राम सावळ्या रंगाचा आहे, घनश्याम आहे, हे तर खरेच, पण त्याचे रुपलावण्य मन वेधून घेणारे आहे. पुढे श्लोक क्र. 197 मध्ये या लावण्यमय रुपाची व्यापकता सांगताना स्वामी म्हणतात, ‘नभासारिखे रुप या राघवाचे.’ ‘घनश्याम’ शब्दातही तीच व्यापकता दिसते. त्याचे लावण्य आहे, पण त्याला साजेसा त्याचा धीरगंभीर स्वभाव आणि अतुलनीय पराक्रम याला सीमा नाही. तो पूर्णप्रतापी आहे, म्हणजे त्याच्या पराक्रमात किंचितही उणीव सापडणार नाही.
या पूर्वीच्या मनाच्या श्लोकातील श्लोक क्र. 64 व 65 यात समर्थांनी सांगितले आहे की, अतिलोभ, अतिविषयवासना, कामना अतिमूर्खता हे दुर्गुण अखेरीस माणसाला नैराश्यप्रत घेऊन जातात. अशा माणसाला दैन्यवाणे जीवन जगावे लागते. कारण, अतिविकार वश झालेला हा माणूस ज्या प्रापंचिक गोष्टींची हाव धरीत असतो आणि त्या गोष्टी ज्या भौतिक विषयातून येतात, ते भौतिक विषय बाहेरुन मिळणारे असतात. त्यावर त्या माणसाची सत्ता चालत नाही. त्यामुळे हाव आणि आसक्ती यांच्या तृप्तीसाठी प्रसंगी त्याला लाचारी पत्करावी लागते. दीनवाणे जीवन त्याच्या वाट्याला येते. याउलट भगवंतांची भक्ती, भगवंताचे प्रेम या भावना अंत:करणातून येत असल्याने अशा भक्ताला बाहेरून काही मिळवायचे नसते.
तसेच भगवंताच्या भक्तीत समर्पणाची भावना असल्याने भक्ताला प्रापंचिक गोष्टींची आसक्ती उरत नाही. त्याला घेण्यापेक्षा देण्यात आनंद असतो. तथापि हेही तितकेच खरे आहे. दैनंदिन जीवन जगण्यासाठी त्यालाही संसारात काही गोष्टी मिळवाव्या लागतात. त्या तो प्रामाणिकपणे मिळवतो. त्यासाठी त्याला प्रयत्नशील राहावे लागते. आळस सोडून तो प्रयत्न करतो. पण, काही वेळा काही प्रापंचिक गोष्टी मिळाल्या नाहीत, तरी त्याचे त्याला दुःख नसते. हा संसार असार आहे, हे जाणून तो प्रयत्न करीत असतो. त्यामुळे या प्रापंचिक गोष्टींबाबत त्याच्या ठिकाणी आसक्ती, लालसा, लाचारी, दैन्यवाणेपणा यांचा शिरकाव होत नाही, या भक्ताने मनात शाश्वत काय ओळखलेले असते. तो जनसामान्यांप्रमाणे वागत असतो. तो चारचौघांसारखे सर्वसामान्य जीवन जगत असतो. पण, त्याच्या ठिकाणी सारासार विवेक सदैव जागा असतो. स्वामी दासबोधात सांगतात-
प्रकृतीसारिखे चालावें।
परी अंतरी शाश्वत ओळखावें।
सत्य होऊन वर्तावें। लोंकांऐस॥
प्रपंचात सर्वसामान्य माणसाप्रमाणे जीवन जगत असताना अंतरात मात्र त्या शाश्वत भगवंताला न विसरता सत्याने वागावे म्हणजे समाधानी जीवन जगता येते. समर्थ भक्तीमार्गी संत असले, तरी ते दैववादी किंवा निवृत्तिवादी नव्हते. आधी ‘प्रपंच करावा नेटका’ असा उपदेश त्यांनी केला आहे. परंतु, नेटका प्रपंच करीत असताना ‘परमार्थ विवेक’ सांभाळावा, हे सांगायला स्वामी विसरत नाहीत. अनासक्त वृत्तीने प्रपंच केला, तर त्याच्या दुष्परिणामांपासून वेगळे राहता येते. संसारात राहूनही त्याचे असारत्व जाणल्यामुळे तो संसार सुखी करता येतो, अन्यथा विष खाऊन काय कोणी सुखी होणार आहे का, पुढील मनाच्या श्लोकात हेच सांगायचे आहे.
नव्हे सार संसार हा थोर आहे।
मना सज्जना सत्य शोधूनी पाहे।
जनी वीष खाता पुढे सूख कैचे।
करी रे मना ध्यान या राघवाचे॥66॥
हा संसार घोर आहे हे निर्विवाद, तरी पण तो टाकून देता येत नाही. हा संसार असार आहे. हो! मनाला पटले तरी त्यातील सत्य शोधून काढले पाहिजे. समर्थांनी तत्कालीन समाजाला निवृत्तिवादाच्या दुष्परिणामांपासून वाचवले. त्यासाठी स्वामींनी प्रपंचविज्ञान समजावून सांगितले. संसार घोर आणि तापदायक असला, तरी ते रडतखडत करण्यापेक्षा एखाद्या शूरवीराप्रमाणे केला पाहिजे, असे समर्थ म्हणतात. या संसारात सार काय आहे म्हणजे शाश्वत काय आहे, या सत्याचा शोध घेतला की, असार भाग सोडता येतो. हा असार प्रपंच पुढे-पुढे फिका होत जातो. सत्य समजले की, संसाराची आसक्ती राहत नाही. अनासक्त वृत्तीने प्रपंच करणे, ज्यांना जमत नाही, त्यांनी लक्षात घ्यावे की, विष खाऊन कोणीही सुखाने राहू शकत नाही. संसारातील आसक्ती ही विषाप्रमाणे असते. आसक्ती बाळगून संसार केला, तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यापासून सुटका नसते. यासाठी संसारात अनासक्त होऊन सत्य शाश्वत अशा राघवाचे ध्यान केले, तर सुख अनुभवता येईल, असे स्वामी सांगतात. हा संसार प्रपंच असार असल्याने तो पूर्णत्वास नेता येत नाही. त्यातील तात्पुरते समाधान टिकून राहणारे नाही, हे ओळखून असावे. अपूर्णत्व हा संसाराचा स्वभावधर्म जाणून संसार केला आणि त्यात सत्य भगवंताचे स्मरण चिंतन करून काळ व्यतित केला, तर संसारबाधेला त्रास होत नाही. म्हणून स्वामी आग्रहाने सांगतात की, ‘करी रे मना ध्यान या राघवाचे...’
आतापर्यंतच्या सहा श्लोकातून (श्लोक क्र. 61ते 66) समर्थांनी रामाची भक्ती करण्याचा उपदेश केला आहे. ज्या रामाची भक्ती करायची तो आहे तरी कसा आणि त्याच्या चिंतनाचा अभ्यास कसा करावा, हे आता स्वामी पुढील दहा श्लोकांतून सांगत आहेत. या पुढील मनाचे श्लोक क्र. 67 ते 76 या दहा श्लोकांचे वैशिष्ट्य असे की, त्या प्रत्येक श्लोकाची शेवटची ओळ ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ अशी आहे. वाचकांच्या स्मरणात असेल की, मनाच्या श्लोकांच्या श्लोक क्र. 3 ची पहिली ओळ ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ अशी आहे. समर्थांना हा विचार अर्थपूर्ण वाटला असल्याने भगवंताच्या चिंतनाचा अभ्यास करण्यासाठी व रामाचे वर्णन करण्यासाठी पुन्हा ही ओळ दहा श्लोकांत त्यांनी वापरली आहे, येथे द्विरुक्तीच्या दोष नसून रामाचे सुंदर वर्णन करता यावे, यासाठी हा प्रयोग स्वामींनी केला आहे. प्रभू रामाचे व त्याच्या गुणांचे वर्णन करताना याचा उपयोग होतो, ज्या रामाचे चिंतन, ध्यान करायचे तो कसा आहे, याचे वर्णन पुढील श्लोकात आहे-
घनश्याम हा राम लावण्यरुपी।
महां धीर गंभीर पूर्णप्रतापी।
करी संकटीं सेवकाचा कुढावा।
प्रभातें मनीं राम चिंतींत जावा ॥67॥
राघवाचे ध्यान करण्यासाठी उपयोगी पडावे, असे रामाचे सुंदर वर्णन या श्लोकात स्वामींनी केले आहे. राम सावळ्या रंगाचा आहे, घनश्याम आहे, हे तर खरेच, पण त्याचे रुपलावण्य मन वेधून घेणारे आहे. पुढे श्लोक क्र. 197 मध्ये या लावण्यमय रुपाची व्यापकता सांगताना स्वामी म्हणतात, ‘नभासारिखे रुप या राघवाचे.’ ‘घनश्याम’ शब्दातही तीच व्यापकता दिसते. त्याचे लावण्य आहे, पण त्याला साजेसा त्याचा धीरगंभीर स्वभाव आणि अतुलनीय पराक्रम याला सीमा नाही. तो पूर्णप्रतापी आहे, म्हणजे त्याच्या पराक्रमात किंचितही उणीव सापडणार नाही. त्याच पराक्रम ‘परित्राणाय साधुनां। विनाशाय च दुष्कृताम्।’ असा आहे. तो सज्जन्नांचा रक्षणकर्ता व दुर्जनांचा संहार करणारा आहे, अशा महाप्रतापी रामाचे सेवक होण्यात धन्यता आहे. तो सज्जनांचा रक्षणकर्ता तर आहेच, पण आपल्या सेवकाचे संकटातून रक्षण करणारा आहे. अशा रामाच्या प्रभाती स्मरणाने दिवसाची सुरुवात करावी दिवसभर प्रसन्न वाटेल.
- सुरेश जाखडी