भाजपचा मुख्यमंत्री कसा झाला?

    11-Dec-2022   
Total Views |
jayram ramesh

गुजरातमध्ये काँग्रेसने केवळ १७ जागा जिंकल्या. अतिशय दारूण पराभव काँग्रेसचा झाला. या पराभवाची जबाबदारी कुणाची? तर पक्षाचे नेते जयराम यांचे म्हणणे आहे, गुजरातमधील हार ही गुजरात राज्यातील नेतृत्वाची हार आहे. राहुल गांधी त्याला जबाबदार नाहीत. थोडक्यात, जयराम यांचे म्हणणे आहे की, राहुल यांनी गुजरातमधे जागोजागी रॅली आणि भाषण केले असते, तर गुजरातमधील बहुसंख्य जागा काँग्रेसनेच जिंकल्या असत्या. आता गुजरातमध्ये काँग्रेस हरल्यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्याचे खापर गुजरातच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांवर फोडले आहे. दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा ‘लक बाय चान्स’ असा विजय झाला. मात्र, आता हिमाचल प्रदेशमध्ये विजय कुणामुळे झाला असे विचारले तर? तर उत्तर देण्याआधीच पक्षाचे वरिष्ठ म्हणत आहेत की, पक्षाचे युवा लोकप्रिय नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा काढली. या यात्रेमुळेच हिमाचल प्रदेशामध्ये काँग्रेसचा विजय झाला. याचाच अर्थ विजय मिळवला, तर त्याचे सर्व श्रेय गांधी परिवाराला आणि पराजय झाला, तर त्याचे सारे अपश्रेय पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाकडे. हे कोणते गणित आहे, हे आजपर्यंत कुणालाच कळले नाही. तसेच आता हिमाचल प्रदेशच्या विजयामध्ये किंवा गुजरातच्या पराभवामध्ये काँग्रेसचे बहुचर्चित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे नावच कुठे नाही. मग इतकी उठाठेव करून, त्या निवडणुका घेऊन काँग्रेसने राष्ट्रीय अध्यक्ष निवडला, त्याचे फलित हेच का? की फक्त लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी ती अध्यक्षांची निवडणूक होती. असो आपल्याला काय? सध्या चित्र तर हेच आहे की, हिमाचल प्रदेशमध्ये राहुल गांधी पोहोचलेले आहेत. काही काळातच त्यांच्या मातोश्री सोनियाबाई पण तिथे पोहोचतील. मग सोनिया गांधी किंवा राहुल गांधी उरले सुरले, तर प्रियांका गांधी यांच्यामुळेच हिमाचल प्रदेशमध्ये विजय मिळवला, हे सांगण्यासाठी उपस्थित पक्षनिष्ठांची स्पर्धा सुरू होईल. या गदारोळात पक्षाचे स्थानिक नेतृत्व, खासदार-आमदार आणि तत्सम नेते मनात म्हणतील, “गांधी परिवारामुळेच हिमाचल प्रदेशमध्ये जिंकलो तर मग आम्ही असलो काय नसलो काय? चला भाकरी फिरवू. जिथे कदर असेल तिथे जाऊ.” मग असे झाले की, काँग्रेसचे सरकार बनले, तरी टिकणे अशक्यच. मग त्यानंतर हेच काँग्रेस आणि सोबतचे प्रमुख पक्ष म्हणतील, अरे, आम्ही जिंकलेलो असताना भाजपचा मुख्यमंत्री कसा झाला?

सुलोचनाबाईंच्या मुलाची खंत


महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांनी आजवर शेकडो गाणी गायली. ज्यावेळी लावणीला फारशी प्रतिष्ठा नव्हती, तेव्हाही त्या अत्यंत सन्मानाने लावणी गात होत्या आणि लावणीला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. प्रचंड समाजशीलतेने त्यांनी सामाजिक कार्यातही योगदान दिले. काही महिन्यांपूर्वी वयाच्या नव्वदीच्या टप्प्यावर त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले गेले. नुकतेच सुलोचनाबाईंचे निधन झाले. आयुष्याच्या शेवटी असे पुरस्कार दिल्याने त्याचे काहीच मूल्य राहत नाही, असे मनोगत सुलोचनाबाईंच्या मुलाने व्यक्त केले म्हणे.खरेतर ही खंत केवळ त्यांच्या पुत्राचीच नाही, तर साहित्य, क्रीडा, कला आणि सामाजिक क्षेत्रातील सार्‍याच मान्यवरांच्या नातेवाईकांची आहे. अर्थात, कला किंवा ध्येयासाठी जीव ओतणार्‍या व्यक्तीस पुरस्काराचे काही देणेघेणे नसते. पण कलेच्या आणि ध्येयाच्या ध्यासापायी या व्यक्तीला काय आणि कोणता संघर्ष करावा लागतो, हे ती व्यक्ती आणि तिच्या जवळचे लोकच जाणतात. प्रचंड संघर्षाने व्यक्ती आपले अस्तित्व निर्माण करते. ध्येय साध्य झाल्यावर, कर्तृत्वाचा डोंगर उभा केल्यावर व्यक्ती थांबते. ती व्यक्ती आणि तिचे काम कालातीत असते आणि ऐतिहासिकही असू शकते. मात्र, असेच नेहमी घडते की, ती व्यक्ती ज्यावेळी खूप वृद्ध होते किंवा जिला या पुरस्काराचे काही सोयरसुतक नसते किंवा गरजही नसते, त्यावेळी व्यक्तीला मानसन्मानाचे प्रशासकीय पुरस्कार प्राप्त होतात. हेच पुरस्कार व्यक्तीला तिच्या कार्यकाळात मिळाले तर? ती आणखी उत्साहित होऊन काम करू शकली असती किंवा तिच्या कामात, तिच्या ध्येयात जे अडथळे आले होते ते तरी कमी झाले असते. आता कुणी म्हणेल की, यशाला संघर्षाशिवाय मजा नाही. मात्र, काम करताना, ध्येय गाठताना कुणीतरी आपल्या सोबत आहे, कुणाला तरी आपण केलेले काम, आपले ध्येय याची किंमत आहे, असे जेव्हा व्यक्तीला वाटते तेव्हा त्याचा उत्साह, हिंमत द्विगुणित होते. जेव्हा कसलाच आनंद आणि दु:ख नसते, जेव्हा व्यक्ती त्या कामातून आणि त्या ध्येयातून बाहेर पडलेली असते तेव्हा त्या व्यक्तीला कितीही सन्मानित केले तरी ‘वो दिन गये...’ हेच सत्य असते. त्यामुळेच सुलोचनाबाईंच्या पुत्राने हे मनोगत व्यक्त करून अनेकांच्या मनातल्या भावनांना वाट करुन दिली. खरेच कुणाला गुणांसाठी, कर्तृत्वासाठी, ध्येयपूर्तीसाठी, सन्मानित करायचे असेल, तर त्या व्यक्तीच्या आयुष्याची नौका पैलतिरी लागेपर्यंत प्रतीक्षा का करायची?




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.