चिनी आंदोलकांचे जिनपिंग विरोधी सोशल मीडिया अस्त्र

    10-Dec-2022   
Total Views |
Jinping

चीनमधील या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘विबो’वर ‘शांघाय’ आणि ‘उरुमकी’सारख्या शब्दांवर बंदी घालण्यात आली आहे. जेव्हा तुम्ही ‘विबो’वर शोधण्यासाठी असे शब्द प्रविष्ट करता, तेव्हा तुम्हाला ‘सेन्सॉर’ केलेला शोध दिसेल. आंदोलनापूर्वी असा कीवर्ड टाकल्यावर त्याच्याशी संबंधित लाखो निकाल दिसायचे. ‘झिरो कोविड’ धोरणाविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांबद्दल लोकांनी बोलू नये, म्हणून हे केले गेले आहे. यासोबतच ‘विबो’वर कोर्‍या कागदावरही बंदी घालण्यात आली आहे.
नमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्याने अनेक भागात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आले. चीनमधील या ‘झिरो कोविड’ धोरणाबाबत देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. लोक रस्त्यावर उतरून सध्याच्या चीन सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत. यासोबतच ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या राजीनाम्याचीही आंदोलकांनी मागणी केली होती.चीनच्या अध्यक्षपदी शी जिनपिंग यांची पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या ‘झिरो कोविड’ धोरणा चीनमध्ये तसेच इतर देशांतही आंदोलन केले जात आहे. चीनची राजधानी बीजिंग येथे झळकलेल्या पोस्टर्समुळे हे आंदोलन पेटले.‘मला ‘पीसीआर टेस्ट’ नव्हे, तर अन्न हवे आहे. आम्हाला ‘लॉकडाऊन’ नव्हे, तर स्वातंत्र्य हवे आहे. आम्हाला खोटे बोलणे नकोय, तर सन्मान हवाय. आम्हाला सांस्कृतिक क्रांती नव्हे, तर सुधारणा हव्या आहेत. आम्हाला नेता नव्हे, तर मत हवे आहे. आम्हाला गुलाम नव्हे, तर नागरिक हवे आहेत,’ असे बॅनर्स आंदोलकांकडून राजधानीत झळकवण्यात आले.

आंदोलनाशी निगडित सर्व व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवले

चीन सरकारने या आंदोलनाशी निगडित असलेले सर्व व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, फोटो आणि या आंदोलनाशी संदर्भ असलेले शब्दही वापरण्यास मनाई करण्यात आली. उदाहरणादाखल उरुमकी, शांघाय हैदियान, बीजिंग प्रोस्टेस्टर्स, सिटाँग ब्रीज अशा प्रकारचे सर्व शब्द सोशल मीडियावरून हटवण्यात आले आहेत. ‘हिरो’, ‘करेज’, ‘ब्रीज’ या शब्दांचा सोशल मीडियावर वापर करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. ‘प्रोटेस्ट’ सर्च केल्यावर ‘पॉर्न’शी संबंधित लिंक्स दिसत आहेत. बीजिंग शहरातील सर्व पुलांवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच ठिकठिकाणी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

‘व्हॉईस ऑफ सीएन’ हा लोकशाहीचं समर्थन करणार्‍या अज्ञात चिनी नागरिकांचा एक गट असून त्यांचं एक इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. ‘व्हॉईस ऑफ सीएन’च्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये हे आंदोलन बीजिंगसोबतच अन्य शहरांमध्येही पसरले. शेंझहेन, बीजिंग, गुआंगझू, हाँगकाँग या शहरांत शी जिनपिंग यांच्याविरोधात आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात तरुण, विद्यार्थी सक्रियपणे सहभागी होत असल्याचे दिसत आहे. प्रसाधनगृहांमध्ये या आंदोलनासंदर्भातील पोस्टर्स लावले जात आहेत. प्रसाधनगृहांत ‘सीसीटीव्ही’ नसल्यामुळे आंदोलकांनी आपला निषेध व्यक्त करण्यासाठी हा मार्ग स्वीकारला आहे.

सोशल मीडियावर विरोध लपवण्यासाठी ‘सेक्स बॉट’चा वापर

चीनची सेन्सॉरशिप मशीनही सक्रिय झाली आहे. गेल्या रविवारी मोठ्या संख्येने चिनी भाषेतील ट्विटर खाती लाईव्ह झाली आणि ट्विटर अश्लील फोटो, आक्षेपार्ह व्हिडिओ आणि एस्कॉर्ट सेवांच्या लिंक्सने भरून गेले. ज्या अकाऊंटवरून हे सर्व ट्विट करण्यात आले, त्यातील अनेक खाती वर्षभरापूर्वी तयार करण्यात आली होती किंवा ती निष्क्रिय होती. परंतु, या आठवड्याच्या शेवटी देशभरात निषेध पसरल्यापासून, त्या खात्यांमधून दररोज हजारो पोस्ट शेअर केल्या जात आहेत.

अनेक वर्षांपासून बंद झालेली मोठी खाती आंदोलन सुरू होताच सक्रिय

जिथे ‘लॉकडाऊन’च्या विरोधात निदर्शने सुरू झाली आहेत, तेथे सोशल मीडिया नेटवर्कवर चिनी भाषेतील शहरांची नावे सर्च करण्यात येत आहेत. यामुळे, सरकार ट्विटरवर या अश्लील पोस्ट त्या शहरांच्या नावाने शेअर करत आहे, जेणेकरून जे लोक ट्विटरवर चीनमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांची माहिती शोधत आहेत, त्यांचे लक्ष विचलित होईल. २००९ मध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने चीनमध्ये ट्विटर ‘ब्लॉक’ केलं होतं. मात्र, देशातील लोक अजूनही ‘वीपीएन’ किंवा संकेतस्थळावर ‘प्रॉक्सी’ सेवेद्वारे या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करू शकतात. जर एखाद्या चिनी वापरकर्त्याने काल रात्री चीनमध्ये काय घडले हे शोधण्यासाठी ट्विटरवर सर्च केले, तर त्याला आधी NSFW (not suitable for work)पोस्ट दिसत आहे.

शांघाय आणि बीजिंग या राजधानीसह अनेक प्रमुख चिनी शहरांमध्ये अलीकडच्या काळात निदर्शने झाली. संशोधकांनुसार, पॉर्न पोस्टिंग बॉट खाती सोशल नेटवर्क्सवरील माहितीचा प्रसार रोखण्याच्या सरकारी प्रयत्नांचा एक भाग आहेत. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील चिनी-अमेरिकन संशोधक मेंग्यु डोंग, इतर वापरकर्त्यांनी या समस्येला तोंड देण्यासाठी ट्विटरवर सोशल नेटवर्कचे ‘सीईओ’ एलॉन मस्क यांच्याकडे मदत मागितली आहे. या विरोधादरम्यान, चीनमधील उरुमकी शहरातील एका अपार्टमेंटमध्ये आग लागून दहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारच्या ‘शून्य कोविड’ धोरणाविरोधातील आंदोलन आणखी तीव्र झाले.

‘विबो’वर ‘उरुमकी’ आणि ‘शांघाय’सारख्या शब्दांवर बंदी

चीनमधील या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘विबो’वर ‘शांघाय’ आणि ‘उरुमकी’सारख्या शब्दांवर बंदी घालण्यात आली आहे. जेव्हा तुम्ही ‘विबो’वर शोधण्यासाठी असे शब्द प्रविष्ट करता, तेव्हा तुम्हाला ‘सेन्सॉर’ केलेला शोध दिसेल. आंदोलनापूर्वी असा कीवर्ड टाकल्यावर त्याच्याशी संबंधित लाखो निकाल दिसायचे. ‘झिरो कोविड’ धोरणाविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांबद्दल लोकांनी बोलू नये, म्हणून हे केले गेले आहे. यासोबतच ‘विबो’वर कोर्‍या कागदावरही बंदी घालण्यात आली आहे.

साध्या वेशातील पोलिसांकडून चिनी नागरिकांचे अपहरण

साध्या पोशाखात उभे असलेले पोलीस प्रदर्शन करताच लोकांचे अपहरण करतानाही दिसून आले. जे लोक अशा आंदोलकांना सोडवण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांचा व्हिडिओ तयार करतात, त्यांना पोलीस थांबवतात. अशा तरुणांना जबरदस्तीने पोलीस व्हॅनमध्ये डामले जाते. यानंतर व्हॅन तरुणाला घेऊन निघून जाते. आतापर्यंत पोलिसांनी अशा प्रकारे डझनभर आंदोलकांचे आणि त्यांच्या समर्थकांचे अपहरण केले आहे.

पोलिसांपासून वाचण्यासाठी कोर्‍या कागदासह निदर्शने

चीनमध्ये झालेल्या निदर्शनांच्या छायाचित्रे आणि व्हिडिओमध्ये लोक हातात पांढरे चक्क कोरे कागद हातात घेऊन दिसून आले. पांढरे कागद हातात असलेले हे आंदोलक गप्प आहेत. आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी अनेकांनी कोर्‍या कागदांची छायाचित्रेही सोशल मीडियावर शेअर केली. त्या कागदांवर काहीही लिहिलेले नसल्यामुळे, कोणत्याही टिप्पणीसाठी त्याला कायद्याने शिक्षा होऊ शकत नाही.

घराबाहेर पडू दिले जात नाही, रस्त्यावरून चालणार्‍यांचेही फोन तपासतात

शांघायसारख्या शहरात पोलीस आंदोलकांना घराबाहेर पडू देत नाहीत. कोणत्याही ठिकाणी आंदोलनाची माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचतो. शेकडो एसयूव्ही, व्हॅन आणि चिलखती वाहने शहराच्या रस्त्यांवर रांगेत उभी असतात. पोलीस रस्त्यावरून चालणार्‍या लोकांचा फोन हिसकावून घऊन शोध घेतात. यासोबतच सोशल मीडियावरील पोस्टचाही शोध पोलीस घेत आहेत.

आंदोलनाची धग अन्य देशांमध्ये

अमेरिका, ब्रिटन, युरोप, ऑस्ट्रेलिया देशातील वेगवेगळ्या विद्यापीठांतही चीनविरोधात आंदोलन केले जात आहे. ‘आम्ही चीनमधील लोक आहोत. कोणत्याही बंधनाशिवाय आमच्या मनातील संदेश आम्हाला पोहोचवायचा आहे,’ ‘जिनपिंग आमचे राष्ट्राध्यक्ष नाहीत,’ ‘बाय बाय जिनपिंग’ अशा आशयाचेही पोस्टर्स काही ठिकाणी लावण्यात आले होते.

हाँगकाँग, तियानानमेन स्क्वेअर आंदोलन चिरडले

हाँगकाँगमध्ये २०१९च्या मोठ्या निषेधादरम्यान हे सगळे अमेरिकेच्या ‘सीआयए’चे षड्यंत्र असल्याचे म्हटले होते. यामुळे ट्विटर आणि फेसबुकवर हजारो बीजिंग समर्थक पोस्टचा पूर आला होता. यासाठी बनावट खाती तयार करण्यात आली, जी नंतर ‘ब्लॉक’ करावी लागली. त्यानंर चीनने अत्यंत आक्रमक कारवाई करून तेथील आंदोलन चिरडले होते.१९८९ मध्ये तियानानमेन चौकातले आंदोलक, सुरू झाले आणि मेमध्ये बीजिंगमध्ये ‘मार्शल लॉ’ लागू झाला. दि. ३ आणि ४ जूनला सैन्याने तियानानमेन स्क्वेअरच्या दिशेने जायला सुरुवात केली. गोळीबार करत, आंदोलकांना चिरडत, अटक करत त्यांनी त्या या परिसराचा ताबा घेतला. २०० नागरिक आणि काही डझन सुरक्षारक्षक मारले गेल्याचे चीन सरकारने म्हटले होते. पण, चीनमधील ब्रिटिश राजदूत सर अ‍ॅलन डॉनल्ड यांच्या दाव्यानुसार त्यावेळी तब्बल दहा हजार नागरिक मारले गेले होते.एकूणच काय, आताही गेल्या ३३ वर्षांतील देशातील सर्वांत मोठा विरोध दडपण्यासाठी चीन सरकार कोणत्याही थराला जाऊ शकते, हेच सिद्ध होते.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हेमंत महाजन

लेखक निवृत्त ब्रिग्रेडियर असून भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारताचे परराष्ट्रीय संबंध या विषयांवर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘नक्षलवादाचे आव्हान-चीनचे भारताशी छुपे युद्ध’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.