हत्या की वध? या दोहोंमधली सूक्ष्मरेषा अधोरेखित करणारा चित्रपट

    10-Dec-2022   
Total Views |

vadh


चित्रपट म्हणजे फक्त समाज मनाचा आरसा असतो का? तर नाही. चित्रपट हे कित्येकांचं प्रेरणास्थानही असतं. आणि म्हणून चित्रपटासाठी कथानक निवडताना काळजी घ्यायला हवी. वध हा चित्रपट आजपासून सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेते संजय मिश्रा यांनी दैनिक तरुण भारतला मुलाखत दिली, त्यावेळी ते म्हणाले, “कुणाची हत्या करणं पाप आहे पण वध मात्र करायला हवा. वध हा वाईट शक्तींचा होतो, वाईट कर्मांचा होतो. जे जे या विश्वात वाईट आहे ते समूळ नष्ट करायला हवं. राम कृष्ण आणि अनेक स्त्री दैवतांनी हेच केलंय. ही आपली संस्कृतीच आहे.”
 
 
खरंतर संस्कृती प्रवाही आहे. तिला काळाचा वेग आहेच पण दिशा आपण देत असतो. ती विचारपूर्वक द्यायला हवी. या चित्रपटात नायकाने खलनायकाची केलेली निर्घृण हत्या आणि इतर बाह्य संघटनांचं नायकाला मिळालेलं अनुमोदन, असा साधारण रुळलेला/ शिळा झालेला विषय आहे. परंतु कथेची बांधणी उत्तम झाली आहे. ही दखल मात्र घ्यायलाच हवी.
 
 
चित्रपटात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत आहेत. त्यांचा परदेशात राहणार मुलगा आणि त्याच्या शिवाय सुरु असणारे त्यांचे आयुष्य. आई बाबांच्या मुलासोबत असलेल्या नात्याचं भावविश्व् आणि त्या भावविश्वात रमणारे हे दोघे, या एवढ्याच एका धाग्याभोवती कथा फिरत राहते. या आईबाबांच्या अडचणी आणि छोट्याश्या आयुष्यातली त्यांची सुख दुःख असा नात्यांचा छान गोफ यातून आपल्याला पाहायला मिळतो. तांत्रिक दृष्ट्या पाहिलं तर सर्वच बाजू अप्रतिम सांभाळल्या आहेत. कॅमेरा अँगल्स पासून चित्रित केलेल्या दृष्यांपर्यंत सर्वच अत्यंत शिस्तबद्धप्रमाणे चित्रित केलेले आहे. दोन्ही कलाकार प्रथित यश असल्याने आपली भूमिका दोघंही अत्यंत उत्कटतेने मांडतात. चित्रपटाची सुरुवातच तुळशी वृंदावनाच्या पूजनाने होते. देवभोळं घर आणि धार्मिक भाव यातून दिसून येतो.
 
 
चित्रीकरण एका लहानशा पडक्या घरात झालेल आहे. रंग उडालेल्या भिंती आणि लहान आकाराची जागा असली तरी कॅमेरा हालचालींवर आणि पात्रांच्या वॉकिंग स्पेसवर त्याचा काहीही परिणाम होत नाही, हे विशेष. लाईट्स चा सुद्धा योग्य प्रमाणात वापर झालेला आहे. नेमका उजेड आणि अस्वस्थ असताना हतबलता दाखवणारा अंधार आपल्याला त्या पात्रांच्या मानसिक स्थितीशी जोडतो. या घरापर्यंत कॅमेरा येताना असंख्य दाटीवाटीने वसलेल्या घरातून, डोक्यावर पदर घेऊन भांगात कुंकू भरलेल्या स्त्रिया दाखवत, खेळणाऱ्या मुलांना शिताफीने चकवत येतो. ही कथा उत्तर प्रदेशातील आहे हे लगेच लक्षात येतं. सिनेमॅटोग्राफी, एकंदर चित्रीकरण, संकलन आणि संवाद सुस्पष्ट आणि ठळक आहेत. आणि म्हणूनच चित्रपट पाहताना आपण त्या चित्रपटाच्या वेगासोबत वाहवत जातो.
 
 
खलनायकाची भूमिका साकारताना कलाकाराला बऱ्यापैकी अवकाश मिळतो. नायकासारखी गोड गोड भूमिका त्याची नसते, तो आपली विशिष्ट ओळख यातून निर्माण करू शकतो. खलनायकाने या स्वातंत्र्यच पुरेपूर वापर केलेला आहे. अनेक तामसी सवयी असणारा खलनायक सुद्धा दिल्या शब्दाला जगणारा आहे आणि व्यवहाराला धरून वागणारा दाखवल्याने ती भूमिका रेखाटणाऱ्या लेखकाचे कौतुक वाटते.
 
 
कोणत्याही प्रकारे, कोणत्याही व्यक्तीची पार्श्ववभूमी जाणून न घेता फक्त एखादी व्यक्ती आपल्याशी वाईट वागते म्हणून तिला वाईट ठरवून कायदा हातात घेऊन तिचा खून करणं, हे चूकच. त्यातही काही जबाबदार व्यक्तींचा पाठिंबा दाखवून आपण आपली समाज प्रबोधनाची जबाबदारी झटकतो असं काहीसं या चित्रपटात दिसून येतं.
 
 
तरीही अत्यंत कल्पकतेने गुम्फलेलं हे कथानक समाजात घडणाऱ्या सामाजिक, मानसिक, भावनिक पातळीवरचं आई बाबांच्या भावविश्वाचं एक ज्वलंत उदाहरण आहे. यातून अनेक बोध मिळतात. ही एक बोध कथाच आहे. उंच आकांक्षा असलेल्या प्रत्येक मुलाने आणि आपल्या मुलांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक आई बाबांनी विचार करावा असे अनेक मुद्दे या चित्रकथेत जागोजागी पेरले आहेत. त्यासाठी मात्र हा चित्रपटच पाहायला हवा.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.