठेवायचा प्रमुख मंत्र आहे, असे तपन अधोरेखित करतात.एका नव्या क्षेत्रात आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर, नवीन संकल्पना मांडून, एखादा उद्योग उभा करणे, हे किती जिकिरीचे काम आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. पण, हेच आव्हान पेलून त्यात उद्योग उभा करणार्‍या तपन करकरे यांचे काम नक्कीच उल्लेखनीय आहे. त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा...




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हर्षद वैद्य

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये उपसंपादक (वेब आणि प्रिंट) म्हणून कार्यरत. रुईया महाविद्यालयातून गणित या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. आर्थिक क्षेत्राशी संबंधित वृत्तांकन आणि लेखन. भारतीय संगीत, इतिहास या विषयांमध्ये विशेष रस. महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य. अर्थशास्त्र विषयात महाविद्यालयात संशोधन केले आहे. शैक्षणिक, सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्राचाही अनुभव.