हिंसेच्या मानसिक चक्रव्यूहात...

    12-Dec-2022
Total Views |
Psychics of violence


पीडितांना त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकांपासून वेगळे होण्याची भीती वाटू शकते, म्हणून ते त्यांच्या जोडीदाराकडून होणारे गैरवर्तन शांतपणे सहन करतात. काही स्त्रिया विकृत अत्याचार सहन करूनही गप्प बसतात. कारण, त्यांना सत्य सांगायला लाज वाटते. त्यांना त्यांच्या जोडीदाराच्या अत्याचारी आणि हिंसक कृतींसाठी लोक त्यांनाच 
दोष देण्याची भीती वाटते.


हिंसक घटनांमध्ये हिंसेचा बळी ठरणार्‍यांना हिंसेचे चक्र आणि बदलाची आशा दिसून येते. बहुतेक हिंसक जोडीदार हिंसाचाराचे एक चक्र आपल्या वर्तनातून प्रदर्शित करतात. सर्वसामान्यपणे हिंसेच्या चक्राचे तीन टप्पे असतात : पहिला हनिमूनचा टप्पा, जेव्हा त्या दोघांना नात्यातील प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते व ‘रोमॅण्टिक’ भासते. त्यानंतर हिंसक जोडीदार त्या जोडीदाराला घाबरवत प्रचंड तणाव निर्माण करतो आणि शेवटी हिंसक घटना वेगाने केल्या जातात. अनेक वेळा हिंसक जोडीदार हिंसाचार केल्यानंतर पश्चात्ताप करतात आणि ते यापुढे नक्की बदलतील, असे वचनही देतात. येथे पुन्हा ‘हनिमून’च्या टप्प्याची सुरुवात होते आणि हे चक्र पूर्ववत सुरूच राहते. या चक्रामुळे स्त्रीला अशा हिंसक जोडीदारापासून मुक्त होणे कठीण होते. कारण, तिला आस असते की, तो आता नक्की बदलेल.

 हिंसेचा बळी ठरलेल्या व्यक्तीकडे स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत नसू शकतात किंवा त्यांच्या आर्थिक व्यवहारावर बँक खात्यांमध्ये त्यांच्या विकृत जोडीदाराने पूर्ण नियंत्रण ठेवलेले असते. त्यामुळे त्यांच्याकडे आर्थिक स्वातंत्र्य नसते. अशा हिंसक नातेसंबंधांचे रसायनशास्त्र अशा प्रकारे आहे, जिथे हिंसक गुन्हेगार सर्व धोरणात्मक रणनीती वापरून पीडित जोडीदाराला पूर्णपणे नियंत्रित करतो आणि तिला कुठूनही कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही किंवा कोणाकडूनही मदत पोहोचणार नाही, याचीही दखल घेतो. अत्याचार करणार्‍याने हे व्यवस्थित शोधून काढलेले असते की, पीडित व्यक्ती कशामुळे चारही बाजूने असुरक्षित होईल आणि तिला घाबरविता येईल. या दोन्ही गोष्टी तो त्याच्या फायद्यासाठी वापरतो. ते प्रेम असो किंवा मारहाण होण्याची भीती असो, चुकीचे सिद्ध होण्याची भीती असो किंवा सोडून जाण्याची भीती असो, जे काही त्या पीडितेला कमकुवत करते, ते सारे घटक अत्याचारी व्यक्तीला अधिक मजबूत करतात.

दीर्घकाळ भयानक अत्याचाराला बळी पडलेल्या काही पीडिता त्यांची तर्कशुद्ध विचारसरणी खूप मोठ्या प्रमाणात गमावून बसतात. त्यांच्यासाठी तर्कसंगत निर्णयांचे सामान्यतः समजले जाणारे नियम भावनिक क्षोभाने धूसर होतात. हिंसेच्या प्रत्येक घटनेने त्यांचे इतके नैतिक खच्चीकरण होते की, त्या भयानक परिस्थितीतून पळून जाण्याची त्यांची शक्ती अखेरीस निघून जाते. श्रद्धाने तिच्या मित्र-मैत्रिणींना आफताबच्या शिवीगाळ करण्याची आणि भयानक मारहाणीची जाणीव करून दिली होती. पण, बर्‍याच वेळा ती गलितगात्र झाल्याचेही कळवले होते. अर्थात, नंतर नंतर तिचे संवाद कमी होत गेले होते. अत्याचारकर्ते पीडितेच्या भीतीचा त्यांच्या फायद्यासाठी पुरेपूर उपयोग करतात आणि कठपुतळीची जशी दोरी ओढून तिला नाचवले जाते, तसेच या पीडितेच्या प्रत्येक कृतीवरही नियंत्रण ठेवत तिला नाचवले जाते.

Psychics of violence


 हिंसेने आत्माच गोठला गेलेल्या पीडितेला हिंसा किती जास्त आहे किंवा लक्ष्मणरेषा कधी काढायची, हे कळत नाही. वर नमूद केल्याप्रमाणे त्यांच्याकडे वाजवी दृष्टिकोन किंवा तर्कशुद्ध विचार बहुतांशवेळी नसतो. हिंसक अत्याचाराचा सामना केल्यानंतर, पीडिता अनेकदा स्वतःवर संशय घेऊ लागतात. त्यांना असा विश्वास वाटू लागतो की, त्यांनीच काहीतरी चुकीचे केले असावे, ज्यामुळे अत्याचार करणार्‍याला अशा धमकावणार्‍या कृती करण्यास भाग पाडले. अर्थातच, त्यांचे जोडीदार त्यांच्या वाईट वागणुकीसाठी जोडीदारासच दोष देत असतात. चतुर आणि कपटी असलेले हिंसक जोडीदार महिलेला मित्र आणि कुटुंबापासून वेगळे करू शकतात. पीडितांना त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकांपासून वेगळे होण्याची भीती वाटू शकते, म्हणून ते त्यांच्या जोडीदाराकडून होणारे गैरवर्तन शांतपणे सहन करतात.

 काही स्त्रिया विकृत अत्याचार सहन करूनही गप्प बसतात. कारण, त्यांना सत्य सांगायला लाज वाटते. त्यांना त्यांच्या जोडीदाराच्या अत्याचारी आणि हिंसक कृतींसाठी लोक त्यांनाच दोष देण्याची भीती वाटते. त्यांना असे वाटते की, लोकांनी आपल्याला अवास्तव सल्ला देण्यापेक्षा गप्प बसणेच चांगले आणि म्हणून ते त्या अपमानास्पद संबंधात राहतात. काही स्त्रियांना असे वाटते की, त्यांना त्यांच्या जोडीदाराच्या अपमानास्पद वागणुकीचे कारण माहीत आहे. तिचा असा विश्वास आहे की, निष्ठा आणि प्रेम अत्याचार करणार्‍याचे हृदय वितळवू शकते आणि भविष्यात ते एक चांगली व्यक्ती म्हणून सुधारू शकते.एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर एखादी स्त्री अगदी लहानपणापासून पुरुषांनी स्त्रियांवर अत्याचार करताना बघून मोठी झाली असेल, तर तिला ती समाजातील सामान्य वागणूक आहे, असे वाटू शकते. ती कदाचित ती हिंसा खरंच होत आहे, हे नाकारत असेल आणि तिला होणारा शारीरिक किंवा भावनिक आघात हा गैरवर्तन आहे, हे मान्यही करणार नाही.

निरोगी आणि सामान्य नातेसंबंधांचा एक सर्वसाधारण भाग म्हणून ती जोडीदाराचे हिंसक गैरवर्तन गृहीतदेखील धरू शकते.
आशा, भीती, अनिश्चितता आणि आणखी इतर डझनभर कारणे, तसेच अत्याचार करणार्‍याच्या शोषणाची पद्धत अनेक बळींना त्यांच्या नशिबाला शरण जायला लावते. प्रत्येक श्रद्धामागे असे अत्याचार सहन करणार्‍या, वर्तमानपत्रात मथळे बनवणार्‍या हजारो स्त्रिया आपल्या समाजात आहेत, ज्यांना अद्याप मारण्यात आलेले नाही किंवा त्यांनी अत्याचार करणार्‍याच्या दयेवर अवलंबून राहण्यासाठी स्वतःला तयार केले आहे. लोकांना आश्चर्य वाटते, बुद्धी आणि मन जागेवर असणारी स्त्री तिच्या बाबतीत असे का होऊ देईल? पण, ते वेळोवेळी घडताना आज समाजात दिसते. शारीरिक शोषण असो वा शाब्दिक अत्याचार असो, लाखो स्त्रिया जगभरात हिंसक संबंधांना बळी पडतात. (क्रमश:)

-डॉ. शुभांगी पारकर