चित्रपट चालावा म्हणून खानांची ‘मन्नत’

    12-Dec-2022   
Total Views |
Shah Rukh


बॉलीवूडच्या खान मंडळींचा एखादा चित्रपट प्रदर्शित होत असेल, तर मंदिरात जाणे हा तसा नित्यनियमच. सध्या यात आघाडीवर आहे तो शाहरूख खान. तब्बल चार वर्षांनंतर त्याचा ’पठाण’ हा चित्रपट पुढील वर्षी २५ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याने मक्का येथे ‘उमराह’ केल्यानंतर नुकतेच माता वैष्णोदेवीचेही दर्शन घेतले. मंदिरात पोहोचल्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाले आहेत. कटरा येथील वैष्णोदेवी मंदिराजवळच्या या व्हिडिओत शाहरुख घाईगडबडीने मंदिराकडे जाताना दिसत आहे. विशेष म्हणजे, शाहरूखने यावेळी आपला अर्धा अधिक चेहरा मास्कने झाकलेला होता. मंदिरात गेल्यानंतर कट्टरतावादी शांत बसतील तरी कसे? त्यांनीही त्याच्यावर मुस्लीम धर्माची चेष्टा केल्याचे सांगत संताप व्यक्त केला. ऑगस्ट २०२२ मध्येही शाहरुख खानने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोशल मीडियावर गणेश मूर्तीचे छायाचित्र ठेवल्यानंतर कट्टरतावादी भडकले होते. शाहरूखने कितीही मंदिराचे उंबरे झिजवले तरी त्याच्या पोटातले अनेकदा ओठावर आले आहे. नुकताच मुलगा आर्यन खानमुळे तर त्याच्या कारकिर्दीवर मोठा डाग लागला. ड्रग्ज प्रकरणात मुलगा अडकल्याने मोठा वादंग उठला. नंतर तो या कचाट्यातून सुटला पण तरीही अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आमिर खान त्याची घटस्फोटित पत्नी किरण राव सोबत सत्यनारायणाच्या पूजेला बसला होता. त्यामुळे एकेकाळी ‘भारतात राहण्याची इच्छा नाही,’ असे बोलणार्‍या दोघांनी चक्क सत्यनारायणाच्या पूजेला बसल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट सुपर फ्लॉप झाल्यानंतर ‘आमीर सलाम वेंकी’ या काजोलच्या चित्रपटातून पुन्हा पडद्यावर येणार आहे. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांच्या ‘बॉयकॉट’ मोहिमेला घाबरून आमीरने यावेळी सावध पावले उचलली आहेत. हिंदुत्ववाद्यांचा रोष पुन्हा उफाळून येऊ नये आणि चित्रपट फ्लॉप ठरू नये, यासाठी त्याने आधीच तशी तयारी केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शाहरूखने कितीही तोंड लपवून मंदिराचे उंबरे झिजवले, तरीही त्याचा उपयोग शून्य आहे. त्याला सर्व धर्मीयांचे प्रेम मिळाले म्हणून चित्रपटसृष्टीत तो मोठा झाला. परंतु, एकाच धर्माविषयी गुणगाण गात दुसर्‍यांना कमी लेखले, तर मग फ्लॉपचा बोर्ड नशिबात मिळतो. त्यामुळे शाहरूखचे मंदिरात जाणे ही खरी भावना आहे की निव्वळ धूळफेक ते लवकरच कळेल.

शांतिदूतांची हिंसक भाषा


दक्षिण भारतातून निघालेली ‘भारत जोडो’ यात्रा आता उत्तर भारतात पोहोचली आहे. या यात्रेकडून मोठ्या अपेक्षा अनेकांनी व्यक्त केल्या खर्‍या, पण त्याचे नेतृत्व राहुल गांधींकडे असल्यावर यात्रेचे काय होणार, याची कल्पना न केलेली बरी. त्यातच काँग्रेसजनांना पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी किती प्रेम आहे, हे तर सर्वश्रुतच. अगदी ‘चहावाला’ म्हणण्यापासून ते आता चक्क मारण्यापर्यंत काँग्रेसी नेत्यांची मजल गेलेली आहे. मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या देणे ही काँग्रेस नेत्यांसाठी फार मोठी गोष्ट नाही. नुकतेच मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते राजा पटेरिया यांनी तर मोदींना मारायला तयार राहा, असे आवाहनच केले आहे. पटेरिया यांनी, मोदी निवडणुका संपवतील. ते धर्म, जात, भाषेच्या आधारावर फूट पाडतील. दलित, वनवासी आणि अल्पसंख्याकांचे जीवन धोक्यात आले आहे. संविधान वाचवायचे असेल तर मोदींना मारायला तयार व्हा, अशा शब्दांत आपल्या चिथावणीखोर वाणीने मोदींना संपवण्याची भाषा केली.पन्ना जिल्ह्यातील पवई येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना पटेरिया बोलत होते. त्यांचे हे विधान ‘व्हायरल’ झाल्यानंतर पटेरियांनी सारवासारव करत विधानाचा विपर्यास केल्याचे म्हटले. त्यानंतर त्यांनी फक्त निवडणुकीत मोदींचा पराभव करण्याबद्दल बोलत असल्याचे ते म्हणाले. “मी गांधींचा अनुयायी आहे. मी खुनाबद्दल बोलू शकत नाही,” असे सांगत आपले विधान फिरवले जात असल्याचा आवही पटेरियांनी आणला. यानंतर गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, ही काही पहिली वेळ नाही, जेव्हा काँग्रेस नेत्यांनी खालच्या पातळीवर जाऊन मोदींना लक्ष्य केले आहे. खुद्द राहुल गांधींनीही मोदींना ‘चौकीदार चोर हैं’ म्हणून हिणवले होते. परंतु, झाले उलटेच. २०१४  च्या लोकसभा निवडणुकीनंतर २०१९ सालीही काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. विरोधी पक्षनेतेपद मिळवता येईल इतके खासदार निवडून आणणेही काँग्रेसला शक्य झाले नाही. काँग्रेसने मोदींना मौत का सौदागार, भस्मासूर, राक्षस, रावण असे शिव्याशाप वाहिले. परंतु, मोदींनी आपला संयम ढळू दिला नाही. त्यांनी सर्वांना आपल्या कामातून उत्तर दिले. शांततेचे गोडवे गाणार्‍या काँग्रेसी नेत्यांना अशी मारण्याची भाषा नक्कीच शोभत नाही. अशाने जे काही शिल्लक आहे तेही गमावण्याची नामुष्की येईल.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.