नवी दिल्ली : चिनी सैन्याने वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) तवांग क्षेत्रात यथास्थिती बदलण्याचा प्रयत्न ९ डिसेंबेर रोजी केला होता. या अतिक्रमणास भारतीय सैन्याने सडेतोड प्रत्युत्तर दिले असून चिनी सैनिकांना त्यांच्या हद्दीत पिटाळून लावण्यास यश आले आहे, असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये केले आहे.
अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये एलएसीवर झालेल्या चकमकीचा मुद्दा आज संसदेत गाजला आणि विरोधकांनी चर्चेची मागणी करत गदारोळ केला. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चकमकीबाबत लोकसभा आणि राज्यसभेत निवेदन करून चीनच्या घुसखोरीला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिल्याचे सांगितले.
चिनी सैन्याच्या एका तुकडीने ९ डिसेंबर २०२२ रोजी तवांग सेक्टरमध्ये यांगत्से क्षेत्रात एलएसीवर अतिक्रमण केले आणि यथास्थिती एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न केला. चिनी सैन्याचा या प्रयत्नाचा भारतीय सैनिकांनी अतिशय शौर्याने सामना केला. यावेळी दोन्ही सैनिकांमध्ये झटापटदेखील झाली. मात्र, भारतीय सैन्याने अतिशय समर्थपणे चिनी सैन्यास आपल्या क्षेत्रात अतिक्रमण करण्यापासून रोखले आणि त्यांना त्यांच्या क्षेत्रातील चौकीवर पिटाळून लावले आहे. या घटनेमध्ये दोन्ही बाजुंचे सैनिक काही प्रमाणात जखमी झाले आहेत. मात्र, या झटापटीमध्ये एकही भारतीय सैनिक हुतात्म अथवा गंभीर जखमी झालेला नसल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या निवेदनामध्ये सांगितले.
भारतीय सैन्याधिकाऱ्यांनी यामध्ये वेळीच हस्तक्षेप केल्याने चिनी सैनिक आपल्या क्षेत्रात परत गेल्याचे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, या घटनेनंतर क्षेत्रातील स्थानिक सैन्याधिकाऱ्यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी चिनी सैन्याधिकाऱ्यांसोबत प्रस्थापित व्यवस्थेनुसार फ्लॅग मिटिंग घेऊन चर्चा केली. चर्चेमध्ये चीनला अशाप्रकारची कारवाई न करण्याची आणि सीमेवर शांतता राखण्याची तंबी देण्यात आली असल्याचेही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नमूद केले आहे.
ते पुढे म्हणाले की, मी संसदेत आश्वस्त करू इच्छितो की आमचे सैन्य आमच्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि भारतीय सैन्य त्याविरुद्ध कोणतेही प्रयत्न रोखण्यासाठी तयार आहे. आपल्या सैन्याच्या शौर्याला आणि धैर्याला संसद एकमताने पाठिंबा देईन आणि भारतीय सैन्याची क्षमता, शौर्य आणि वचनबद्धतेचे कौतुक करेल, असाही विश्वास संरक्षण मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संरक्षण मंत्र्यांचे निवेदेन होण्यापूर्वी विरोधी पक्षांनी गदारोळ केला. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी चीनने भारताच्या सीमेक घुसखोरी केल्याचा आरोप केला. त्याचप्रमाणे २०२० सालच्या गलवान घटनेचाही त्यांनी उल्लेख केला. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनीदेखील केंद्र सरकारवरल टिका केली.
चिनची हवाई घुसखोरी रोखण्यात यश
तवांग क्षेत्रात अतिक्रमण करण्यापूर्वी चिनने भारतीय हवाई हद्दीतही घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यास रोखण्यात भारतीय हवाईदलास यश आले होते. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनने भारतीय हद्दीमध्ये ड्रोनद्वारे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा सामना करण्यासाछी भारतीय हवाईदलाने तत्काळ सुखोई एमके ३० लढाऊ विमाने तैनात केली आहेत. त्याचप्रमाणे हवाईदलाच्या पश्चिम बंगालमधील हाशिमारा तळावर सुखोई लढाऊ विमानेदेखील सज्ज ठेवण्यात आली आहेत.