
मुंबई: मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 नुसार ’ग्रंथोत्सव 2022’ चे आयोजन करण्यात आले आहे या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शनिवार, दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता वांद्रे पूर्व, शासकीय वसाहत, चेतना कॉलेज जवळ कम्युनिटी हॉल येथे होणार आहे. जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडे, प्रमुख कार्यवाह प्रमोद महाडिक यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी 9 ते साडेनऊ या वेळेत ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार अॅड. अनिल परब, आमदार अॅड. आशिष शेलार, झिशान सिद्दिकी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत ‘आनंदयात्रा’ या विषयावर प्रसाद कुलकर्णी यांचे व्याख्यान, दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत दीपाली केळकर यांचा ‘हास्य संजीवनी’ हा कार्यक्रम, दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत वेळेत ‘उद्योजकता आणि स्टार्टअप विकास’ या विषयावर प्रा. एस. आर. कस्तुरे यांचे व्याख्यान, दुपारी 4 ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत महेश केळुसकर यांचे 21 भारतीय भाषातील अनुवादित कवितांचे सादरीकरण होणार आहे.
दि. 11 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत मुलांसाठी कथाकथन स्पर्धा तर, सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत श्याम जोशी यांचे ‘मराठी पुस्तक आणि वाचन संस्कृती’ या विषयांवर व्याख्यान तसेच, दुपारी 12 ते 1 या वेळेत ’ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ या विषयावर गौरव सोमवंशी यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारच्या सत्रात दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत ’माझा साहित्यप्रवास’ या विषयावर डॉ. संगीता बर्वे यांचे व्याख्यान, दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत प्रवीण दवणे यांचे ’वाचनाची आनंदयात्रा’ हे व्याख्यान होणार आहे. दुपारी 4 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ‘आर्थिक साक्षरता’ या विषयावर प्रफुल्ल वानखेडे यांची ज्येष्ठ संपादक राहूल गडपाले हे मुलाखत घेणार आहेत. सायंकाळी 5 ते साडेसहा ‘वाघूर’ दिवाळी अंकाचे संपादक नामदेव कोळी, संतोष शेळके, अविनाश सावंत, प्रदीप कोकरे, प्रियांका तुपे, स्वप्नील जाधव, विशाखा विश्वनाथ, काजल बोरस्ते, सचिन शिंदे, संजय पवार यांचे कवीसंमेलन होणार आहे. या कार्यक्रमास ग्रंथप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड यांनी केले आहे.