कारभार कमी, दहशत जास्त

    08-Nov-2022   
Total Views |
 
केरळ
 
 
 
 
केरळमधील डाव्यांचे सरकार कारभार कमी आणि दहशत जास्त घालताना दिसते. म्हणूनच केरळातील हिंदू जीव मुठीत घेऊन जगत आहे. हिंदूंची येथील लोकसंख्या लक्षात घेता डाव्यांनी कायमच याठिकाणी हिंदूंव्यतिरिक्तच्या मतांना महत्त्व दिले.
 
 
हिंदूहितासाठी केरळ सरकार भले कुचराई करत असेल, परंतु केरळात मात्र रा. स्व. संघ हिंदूहितासाठी कायम तत्पर असल्याचे दिसून आले आहे. याकामी अनेक संघ स्वयंसेवकांना आपला जीव गमवावा लागला. तरीही संघाचे काम थांबले नाही. केरळच्या पलक्कड जिल्ह्यात एप्रिल, 2022 मध्ये रा. स्व. संघाचे स्वयंसेवक एस. के. श्रीनिवासन यांची हत्या करण्यात आली होती. नुकतीच बंदी घालण्यात आलेल्या कट्टरपंथी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) आणि त्यांची राजकीय शाखा सोशल ‘डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’ (एसडीपीआय) यांचा या हत्येशी संबंध असल्याचे समोर आले. यानंतर या हत्येची चौकशी सुरू झाली. परंतु, केरळ सरकार ढीम्म ते ढीम्मच! श्रीनिवासन यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करणार्‍या अधिकार्‍यालाच आता धमक्या दिल्या जात आहेत.
 
 
अनिल कुमार असे या अधिकार्‍याचे नाव असून दि. 5 ऑक्टोबरला त्यांना धमकीचा फोन आला होता. ‘अपना ताबूत तैयार रखो’ असे सांगत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात यांनी 34 ‘पीएफआय’ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. ‘पीएफआय’ नेता सुबैर याच्या हत्येनंतर श्रीनिवासन यांची हत्या करण्यात आली होती. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार, श्रीनिवासन यांच्यावर 20 वेळा तलवारीने वार करण्यात आले होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी दुकाने बंद करून हत्येचा निषेध केला होता. रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा हा काही पहिला प्रयत्न नाही.
 
 
याआधीही अनेक संघ स्वयंसेवकांना केरळमध्ये आपला जीव गमवावा लागला. परंतु, तरीही ‘राष्ट्र प्रथम’ आणि हिंदू रक्षणासाठी हजारो स्वयंसेवक आपल्या जीवाची पर्वा न करता केरळमध्ये कार्यरत आहे. नोव्हेंबर, 2021 मध्येही संजीत नावाच्या संघ स्वयंसेवकाची ‘एसडीपीआय’च्या कार्यकर्त्यांनी हत्या केली होती. त्यात आता जे अधिकारी या हत्या प्रकरणाचा तपास करत आहे, त्यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे, त्यावरून केरळातील विजयन सरकारने खरोखर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
 
‘आप’चा ‘फ्लॉप शो’
 
राजकारणात राजकीय सभांच्या माध्यमातून आपली आणि पक्षाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. सभेवरून अनेक अंदाजपंचे लावले जातात. परंतु, सभा जोरात आपटली तर मात्र पंचाईत झालीच म्हणून समजा! हिमाचल प्रदेशनंतर गुजरात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून प्रचार सभा आणि रॅली यांना जोर आला आहे. अनेकदा सभांमध्ये भाड्याने माणसं आणली जातात. त्यामुळे त्यांना सभेचे वक्ते, विषय यामधील काहीही माहिती नसते. असाच प्रकार आता आम आदमी पक्षाच्या सभेमध्ये समोर आला. सामान्य माणसांचे कैवारी असल्याचा आव आणणार्‍या ‘आप’चा खोटेपणा यातून समोर आला. गुजरातमधील राजकोटमध्ये अरविंद केजरीवालांच्या ‘रोड शो’ला गर्दी झाली.
 
 
 
परंतु, ही गर्दी स्वयंस्फूर्तीने जमा झालेली नव्हती, तर जमवण्यात आली होती. राजकोट पूर्व विधानसभा मतदारसंघात हा ‘रोड शो’ आयोजित करण्यात आला होता. या ‘रोड शो’चे वृत्तांकन करणार्‍या वाहिन्यांमुळे हा प्रकार समोर आला. यावेळी ‘रोड शो’मधील नागरिकांनी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना, ‘रोड शो’ विषयी माहिती नसल्याचे सांगितले. तसेच परिसरातील एका ओळखीच्या ‘आप’ नेत्याच्या सांगण्यावरून ‘रोड शो’ला आल्याची कबुली दिली. ‘रोड शो’मध्ये सहभागी अनेक महिलांना केजरीवाल नेमके कोण आहे, हेदेखील माहीत नव्हते. दरम्यान, केजरीवालांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही गुजरातमध्ये प्रचाराला बोलावले आहे. त्यामुळे पंजाबवासीयांना वार्‍यावर सोडून भगवंत मान गुजराती लोकांची मने वळविण्यात व्यस्त आहे. तिकडे केजरीवालही दिल्लीचा कारभार वार्‍यावर सोडून गुजरात स्वारीवर आहे. दिल्लीत प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे.
 
 
 
परंतु, त्याचे केजरीवालांना कसलेही सोयरेसुतक पडलेले नाही. सामान्य माणसांचा पक्ष म्हणवून घेणार्‍या केजरीवालांना सामान्य माणसेच ओळखत नसतील केजरीवालांसाठी ही बाब शोभनीय नाही. पंजाबमध्ये शेत जळण्याच्या घटनांनी उच्चांक गाठला असताना मुख्यमंत्र्यांना त्याकडे लक्ष देणे गरजेचे वाटत नाही. मागील कित्येक महिन्यांपासून आम आदमी पक्षाकडून गुजरात काबीज करण्यासाठी हरेक प्रयत्न सुरू आहे. परंतु, अशी भाड्याची माणसे आणून गर्दी जमेल. परंतु, गर्दीच्या मनात जागा मात्र मिळवता येणार नाही.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.