वरळी मतदारसंघ कुणाची जहागीर नाही !

कुटुंबकेंद्रीत उद्धवसेनेची वाटचाल तुष्टीकरणाकडे ! खा. तेजस्वी सूर्या यांचा ठाकरेंवर थेट हल्ला

    04-Nov-2022
Total Views |



 उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना खरी शिवसेना नसून ती वसुली सेना आहे. बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित असलेली शिवसेना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात भाजपसोबत आहे हे वास्तव आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सेनेची वाटचाल फक्त तुष्टीकरणाच्या दिशेने असून बाळासाहेब आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांना बासनात गुंडाळून ठेवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे,' अशी घणाघाती टीका भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर केली आहे.
 
 
शुक्रवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी मुंबई भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना तेजस्वी सूर्या यांनी विशेष हजेरी लावली वरळी येथे भाजप युवा मोर्चाच्या युवा वॉरिअर शाखेचे देखील उदघाटन केले. यावेळी त्यांनी मुंबई तरुण भारतशी विशेष संवाद साधला.
 
 
भाजप युवा मोर्चाचे काम कसे सुरु आहे ?
 
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ज्या प्रकारे देश पुढे जात आहे, त्याप्रमाणेच आक्रमकपणे युवा मोर्चाची घोडदौड सुरु आहे. गुवाहाटी ते महाराष्ट्र आणि देशभरातील कानाकोपऱ्यातून भाजपाला लोकांचा पाठिंबा मिळत असून भाजपात सहभागी देशसेवा करण्यासाठी लोक तत्परतेने पुढे येत आहेत. तरुणाईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी विलक्षण आकर्षण असून देशाच्या उभारणीत योगदान देण्यासाठी युवा मोर्चा सक्षम पर्याय म्हणून युवकांमध्ये स्वीकारला जात आहे.
 
 
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची सुरुवात दक्षिण भारतातून झाली. अनेक दिवस ते दक्षिणेत होते. या यात्रेचा देशाच्या राजकारणावर कितपत परिणाम होईल असे वाटते ?
 
राहुल गांधींच्या यात्रेचा देशाच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही हे सत्य आहे. त्यांची यात्रा वीस दिवस कर्नाटकमध्ये होती, पण तिथे त्यांना पक्ष आणि संघटनेची जोडणी करणे आवश्यक आहे. काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांमध्ये खूप मोठा अंतर्गत संघर्ष आहे आणि त्यातून काँग्रेस खिळखिळी झालेली आहे. कर्नाटकात काँग्रेसमध्ये गटबाजी आहे, राजस्थानमध्ये देखील पायलट आणि गहलोत यांच्यात एकमत नाही, तिथे देश जोडणे खूप पुढची गोष्ट आहे. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी आधी काँग्रेस पक्षाला आणि नेत्यांना एकमेकांशी जोडून संघटन मजबूत करावे. त्यामुळे देश जोडण्याच्या वल्गना करणाऱ्या राहुल गांधी यांनी आधी पक्षाकडे लक्ष द्यावे आणि मगच भारत जोडण्याच्या गोष्टी कराव्यात अशी आमची भूमिका आहे.
गुजरात आणि हिमाचल प्रदेशाच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. तिथे कोण बाजी मारेल अशी अपेक्षा आहे ?
 
कुठल्याही राजकीय पक्षाचे आणि त्याच्या ताकदीचे मूल्यांकन हे निवडणुकीतील निकालांवर अवलंबून असते. सध्या देशात गुजरात आणि हिमाचल प्रदेशामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले असताना त्यांचे नेते मात्र इतर राज्यांमध्ये यात्रा करत फिरत आहेत. त्यामुळे क्षीण झालेल्या आपल्या पक्षाला मजबूत करून निवडणुकीत आपली स्थिती सुधारणे हे राहुल यांच्यासाठी महत्त्वाचे आहे की इतर राज्यांमध्ये यात्रेच्या नावाखाली पर्यटन करणे त्यांना महत्त्वाचे वाटते याचा विचार काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनीच करावा. काँग्रेसच्या अशाच उथळ वर्तनामुळे लोक त्यांना सातत्याने नाकारत असून इतर पक्षांचा पर्याय स्वीकारत आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपच मैदानात असून भाजपचाच या दोन्ही राज्यांमध्ये प्रचंड बहुमताने दणदणीत विजय होईल हे हे निर्विवाद सत्य आहे.
 
 
महाराष्ट्रातील औद्योगिक स्थितीवरून काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरु असून राज्यासोबत भेदभाव होत असल्याचे काँग्रेस आणि विरोधी पक्षाने म्हटले आहे. तुम्हाला काय वाटतं ?
 
महाविकास आघाडी आणि इतर पक्षांकडून सरकारवर लावण्यात येत असलेले आरोप स्पष्टपणे खोटे आणि चुकीचे आहेत हे सातत्याने सिद्ध झालेले आहेत. एकीकडे काँग्रेस आणि विरोधी पक्ष असे आरोप करत असताना दुसरीकडे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी सुरु असलेल्या तब्बल २ लाख कोटींच्या एकूण सव्वा दोनशे प्रकल्पांची माहिती देशासमोर ठेवली आहे. महाराष्ट्रातील युवकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांच्या हाती रोजगार देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्व योजनांची घोषणा त्यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात उज्ज्वल योजना, जलजीवन मिशन, विविध शहरांमध्ये बनवण्यात आलेल्या पायाभूत सुविधांवरून आपण असे म्हणू शकतो की महाराष्ट्रात मागील आठ वर्षांमध्ये न भूतो न भविष्यती असा विकास झाला आहे. त्यामुळे विरोधकांचे आरोप हे धादांत खोटे आहेत हेच त्या आरोपांमधील वास्तव आहे. सर्वसामानतेने महाराष्ट्राची वाटचाल सुरु असून महाराष्ट्रासोबत कुठलाही भेदभाव झालेला नाही हे सत्य आहे.
तुमच्या दौऱ्यात वरळी मतदारसंघाचाही समावेश होता. तसेच कुठलाही मतदारसंघ कुणाची जहागीर नाही असे म्हणत तुम्ही सूचक इशाराही दिला होता. तुम्ही नक्की काय सुचवू इच्छित आहात ?


कुणावरही वैयक्तिक टीका करण्याचा माझा प्रयत्न नाही. देशातील प्रत्येक मतदासंघावर प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे, त्यामुळे कुणीही कुठूनही निवडणूक लढाऊ शकतो. कुठल्याही पक्षाचा, व्यक्तीचा किंवा कुटुंबाचा कोणत्याची मतदारसंघावर कब्जा असू शकत नाही किंवा ते तसे करू शकत नाहीत. सध्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना ही खरी शिवसेना नाहीच. स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी शिवसेनेचे कार्य सुरु करण्यात आले होते. परंतु या सर्व सिद्धांतिक बाबींना बाजूला सारून शिवसेना कुटुंबकेंद्रीत पक्ष झाला असून तुष्टीकरणाचे प्रयत्न ठाकरेंकडून सुरु आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना वसुलीसेना बनली असून बाळासाहेबांना प्रेरित असलेली एकनाथ शिंदेंची शिवसेना आमच्यासोबत आहे हे सध्याचे वास्तव आहे.
मुंबईच्या भूमीवरून महाराष्ट्राला काय संदेश द्याल ?


महाराष्ट्रातही आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे राज्याला लागलेले ग्रहण दूर झाले असून महाराष्ट्रात त्यातून मुक्त झाला आहे. देवेन्द्रजी यांच्या नेतृत्वात राज्याची वाटचाल जोरकसपणे सुरु असून पक्षाची घोडदौड देखील दिमाखदारपणे सुरु आहे. त्यांच्या नेतृत्वात एका नव्या ऊर्जेने आणि चेतनने महाराष्ट्र पुढे जात असून यापूर्वी कधीही झाली नाही अशी नेत्रदीपक कामगिरी महाराष्ट्र देशाच्या समोर करून दाखवेल यात शंका असण्याचे कारण नाही.