नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा भाजपच सत्तेत येणार असा अंदाज भारतातील प्रसिद्ध वृत्तवाहिनी ABP सर्व्हेमध्ये व्यक्त केला गेला आहे. या निवडणुकीत १८२ जागांपैकी तब्बल १३१ ते १३९ जागांवर भाजप विजय मिळवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाही भाजपच सत्ता मिळवणार असेच चित्र आहे. गेली दोन दशके गुजरातमध्ये भाजप सलग सत्ता मिळवत आला आहे. राष्ट्रीय पातळीवर दुबळ्या असलेल्या काँग्रेसचा तसेच आपल्या नेहमीच्या रेवडी तंत्राने निवडणूक लढणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पार्टी हा पक्षदेखील काहीच प्रभाव टाकू शकणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
गुजरात विधानसभेसाठी १ आणि ५ डिसेंबर या दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तर निकाल ८ डिसेंबरला जाहीर होतील. देशातील एक महत्वाची विधानसभा निवडणूक असलेली गुजरात विधानसभेच्या प्रचाराला हळू हळू रंग चढत चालला आहे. भाजप आणि त्याचा प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस आणि पंजाब, दिल्ली मध्ये सत्ता असलेली आम आदमी पार्टी यांच्यातच मुख्य लढत होणार आहे.