उद्योगातील समाजशीलता...

    07-Nov-2022   
Total Views |
mansa


 
‘रिअल इस्टेट’ व्यवसायासोबतच समाजातील तळागाळातील बांधवांसाठी काम करणारे ठाण्याचे प्रशांत फुलवणे मूळचे अमरावतीचे. त्यांच्या विचारकार्याचा घेतलेला मागोवा...



“पैसे भरा, त्यानंतरच तुम्ही तुमच्या पत्नीला घरी घेऊन जाऊ शकता,” यावर ते म्हणाले, “माझा पगार 1 तारखेला होतो. मी तुम्हाला ‘चेक’ देतो, पण तिला घरी न्यायची परवानगी द्या.” पण, यावर डॉक्टर म्हणाले, ‘’हे पाहा, नियम आहे. मी काही करू शकत नाही.” हे सगळे ऐकून प्रशांत यांना खूप वाईट वाटले. त्यांच्या पत्नी सुनीता या खूप गंभीर आजारी पडल्या. त्यांना प्रसिद्ध अशा खासगी रुग्णालयात उपचारासाठी ठेवले. उपचाराचा खर्च करता करता प्रशांत यांची पुंजी संपली. अर्थात, पत्नीच्या जीवापुढे हे सगळे काहीच नव्हते. सुनीता यांनी प्रशांत यांना आयुष्यभर मोलाची साथ दिली होती. खूप उपचार केल्यानंतर सुनीता यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली. आता त्यांना रुग्णालयातून घरी नेऊ शकत होते. पण रुग्णालयाचे उर्वरित शुल्क भरायला पैसे नव्हते. कुणापुढे हात पसरणे, हे प्रशांत यांच्या स्वभावात नव्हते. त्यावेळी त्यांना खूपच हतबल वाटले. माणसाचा जीव, आत्मसन्मान याची किंमत केवळ पैसा आहे का? या विचारांनी त्यांच्या मनात काहूर केले. त्यावेळी ते रेल्वेमध्ये नोकरी करत होते. त्यांनी मनाशी खूणगाठ बांधली की, इतके पैसे कमवायचे की, पैशांसाठी आपले कुठेही अडू नये.



आज प्रशांत पंजाबराव फुलवणे हे एक यशस्वी उद्योजक आहेत. ठाण्यामध्ये ‘रिअल इस्टेट’ आणि बांधकाम क्षेत्रात काम करणारी ‘वास्तुसंकल्प ग्रुप’ म्हणून त्यांची कंपनी आहे. ग्रुपचे नऊ हजार ग्राहक गुंतवणूकदार आहेत. कंपनीने गुंतवणूकदार किंवा ग्राहकांची संख्या वाढावी म्हणून काही उपक्रमही राबवलेत. जसे एका महिन्यात तीन ‘प्लॉट्स’विकणारे किंवा अमुक-अमुक कालावधीत पहिल्या प्रथम ‘प्लॉट’ची किंवा वास्तूची खरेदी करणार्‍या ग्राहकांसाठी विनामूल्य विदेशी सहल आयोजित करणे. या उपक्रमातून प्रशांत यांनी 1600च्या वर व्यक्तींना विदेशी सहल घडवली आहे. ही सहल म्हणजे गुंतवणूकदारांसाठी एक प्रेरणादायी घटनाच असते. कारण, आर्थिक स्रोत कमी असतानाही भव्य स्वप्न पाहत आयुष्य बदलणारे समविचारी लोक एकत्र येतात आणि एकमेकांच्या कल्पना ‘शेअर’ करतात. ही संधी या हजारो लोकांना मिळाली, ती केवळ प्रशांत फुलवणे यांच्यामुळे. प्रशांत हे अत्यंत समर्पित भावनेने व्यवसाय करतात. कारण एकच! त्यांनी पैशांअभावी असलेले जगणे अनुभवले होते आणि तीच त्यांची प्रेरणा होती.




पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनकार्याबद्दल प्रचंड श्रद्धा आणि आदर असलेले प्रशांत यांना नेहमीच समाजासाठी एक पाऊल पुढे येऊन कार्य करणे आवडते. त्यामुळेच जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतानाच त्यांनी जमिनीशी संबंधित अनेक सेवाभावी उपक्रमही राबवले. पर्यावरण समतोल राखावा म्हणून त्यांनी काही समविचारी संस्थांच्या मदतीने पाच हजार वृक्षांची लागवड आणि संवर्धन केले. दुर्गम भागात रक्तदान शिबीर, तसेच आरोग्य शिबीरही ते आयोजित करत असतात. त्यासाठी त्यांना महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘सिंध अकादमी, मुंबई’चा ‘मातृभूमीभूषण पुरस्कार’ तसेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ही प्राप्त झालेला आहे.


 
कोरोनाने जग हवालदिल असताना, ठप्प पडले असताना प्रशांत यांच्या उद्योगाची स्थितीही वेगळी नव्हती. या काळात त्यांनी कर्मचार्‍यांना वार्‍यावर सोडले नाही, त्यांचे वेतन नेहमीप्रमाणे दिले. या काळात त्यांनी आजारी कर्मचार्‍यांची वैद्यकीय सेवा तसेच गरजूंना हवी ती मदत उपलब्ध करून दिली. सेवाभावी आणि संवेदनशील उद्योजकम्हणून प्रशांत फुलवणे आज समाजात स्वत:चा ठसा उमटवत आहेत. प्रशांत हे मूळ अमरावतीचे. धनगर समाजातील पंजाबराव आणि द्वारकाबाई यांचे प्रशांत सुपुत्र. पंजाबराव सरकारी कर्मचारी, तर द्वारकाबाइृ गृहिणी. 70 च्या दशकात सरकारी कर्मचार्‍यांना फार पगार नव्हताच. त्यामुळे घरात गरिबी नसली, तरी सुबत्ताही नव्हतीच. पंजाबराव आणि द्वारकाबाईंनी अतिशय कष्ट करून मुलांना वाढवले. या दोघांनी स्वत:ला नवीन कपडे क्वचितच घेतले. कारण, त्या कपड्यात पैसे घालवण्यापेक्षा त्या पैशांनी मुलांची वह्या-पुस्तके येतील, हा विचार. पंजाबराव हे समाजशील होते. गावातल्या, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अडीनडीला ते धावून जात.



घरी धार्मिक वातावरण, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या विचारकार्याच्या कथा ऐकतच प्रशांत मोठे झाले. पुढे दहावीनंतर त्यांनी ‘पॉलिटेक्निक डिप्लोमा’ केला. त्याच काळात त्यांनी वर्तमानपत्रात रेल्वे भरतीची जाहिरात वाचली.प्रयत्न करून बघावा म्हणून त्यांनी नोकरीचा अर्ज भरला आणि वयाच्या 19व्या वर्षीच त्यांना रेल्वेत नोकरी लागली. मग कामानिमित्त ते मुंबईला आले. वयवर्षे 19, नवीन शहर आणि सगळेच नवीन. दोन-तीन वर्षे आमदार निवासामध्ये राहून त्यांनी दिवस काढले. पुढे डोंबिवली येथे मित्रांसोबत मिळून राहू लागले.






डोंबिवली ते छशिमट दररोजचा प्रवास आणि हो त्याच कालावधीत त्यांनी ‘इंजिनिअरिंग’चे शिक्षण पूर्ण केले. 2009 साली त्यांनी जमीन गुंतवणूक व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला थोडा नफा मिळाला. मात्र, या क्षेत्रातले खाचखळगे माहिती नसल्याने त्यांची एका ठिकाणी फसवणूक झाली. नुकसान झाले. त्यावेळी सुनीता यांनी प्रशांत यांना धीर दिला की, नुकसान झाले म्हणजे सगळे संपले नाही. यातून आपण काही शिकू. दुसर्‍या कुणाची फसवणूक होऊ नये, यासाठीही काम करू. त्यानंतर दोघांनी मिळून ‘वास्तुसंकल्प ग्रुप’ कंपनी सुरू केली, जी ठाणे शहरातील एक आघाडीची कंपनी आहे. कुठल्या परिस्थितीत हार न मानता सतत कार्यरत राहून स्वत:चा आणि इतरांचाही विकास करणार्‍या प्रशांत फुलवणे यांच्यासारखी माणसं सामान्यातील असामान्य असतात. उद्योगातील समाजशीलता हेच त्यांचे सूत्र असते.






आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.