संमेलनाध्यक्ष आणि आयोजन मंडळाने साहित्याला न्याय द्यावा एवढीच माफक अपेक्षा

    09-Nov-2022   
Total Views |

sahitya
 
 
 
 
 
 
साहित्य संमेलनाचं प्रयोजन काय? संमेलनाध्यक्षांकडून आणि एकंदरच आयोजन मंडळाकडून अपेक्षा काय? दरवर्षी साहित्य संमेलनाला घेऊन महाराष्ट्रातून वाद निर्माण होतात. खरंय, वाद व्हायलाच हवेत. वाद झाल्याशिवाय समाजव्यवस्थेचे विविध आयाम समोर येत नाही. पण असे निरोगी वाद घडतात का? की फक्त एकमेकाला दूषणं देणं होतं? आणि मग त्याला वाद म्हणावेत की चिखलफेक? अमुक जातीचीच माणसं साहित्य संमेलनं गाजवतात म्हणायला तुम्ही काय लहान मुलाचा खेळ करताय का?
मुळात सम्मेलनाध्यक्षांकडून या मराठी माणसाच्या काय अपेक्षा आहेत? जेव्हा एखादा माणूस एखाद्या गटाचे प्रतिनिधित्व करतो, किंवा एखादे पद भूषवतो, तेव्हा त्या व्यक्तीला त्या संपूर्ण समाजाच्या अस्तित्वाचे, गरजांचे, समाजजीवनाचे अगदी आवडी निवडीचेही निदान काही प्रमाणात आकलन असणे गरजेचे आहे. समाज पाहिल्याशिवाय समाज समजून कसा घेणार? अध्यक्ष होऊ इच्छिणाऱ्यांनी हे प्रश्न स्वतःला विचारून पाहायला हवेत. आत्मपरीक्षण करायला हवं.
 
 
आज साहित्य संमेलनं होतात, गावोगावचे लोक लेखकांना पाहायला गोळा होतात, साहित्यिकांशी बोलायला उत्सुक असतात. एक फार मोठा जनसमुदाय सहज उपलब्ध होतो. त्यांना या संमेलनातून काही मिळावं, त्या भागातील लोकांचं जीवन समृद्ध व्हावं हे पाहणं तुमचं उत्तरदायित्व आहे. शेवटी कसं आहे की, साहित्य म्हणजे लोकसंस्कृतीचा लिखित ठेवा. साहित्य निर्मितीसाठी कोणत्या डिग्रीची अपेक्षा नाही की पात्रतेचा प्रश्न नाही. प्रमाणभाषाही बंधनकारक नाही. मराठी साहित्य अखिल विश्वातील मराठी भाषिकांच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचं प्रतिनिधित्व करते. त्यात सर्वच येतं, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा, कविता, जातक कथा, वर्णनं.. साहित्याचे प्रकार जेवढे वेगळे त्याहून कितीतरीपट त्याचे विषय वेगळे. वेगवेगळ्या भागात झालेले साहित्य तिथल्या लोकसंस्कृतीचं प्रतिनिधित्व करतं. प्रत्येक विषयाला न्याय द्यायचा झाला तर तो साहित्यातूनच मिळालेला आहे. कारण साहित्य विपुल आहे, साहित्याला कोणतंच बंधन नाही, कोणती मर्यादा नाही, ती कुणा एकाची सच्ची अभिव्यक्ती आहे.
 
 
महाराष्ट्रात मराठी बोलली जाते, तिच्या अनेक बोलीभाषा आहेत, शब्द वेगळे, धाटणी वेगळी तरी थोडीफार सारखी आहे, भाषा म्हणजे काय? भावना शब्दात मांडण्याचं परिपूर्ण साधन. शब्दांची भाषा भावनेची असते, ती सहज समजते. महाराष्ट्रात डोंगराळ भागात जनजीवन वेगळे, परंपरा वेगळ्या, आनंद वेगळा, सुखं वेगळी तशीच दुःखही वेगळी. तसंच कोकणातलं, विदर्भतलं, सगळं अगदी वेगळं! अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं हरतायत आता. दरवर्षी वाढत जाणारी विद्रोही संमेलनं हा त्याचा ठोस पुरावा आहे.
 
 
आज मला द्वादशीवारांच्या अपरिपक्व विधानांचा उल्लेख करायचा नाही, पण इतरही संमेलनाध्यक्षांनी आपलं कर्तव्य काय आहे याचं भान ठेवायला हवं असं मला वाटतं. मराठीचे प्राध्यापक इथून ते न्यायालयात न्यायदानाचे मोलाचे काम केलेल्या नरेंद्र चपळगावकर यांनी साहित्याला आणि रसिकांनाही न्याय द्यावा अशी साहजिकच माझी अपेक्षा आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.