मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांसह आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल !

    09-Nov-2022
Total Views |


मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांसह आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल !
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला. चित्रपटांत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या १०० कार्यकर्त्यांविरोधात ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंडविधानाच्या १४१, १४३, १४६, १४९, ३२३, ५०४, अशा वेगवेगळ्या कलमांतर्गत आव्हाड यांच्यासह त्यांच्या १०० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. "मराठ्यांच्या इतिहासाचा विपर्यास कुठल्या हेतूने? शिवाजी महाराज विरुद्ध बाजीप्रभू देशपांडे हे महाराष्ट्र पचवेल? शिवाजी महाराजांच्या मांडीवरती झोपून आहे अफजलखान आणि त्याचा कोथळा फाडला आहे. हे इतिहासात कुठेच नाहीय. बाजीप्रभू छत्रपती शिवाजी महाराजांशी लढायला गेले आहेत. हे कुठे दिसलं? बाजीप्रभूंनी शिवाजी महाराजांशी लढाई केली. बाजीप्रभू सच्चा सेवक होता शिवाजी महाराजांचा!" असे जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टद्वारे नेटकऱ्यांसमोर मांडले आहेत. तसेच "तान्हाजी", "पावनखिंड" आणि "हर हर महादेव" या चित्रपटांचा उल्लेख जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टमध्ये केला आसून या चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेल्या सीन्सवर टीका केली आहे. 'दर 2-3 महिन्याला एक या वेगाने असे इतिहासाचा विपर्यास करणारे सिनेमे थिएटर, ओटीटी आणि टिव्हीवर येवून तरुण पिढीला खोटा इतिहास शिकवत आहेत.' असंही जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
आज पुन्हा एकदा त्याच ठिकाणी मनसे हा चित्रपट सर्व प्रेक्षकांसाठी मोफत ठेवणार आहे. काल ज्या प्रेक्षकाला मारहाण झाली त्याच्या कुटुंबाला आज पुन्हा एकदा हा शो पाहण्यासाठी आमंत्रण दिले असल्याची माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.