आमीर खानने घातला सत्यनारायण, शाहरुख खान वैष्णो देवीला? नेमकं चाललंयं काय?

    12-Dec-2022
Total Views |

MahaMTB
 
 
 
 
गेल्या काही काळापासून चित्रपट सृष्टीला हिंदुत्वाचे उमाळे येत आहेत. देवदर्शनांच्या निमित्ताने आपलं हिंदुप्रेम हे कलाकार जाहीरही करत आहेत. पुरोगामी लोक समता राखण्याच्या नावाखाली जो हिंदू द्वेष करत होते ते मात्र या गदारोळात कुठे पाहायला मिळत नाहीत. हिंदूंना त्यांचे महत्व जाणवू लागले आहे हेच यातून अधोरेखित होते.
 
 
कोरोना महामारीनंतर जनजीवन रुळावर येऊ लागलं. तसे चित्रपट पुन्हा प्रदर्शित होऊ लागले. परंतु तुलनेत प्रतिसाद मात्र अत्यल्प मिळतोय. त्यामानाने रंगभूमीकडे प्रेक्षक मोठ्या संख्येने आकर्षित होताना दिसतात. ओटीटी माध्यमेही तेजीत सुरु आहेत. प्रेक्षकांना चित्रपटाचेच एवढे वावडे काय?
 
 
एक ठळक उल्लेख मला करावासा वाटतो तो म्हणजे, ओटीटी माध्यमांवर येणार नवा कन्टेन्ट काही वेगळी कथा घेऊन येतो. नाटकांचेही तेच. वैविध्यपूर्ण विषय घेऊन उत्कट मांडणी हे आपल्या रंगभूमीचे वैशिष्ट्य. नावीन्य गमावलेले एकाच धाटणीचे चित्रपट जेव्हा पुन्हा पुन्हा तयार होतात तेव्हा ते सणकून आपटणारच. ग्राहक सूज्ञ आहे. त्याला मूर्ख बनवणे महागात पडू शकते.
 
 
आपली चित्रपट सृष्टी कलाकारांना केंद्रस्थानी ठेऊन नावाला महत्व देणारी आहे. तिथे दिग्दर्शकाचे मोलाचे मार्गदर्शन, लेखकाची मांडणी आणि या भूमीतल्या वैविध्य जपणाऱ्या संस्कृतीच्या कथा यांना बाजूला सारून मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या कलाकाराचे मत मोठे मानले जाते. मग अशावेळी सिने कलाकार आपल्या प्रेक्षकांच्या भावनांना महत्व देतायेत त्यात नवल काय?
 
 
दोनच दिवसांपूर्वी आमिर खान आपल्या घटस्फोटित पत्नी किरण राव सोबत सत्यनारायणाच्या पूजेवर बसलेला दिसला. लाल सिंग चड्ढा फ्लॉप गेल्यानंतर गायब झालेला अमीर खान सलाम वेंकी या काजोलच्या चित्रपटातून पुन्हा पाहायला मिळतोय. सत्यनारायण म्हणजे आपल्या घरातील वर्षातून एकदा हमखास होणारी पूजा. पण मुस्लिम माणसाने घटस्फोटित पत्नीसोबतच सत्यनारायणाचा घाट घालणं हास्यास्पद नाही तर काय!
 
 
तसेच काहीसे शाहरुख खानचे. आपल्या स्वतःच्या जीवावर चित्रपट सृष्टीत पदार्पण करून आपलं स्थान निर्माण करणं ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. परंतु चित्रपटातील कथानकाचा विचार केला, निव्वळ भूमिकेचा विचार केल्यास शाहरुखचा एककल्ली अभिनय ठळक होतो. काही महिन्यापूर्वी शाहरुखचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकला, त्यानंतर प्रथमच शाहरुख चित्रपटात काम करताना आपल्याला दिसतो आहे. त्यासाठी कटराला वैष्णो देवीच्या दर्शनाला जाऊन आल्याचे वृत्त आज सकाळीच आले.
 
 
जन्माने हिंदू असणारा रणबीर कपूर, चित्रपट हिट जाऊ लागले तसे पुरोगामी विचारसरणीचे पुरस्कर्ते झाले. आम्ही बीफ (गोमांस) खातो असे अभिमानाने सांगू लागले. आता अर्थात गोमांस खाल्ले म्हणजे माणूस हिंदू नाही असे म्हणणे योग्य नाही. परंतु ब्रम्हास्त्र चित्रपटाचे प्रमोशन करताना काशीच्या मंदिरात दर्शनाला जाऊन आपल्या हिंदुत्ववादी विचारांचा डंका का वाजवावा?
 
 
नुकतंच नागराज मंजुळेंशी बोलताना अनुराग कश्यप म्हणे कांतारा, पुष्पा, सैराट सारखे चित्रपट आले आणि चित्रपट सृष्टी संपली. ह्यात काहीप्रमाणात तथ्य आहे. सैराट चित्रपटातून गावच्या संस्कृतीचे, जातिव्यवस्थेचे चित्रण झाले आणि हा चित्रपट चालला, तेव्हापासून लोकांनी आपले डोके वापरणे सोडून दिले. सर्वच चित्रपट सैराट छाप होऊ लागले. कांतारा जेव्हा आपली एक वेगळी कथा घेऊन येतो तेव्हा तो चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करणं स्वाभाविक आहे. आपली भारतीय संस्कृती इतक्या वैविध्यपूर्ण कथांनी समृद्ध आहे की, रोज नवी कथा सांगायची म्हटली तरी कमी पडायची नाही. त्यामुळे कांतारा वगैरे काहीतरी नवीन घेऊन येणारे चित्रपट निःसंशय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील.
 
 
लोकशाही काय किंवा अगदी चित्रपट सृष्टी नेहमीच जनमतावर आधारलेली आहे. आपलं उत्पादन चालवण्यासाठी या जनमताचा आधार लागतोच. आणि याच साठी हिंदूंच्या भावना जपण्याचा हा प्रयत्न! वेगळे काय सांगावे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.