‘पीएफआय’ला ‘हवाला’द्वारे १२० कोटी रुपये?

    12-Dec-2022   
Total Views |
pfi


‘पॉप्युलर फ्रंट’ला ‘हवाला’द्वारे १२० कोटी मिळाल्याचा सुगावा सक्तवसुली संचालनालयाला लागला आहे. पण, नेमके कोणाकडून या पैशाचा पुरवठा केला गेला, याचा तपास सक्तवसुली संचालनालय आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून केला जात आहे. यासंदर्भात मल्लपुरम आणि कोझिकोडे या केरळमधील दोन जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिक लोकांवर तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रित केले आहे.


बंदी घालण्यात आलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ला राष्ट्रविरोधी कारवाई करण्यासाठी एवढा प्रचंड पैसा कुठून मिळतो, याचा तपास यंत्रणांकडून शोध घेणे सुरू आहे. ‘पीएफआय’ आणि तिच्याशी संबंधित संघटना यांच्या व्यवहारांचा सक्तवसुली संचालनालयाकडून शोध घेतला जात आहे. ‘पॉप्युलर फ्रंट’ला ‘हवाला’द्वारे १२० कोटी मिळाल्याचा सुगावा सक्तवसुली संचालनालयाला लागला आहे. पण, नेमके कोणाकडून या पैशाचा पुरवठा केला गेला, याचा तपास सक्तवसुली संचालनालय आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून केला जात आहे. यासंदर्भात मल्लपुरम आणि कोझिकोडे या केरळमधील दोन जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिक लोकांवर तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रित केले आहे. विविध व्यावसायिकांनी ‘पीएफआय’च्या खात्यांमध्ये पैसे पाठविण्याचा प्रयत्न केल्याचे तपास अधिकार्‍यांना आढळून आले आहे. यासंदर्भात सक्तवसुली संचालनालयाने एक तक्ताही तयार केल्याची माहिती आहे.

मल्लपूरमधील रहिवासी अबूबकर पझेदाथ याचे निवासस्थान आणि कार्यालय येथून सोने आणि मोठी रोकड सक्तवसुली संचालनालयाने अलीकडेच जप्त केली. राजनैतिक अधिकार्‍यांना असलेल्या सवलतीचा फायदा घेऊन हे सोने भारतात आणले गेल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. या व्यक्तीचा ‘पीएफआय’शी थेट संबंध नसला तरी बंदी घालण्यात आलेल्या या संघटनेच्या खात्यात पैसे हस्तांतरित करीत असल्याचा त्याच्यावर संशय आहे. अबू बकरशी संबंधित असलेल्या अन्य काही उद्योजकांच्या कार्यालयांमधून काही फायली आणि कागदपत्रे तपास यंत्रणांनी ताब्यात घेतली आहेत. काहींनी आपल्याकडील काळा पैसा ‘पीएफआय’ला देणगी म्हणून दिला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कोट्टाकल, चानकुवेट्टी, इदरीकोड, रानदथानी आणि पोनमला या मल्लपूरम जिल्ह्यातील गावांमधील फर्निचरचे व्यापारी, दागिन्यांचे दुकानदार, पर्यटन व्यावसायिक यांच्या कार्यालयांची झडती घेऊन काही कागदपत्रे तपास यंत्रणांनी जप्त केली आहे. पलक्कडमधील एका बेकरी मालकास चौकशीसाठी दिल्लीला बोलविण्यात आले आहे.

सध्या जो तपास केला जात आहे, तो ‘पीएफआय’चा नेता मोहम्म्द शेफिक याने दिलेल्या माहितीच्या आधारे केला जात आहे. या शेफिकला कोझिकोडे येथून अटक करण्यात आली होती. बेकायदेशीर कारवाया करण्यावर आणि २०२० मध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीवर १२० कोटी रुपये खर्च झाल्याचा सक्तवसुली संचालनालयाचा संशय आहे. ‘पीएफआय’वर बंदी घालण्यात आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती रोज नवनवीन माहिती लागत आहे. मात्र, केरळ सरकारच्या पोलिसांकडून याबाबत काही तपास केला जात असल्याचे ऐकीवात नाही. बंदी घालण्यात आलेल्या राष्ट्रविरोधी संघटनेची चौकशी करण्याची राज्य सरकारची काही जबाबदारी नाही का? पण, याबाबत केरळ सरकार मौन बाळगून गप्प आहे.

सुब्रमण्यम भारती यांच्या कुटुंबीयांची परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली भेट


महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीदिनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काशी नगरीत राहत असलेल्या या महाकवीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. आपल्या भेटीत जयशंकर यांनी त्यांचे नातू कृष्णन यांची भेट घेतली. महाकवींच्या नातलगांना भेटून आपणास आनंद झाला. त्यांच्या परिवाराचा आशीर्वाद आणि प्रेरणा आपणास मिळाली, असे जयशंकर यांनी म्हटले आहे. सुब्रमण्यम भारती कवी, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक म्हणून ओळखले गेले. ते तामिळनाडूमध्ये ‘महाकवी भारतीयार’ म्हणून ओळखले जातात. सुब्रमण्यम भारती यांच्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यासाठी मोठी प्रेरणा मिळाली होती.

सुब्रमण्यम भारती यांचा जन्म दि. ११ डिसेंबर, १८८२ रोजी तामिळनाडूमधील तिरुनेलवेली जिल्ह्यातील इत्तयापुरम नावाच्या एका खेड्यात झाला होता. सुब्रमण्यम भारती यांच्यामुळे तामिळ साहित्य क्षेत्रात एका नव्या युगाचा प्रारंभ झाला होता. महाकवी सुब्रमण्यम भारतीचे समाज सुधारकही होते. जाती प्रथेविरुद्ध ते खंबीरपणे उभे राहिले होते. पुरुष आणि स्त्री या दोनच जाती आहेत, त्याहून अधिक कोणत्या नाहीत, असे त्यांचे ठाम म्हणणे होते. जाती प्रथेविरुद्ध संघर्ष करण्यास त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या जानव्याचा त्याग केला होता. या महाकवीचे दि. ११ सप्टेंबर, १९२१ रोजी निधन झाले. या महाकवीस देश विसरला नाही हेच परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.

राजीव गांधी हत्याकांडातील गुन्हेगारास व्याख्यानाचे निमंत्रण!


माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडात दोषी ठरलेल्या ए. जी. पेरारीविलन याला पत्रकारितेचे शिक्षण देणार्‍या ‘एशियन कॉलेज ऑफ जर्नालिझम’या संस्थेने व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केले आहे. चेन्नई येथे ही संस्था असून ती ‘मीडिया डेव्हलपमेंट फाऊंडेशन’तर्फे चालविली जाते. ‘हिंदू’ दैनिकाचे एन. राम हे या संस्थेचे संस्थापक विश्वस्त. शनिवार, दि. १७ डिसेंबर रोजी हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. राजीव गांधी हत्याकांडात एका निष्पाप व्यक्तीस नाहक गोवण्यात आले, असे सांगण्याचा प्रयत्न, ज्या संस्थेने हे व्याख्यान आयोजित केले आहे त्यांच्याकडून केला जात आहे.

पण, राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील दोषी व्यक्तीस निमंत्रित केल्याबद्दल समाज माध्यमातून जोरदार टीकाही केली जात आहे. ‘द डिनायल ऑफ जस्टीस अ‍ॅण्ड अ क्वेस्ट अनफिनिश्ड’ असा या व्याख्यानाचा विषय आहे. हा विषय लक्षात घेता एक दोषी व्यक्ती कशी निरपराध होती, हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येते. राजीव गांधी यांची दि. २१ मे, १९९१ रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरांबुदूर येथे हत्या झाली. आज ५० वर्षांचा असलेला पेरारीविलन त्यावेळी १९ वर्षांचा होता आणि तो तामिळी वाघांचा समर्थक होता. पत्रकारितेचे शिक्षण देणार्‍या संस्थेने एका गुन्हेगारास व्याख्यानासाठी निमंत्रित केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.



पंजाब

‘भारताला रक्तबंबाळ करण्याचे प्रयत्न’


पंजाबमध्ये तरनतारन पोलीस केंद्रामध्ये जो कमी शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला, तो लक्षात घेता पंजाबमधील परिस्थिती अस्थिर करण्याचे प्रयत्न भारतविरोधी शक्तींचे चालले असल्याचे दिसून येते. या पोलीस स्थानकावर रॉकेटमधून जो ग्रेनेड हल्ला करण्यात आला त्याची जबाबदारी ‘सीख्ज फॉर जस्टीस’ या खलिस्तानचे समर्थन करणार्‍या संघटनेने घेतली आहे. शेतकरी आंदोलनाच्या वेळी याच संघटनेने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा लावणार्‍यास प्रचंड इनाम देण्याची घोषणा केली होती. भारतावर हजारो जखमा करून भारतास रक्तबंबाळ करण्याचा काही विदेशी तत्वांचा प्रयत्न असल्याचे या घटनेवरून स्पष्टपणे दिसत आहे, असे पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी म्हटले आहे.

पाकिस्तान हा देश तर उघडपणे खलिस्तानवाद्यांना मदत करीत आहे. अनेक खलिस्तानवादी पाकिस्तानमधील गुरुद्वारांमध्ये आश्रय घेऊन आहेत. ‘सीख्ज फॉर जस्टीस’ने जो दावा केला आहे त्याची सत्यता आम्ही पडताळून पाहत आहोत, असेही गौरव यादव यांनी म्हटले आहे. या स्फोटाचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. तसेच पाकिस्तान, युरोप, उत्तर अमेरिका आदी भागांतील खलिस्तानवादी तत्वांशी या घटनेचे धागेदोरे जुळले आहेत का, याचाही तपास केला जात आहे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, पंजाबमधील कायदा-व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. तरन तारनमध्ये जो हल्ला झाला, त्याबद्दल आम आदमी सरकारचे मुख्यमंत्री भगवान मान जबाबदार असल्याचा आरोपही भाजपने केला आहे. या आधी मोहालीमध्ये गुप्तचर मुख्यालयावर हल्ला झाला होता आणि आता पोलीस स्थानकावर हल्ला झाला आहे. दिल्लीहून आदेश घेण्याऐवजी भगवान मान यांनी राज्यातील परिस्थितीवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही भाजपने मुख्यमंत्र्यांना केले आहे. पंजाबमध्ये ‘आप’चे सरकार आल्यानंतर खलिस्तानवादी तत्वे पुन्हा सक्रिय झाली असल्याचे दिसून येत आहे. या तत्वांचा बीमोड करण्याचे आव्हान ‘आप’ सरकारपुढे आहे. ते सरकार त्या दिशेने कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष आहे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.